- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

ओंकार आणि प्राणायाम

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row][vc_column el_class=”mr-yantramanav”][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]

“ओंकार आणि प्राणायाम ध्यान देऊन ऐका.”

तुमच्या तसेच सर्व विश्वाच्या हृदयात प्रतिध्वनित होणारा आद्य प्रणव ॐ नीट ऐका.

ॐ हे हिंदूंचे पवित्र प्रतिक आहे. त्यांच्या दृष्टीने ते ईश्वराप्रमाणेच आहे. त्याला महामंत्रही म्हणतात. ईश्वराला जाणून घेण्यासाठी ते अत्यंत उत्तम साधन आहे. श्री सत्यसाई धर्म प्रतिकांमध्ये ॐ हे हिंदुत्वाचे प्रतिनिधी आहे.

अनादि काळापूर्वी ब्रह्म हे एकमेव होते. ते परमशांतीच्या स्वरूपात होते. त्यातून नादब्रम्ह निर्माण झाले. ते ध्वनी आणि ईश्वराचे प्रकटीकरण आहे. हा आद्य ध्वनी म्हणजे ओंकार! या आद्य ध्वनीतून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी पंचमहाभूते निर्माण झाली. ओंकार हे सृष्टीचे प्राणतत्त्व आहे. म्हणून तर त्याला प्रणव म्हणजे प्राणातून वाहणारा आणि जीवन व्यापणारा असे म्हणतात. या शब्दाचे वैशिष्ट्य सांगणारे प्रचंड वांङ्गमय उपलब्ध आहे. असे व्यापक वैशिष्ट्य असलेले पवित्र प्रतिक आपल्याला जगात कुठेही सापडणार नाही.

या अक्षराचा सर्व इतिहास वेद आणि उपनिषदे यात आहे एक वेदऋचा अशी आहे –

प्रजापतिर्वै ईदमग्र आसीत् |
तस्य वाग्द्वितीया आसीत|
वाग्वै परमं ब्रम्ह!

“सुरुवातीला फक्त प्रजापती होता; त्याच्याबरोबर वाचा होती. वाक् हेच परब्रह्म!

हीच संकल्पना सेंट जॉन यांच्या गोस्पेल मध्ये (न्यू टेस्टामेंट मध्ये) आहे.

“सुरुवातीला केवळ शब्द होता; तो ध्वनी देवासह होता. आणि ध्वनीच देव होता”.ॐ हा ईश्वरच होता. याचा अर्थ ईश्वराला जाणण्याचे ते साधन होते. बाकीच्या धर्मांमध्येही ॐ प्रमाणे पवित्र शब्द आहेत पण ते वेगळ्या स्वरूपात आहेत. ख्रिश्चनांचा ‘आमेन’ मुस्लिमांचा ‘आमिन’. अर्थात त्यांचे विवरण आणि उपयोग हा अगदी तंतोतंत ॐ प्रमाणे नाही.

ॐ हे व्यक्तिशः देवतांच्या नामरूपांचे प्रतिक आहे. निराकारावर लक्ष एकाग्र करणे कठीण असल्याने आपल्या आवडीनुसार देवतांच्या विविध रूपांची आपण उपासना करतो. इष्ट देवतेची आपली परंपरा आहे. अर्थात ॐ हा सर्व देवतांच्या नाम रूपाला व्यापून टाकतो.

प्रत्येक नामाला ‘बीजाक्षर’ असते. या आधारावर ‘अ’ म्हणजे ब्रम्हा, ‘उ’ म्हणजे विष्णु आणि ‘म’ म्हणजे महेश्वर. अशा विविध स्वरूपांवर ॐ आहे. सरस्वती ब्रह्मदेवाच्या जिभेवर वास करते आणि लक्ष्मी विष्णूच्या वक्षस्थलावर असते. त्यामुळे ॐ या अक्षरात या देवतांचा ही समावेश होतो. पार्वती ही शिवाची शक्ती असून शिवाचे अर्धांग आहे, त्यामुळे शिव हा अर्धनारीश्वर आहे. म्हणजे अर्धा भाग पुरुषाचा आणि अर्धा भाग स्त्रीचा. ॐ मधील ‘म’ हे अक्षर महेश्वर असल्याने त्यात पार्वतीचाही समावेश होतो. वेगळ्या शब्दात सांगायचे तर ॐ च्या उच्चारानंतर देवाची सर्व रुपे प्रतिसाद देतात. म्हणून तर असे म्हटले जाते की ॐ हा श्री बाबांचा डायरेक्ट टेलीफोन नंबर आहे. ॐ म्हटल्यानंतर लगेचच आपण बाबांशी जोडले जातो. मग बाबा कुठेही असोत. पुट्टपर्तीत, वृंदावनात, अनंतपूरला किंवा कुठे प्रवासात! बाबा म्हणतात की ओंकार आणि रामनाम एकरूपच आहे! प्रणव हे रामनामाचे प्रतिक आहे आणि अ, उ, म हे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे अनुक्रमे प्रतिनिधित्व करतात.

