प्राश्नोत्तरा वहिनी
गुरूंसाठी संदर्भ : प्रश्नोत्तर वाहिनीमध्ये भगवान बाबांचे पंचमहाभूतांवर विवरण – प्रश्नोत्तर वाहिनी: आध्यात्मिक प्रश्नांना दिलेली उत्तरे
१. देह आणि इंद्रिये
प्रश्न: हा मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे कां म्हटले जाते, स्वामी?
उत्तर: कारण ती पंचतत्त्वांची म्हणजेच पंचमहाभूतांची उत्पत्ती आहे म्हणून.
प्रश्न: पांच तत्वे किंवा पंचमहाभूते निश्चित अशी कोणती आहेत?
उत्तर: आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी.
प्रश्न: ती कोठून निर्माण झाली आहेत?
उत्तर: पुढील प्रत्येक तत्त्व त्याच्या अगोदरच्या तत्त्वापासून निर्माण झाले आहे.
प्रश्न: मग, प्रथम तत्त्वाचे म्हणजेच एकंदरीत सर्व पांच तत्त्वांचे मूळ कारण काय आहे?
उत्तर: ब्रम्ह, अपरिवर्तनीय, स्थिर, आधार.
प्रश्न: पंचतत्त्वांमध्ये आणि या मानवी देहामध्ये काय संबंध आहे?
उत्तर: ब्रम्हापासून यत्न आणि महत (प्रयत्न आणि ब्रह्मांड) निर्माण झाले. त्यांच्यापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नि, अग्निपासून जल, जलापासून पृथ्वी निर्माण झाली आहे. आणि या पाचांच्या मिश्रणापासून हा देह बनलेला आहे.
प्रश्न: या देहामध्ये ही तत्त्वे कोणत्या रूपामध्ये राहतात?
उत्तर: हे प्रत्येक घटक पुन्हा पाच पट वाढले आहे आणि अशा रीतीने शरीराची रचना झाली आहे.
प्रश्न: पहिले आहे आकाश. या तत्त्वापासून बनलेल्या पांच गोष्टी कोणत्या आहेत?
उत्तर: ज्ञाता, मन, बुद्धी, अहंकार आणि पंचकम्.
प्रश्न: देहामध्ये या गोष्टी कशा दर्शविल्या गेल्या?
उत्तर: त्या ‘आतील इंद्रिये’ किंवा ‘अंतःकरण’ या नावाने ओळखल्या जातात.
प्रश्न: आता दुसरे तत्त्व वायू, याची पांच रूपे कोणती?
उत्तर: समान, व्यान, उदान, प्राण आणि अपान.
प्रश्न: आणि देहामध्ये त्यांना काय म्हणतात?
उत्तर: त्यांना पंचप्राण असे म्हणतात.
प्रश्न: तिसरे तत्त्वा आहे अग्नी, देहामध्ये याची पांच रूपे कोणती?
उत्तर: हे तत्व संवेदनावाहक अवयव बनले आहे. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक.
प्रश्न: त्यांना काय म्हणतात?
उत्तर: त्यांना ज्ञानेंद्रिये असे म्हणतात.
प्रश्न: आता, जलपंचक कोणते? म्हणजे जलतत्त्वापासून कोणती पांच रूपे तयार झालीत?
उत्तर: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध.
प्रश्न: त्यांना सुद्धा कोणते एखादे विशिष्ट नांव आहे काय?
उत्तर: त्यांना ‘पंचतन्मात्रा’ असे म्हणतात.
प्रश्न: आता पांचपैकी पृथ्वी तत्त्वा राहिले. शरीरामध्ये ते कोणत्या रूपात दृग्गोचर होते, स्वामी?
उत्तर: कंठ, हात, पाय, जननेंद्रिये आणि गुदा.
प्रश्न: त्यांना काय म्हणतात?
उत्तर: त्यांना ‘कर्मेद्रिये’ असे म्हणतात.
प्रश्न: अशा रीतीने पंच तत्त्वांपासून बनवलेल्या या मानव देहाला एकच देह न मानता वेदांती म्हणतात की, यात अनेक देह आहेत. ते खरे आहे काय?
उत्तर: ‘अनेक’ नाहीत, पण तीन देह मात्र आहेत. परंतु काहींच्या मते चार देह आहेत!
प्रश्न: अस्स! ते कोणते? त्यांना काय म्हणतात? तिसरा आणि चवथा?