ॐ हे ध्वनिजगताचे मूळ आणि साहित्य आहे. तसेच विज्ञान आणि शब्दोच्चार यांचे दृश्य रूप आहे. सर्व ध्वनी व शब्द यांचे मूळ प्रणवाक्षरात आहे. विविध वर्णांच्या संयोगातून होणारी अक्षरे ज्या ध्वनीतून निर्माण होतात किंवा कोणताही वर्ण अ, उ, म या तीन अक्षरांखाली येतो. या प्रणव अक्षरात श्वासातले सर्व ध्वनी समाविष्ट असल्याने ॐ हे सर्व वेदांचे सार आहे असे म्हणतात. प्रणवामध्ये सर्व नावांचा समावेश होतो. विविध रूपातील उपासनेचा तो पाया आहे; तसेच देवाची अर्चना ज्या नावांनी होते त्याचे मूळ आहे.

ॐ हा जाणिवेच्या सर्व अवस्थांचा – भौतिक व अध्यात्मिक – प्रतिनिधी आहे. तसेच शारीरिक ते आत्मिक पातळीवरही तो सर्व अवस्थांचे प्रतिनिधित्व करतो.

ॐ म्हणजे आत्मा किंवा अद्वैत ब्रम्ह, असे उपनिषदे सांगतात. या आत्म्याच्या जाणिवेच्या चार अवस्था आहेत.

  1. जागृती
  2. स्वप्न
  3. सुषुप्ती (गाढ निद्रा)

या तीनही अवस्थांचा अनुभव अनेकांना येत असतो.

  1. तुरीयावस्था म्हणजे या तिन्हीच्या पलीकडची चौथी अवस्था. (तिचा अनुभव केवळ योगी घेऊ शकतात) तीच समाधी अवस्था. तेव्हा ॐ मध्ये या चारही पातळ्यांचा निर्देश आहे.

अ म्हणजे जागृती
उ म्हणजे स्वप्नावस्था
म म्हणजे सुषुप्ती

ॐ चा उच्चार करताच एक प्रगाढ शांतता असते. हा अशब्द अंतर्नाद म्हणजे अ-मात्र ॐ किंवा आत्मा. आपल्या अस्तित्वाचा हा मूलाधार (शुद्ध चैतन्य) आहे.

ॐ चा उच्चार शक्य तेवढा सावकाश करावा.’अ’ चा उच्चार कंठातून (त्याचा उच्चार नाभीतून) ‘उ’ जिभेवर घोळवत चढत्या स्वरात शिखर (आरोह) गाठेपर्यंत आणि म ओठात शेवट. ‘म’च्या वेळी एक वळण आणि ज्या प्रमाणात चढला त्या प्रमाणात व वेळात उतार. ‘अमात्र ॐ’ सह तो हळूहळू हृदयाच्या पोकळीत स्पंदने घेत विलीन व्हावा.

ईश्वराचे अस्तित्व प्रत्येक ध्वनीत आहे हे सांगणारा ॐ हा सूक्ष्म कानांनीच ऐकता येतो. या ध्वनी बरोबर पंचमहाभूतांमध्ये स्पंदन होते. मंदिरात वाजणाऱ्या घंटे प्रमाणे ॐ मधील अ- उ- म हा निनाद असणारा ध्वनि शांतपणे आपल्या शरीरात जातो. सुषुम्ना नाडीतील हा शांत ध्वनी (अंतर्नाद) स्थूल कानांना ऐकू येत नाही. तोच अ- उ- म. तो निनादत जातो ‘सोsहम्’! ‘सः’ म्हणजे तो आणि ‘अहम्’ म्हणजे मी. तेव्हा ॐ हे माणसाला ईश्वराशी जोडण्याचे माध्यम आहे.

ईश्वराची नावे कितीही महान असली तरी त्यांच्या पूर्वी ॐ लावण्याची आवश्यकता आहे. कोणताही विधी किंवा पूजा करण्यापूर्वी गणेश पूजा करतात. त्याप्रमाणे सर्व पवित्र पठणापूर्वी ॐ म्हणणे आवश्यक आहे; स्वतः प्रणवाकार असलेल्या गणेशाच्या नामापूर्वीही ॐ आवश्यक आहे. आपण म्हणतो ‘ॐ श्री गणेशाय नमः’| जेव्हा नामाच्या पूर्वी ॐ जोडलेला असेल तर त्या नामाची किंवा मंत्राची शक्ती अनेक पटीने वाढते.

ओंकार पठणाचे विविध प्रकार

वैखरी – ध्वनीप्रक्रियेचा (पठणाचा) पहिला टप्पा. मन एकाग्र करण्यासाठी मोठ्या स्वरात पुनःपुन्हा म्हणणे.

मध्यमा– ध्वनि प्रक्रियेचा दुसरा टप्पा. ऐकू येत नाही पण ओठांची हालचाल होते. ध्वनी आणि शांतता यामधील टप्पा. पश्यंती- तिसरी अवस्था- निःशब्द. प्रयत्ना खेरीज मनातल्या मनात जप. उघड किंवा संवृत नाही.

परा – जप किंवा मंत्राची चौथी अवस्था. जप किंवा मंत्र याचे विस्मरण. केवळ त्याचा परिणाम राहतो. ही परमानंदाची तुरीय अवस्था.

जाणीवपूर्वक प्रयत्नातून ओंकाराचा सराव करावा. आपल्या इष्ट देवतेचे नाम ही त्याला जोडू शकतो. श्वासोच्छवासाप्रमाणेच ओंकार पठण हा आपला अविभाज्य भाग व्हायला हवा. ओंकार आपल्याला मुक्ती आणि अमृतत्त्व देतो आणि तो आपल्याला ईश्‍वराशी कायमचा जोडून देतो. भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायात अक्षर परब्रम्ह भगवान श्रीकृष्ण म्हणतात – “ॐ हे एकाक्षर म्हणत, माझं स्मरण करीत जो हे शरीर सोडून जातो त्याला परमपदाची प्राप्ती होते.”! ओंकार पठण ही आपली नित्याची सवय व्हायला हवी. आपला श्वास सखोल लयबद्ध आणि नियमित असल्याशिवाय आपले शारीरिक आरोग्य, वेदना, मनःशांती आणि स्वास्थ्य नीट राहत नाही. ओंकार पठणामुळे आपला श्वास नियमित होण्यास मदत होते. तसेच त्यामुळे मनःशांती व स्वास्थ्य मिळते. आपली एकाग्रतेची शक्ती आणि स्मरणशक्ती वाढते.

आज पासून ओंकार पठणाला आपला नेहमीचा मित्र करूया! आपले मन त्यावर झुलू दे! प्रत्येक ओंकाराबरोबर आपण बाबांच्या दिशेने एक पाऊल पुढे जात असतो. लवकर किंवा उशिरा पण त्यांच्या पदकमलाजवळ आपण निश्चित पोचणार आहोत आणि त्यांना सर्वात जवळचे आणि सर्वात आवडते होणार आहोत!

ॐ कारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगीनः|
कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः|

अनुस्वारासह असलेल्या ॐ चे योगी नित्य ध्यान करतात. ते ध्यान इच्छा पूर्ण करणारे आणि मोक्ष देणारे आहे. त्या ॐ स्वरूपाला आमचे वंदन असो. जय गुरु ओमकार जय जय सद्गुरू ओमकारा!

ॐ तुमच्या हृदयात प्रतिध्वनित तसेच विश्वहृदयातही !

जय गुरु ओंकारा जय जय सद्गुरू ओंकारा

[/vc_column_text][/vc_column][/vc_row]