उत्तर: स्थूल देह, सूक्ष देह, कारण देह. कांही लोक प्रतिज्ञेवर सांगतात की, आणखी एक चवथा देह आहे. त्याला ‘महाकारण’ देह असे सुद्धा म्हणतात.
प्रश्न: मग सूक्ष्म देह कोणता?
उत्तर: पंचज्ञानेंद्रिय पंचतनमात्रा, पंचप्राण, मन व बुद्धी या १७ प्रकारांनीं बनलेल्या देहाला ‘सूक्ष्म देह’ असे म्हणतात.
प्रश्न: याला फक्त सूक्ष्म देहच म्हणतात की, अजून दुसरे एखादे नावं आहे?
उत्तर: त्याला दुसरे नाव का नसावे? त्याला दुसरे नाव आहे. त्याला ‘तेजस’ असे देखील म्हणतात.
प्रश्न: आणि ती कोणत्या एखाद्या अवस्थेची खून आहे काय?
उत्तर: होय, ती आहे.
प्रश्न:आणि तिचे नाव काय आहे?
उत्तर: त्या अवस्थेला ‘स्वप्नावस्था’ असे म्हणतात.
प्रश्न: मग तुम्हाला असे म्हणायचे आहे काय की, स्थूल देहाला अशी कोणतीच अवस्था नाही?
उत्तर: अर्थात, तिलाही अशी अवस्था आहे.
प्रश्न: मग, मला त्या अवस्थेचे नाव सांगा.
उत्तर: तिला ‘जागृतावस्था’ असे म्हणतात.
प्रश्न: कारण देह म्हणजे काय?
उत्तर: येथे चित्त हे ज्ञात्याशी निगडीत असते.
प्रश्न: त्याला काय म्हणतात?
उत्तर: त्याला ‘प्रज्ञा’ असे म्हणतात.
प्रश्न: आणि अवस्था?
उत्तर: तिला ‘सुशुप्ति अवस्था’ असे म्हणतात. गाढ निद्रा.
प्रश्न: मला आता हे देखील सांगा की, चवथा महाकारण देह जो आहे याचा अर्थ ते काय सांगतात.
उत्तर: शुद्ध जाणीव, जिच्यामध्ये कोणत्याही तत्वाचे मिश्रण नाही, जो चिर साक्षी आहे; स्वयप्रकाशी आहे. याला वेदांती ‘महाकारण देह’ असे म्हणतात.
प्रश्न: इतर देहांप्रमाणे यालाही दुसरे कोणते नाव आहे काय?
उत्तर: याला ‘हिरण्यगर्भ’ असेही म्हणतात.
प्रश्न: आणि अवस्था?
उत्तर: तो अवस्थरहित आहे. जो जाणीवेच्या सर्व अवस्थांच्या पलिकडला आहे आणि म्हणून त्याचे ‘अक्षर पुरुष’ असे देखील वर्णन केले जाते.
प्रश्न: पांच तत्त्वांमिळून बनलेल्या या स्थूल देहामध्ये कोणत्या तत्त्वापासून कोणत्या गोष्टींची उत्पत्ती होते.
उत्तर: पृथ्वी तत्त्वापासून – अस्थि, त्वचा, मांस, नाड्या (रक्तवाहिन्या) आणि केश.
प्रश्न: जल तत्त्वापासून ?
उत्तर: रक्त, मूत्र, लाळ, कफ आणि मेंदू.
प्रश्न: तेज (अग्नी) तत्त्वापासून?
उत्तर: क्षुधा, तृष्णा, निद्रा, आळस, मैथून.
प्रश्न: वायूपासून?
उत्तर: क्रियाशीलता, गती (हालचाल), वेग, लज्जा, भय.
प्रश्न: देहामध्ये आकाश तत्त्वाचे देखील असेच काही परिणाम होत असतील.
उत्तर: होय. लोभ, क्रोध, मोह, गर्व, द्वेष (ईर्षा)
प्रश्न: मानवाला अनेक प्रकारचे क्लेश असतात. होय ना? तेव्हा या पंचतत्त्वांच्या परिणामांचा या क्लेशांशी काही संबंध आहे काय?
उत्तर: तुम्हाला काही शंका आहेत असे दिसते. या सर्व गुणांचा गटच त्याच्या सर्व दुःखाचे कारण आहे. जरी हे क्लेश अनेक प्रकारचे दिसत असले तरी ते फक्त चारच प्रकारचे आहेत. त्यांना ‘वासना’ असे म्हणतात.
प्रश्न: त्या चार प्रकारच्या वासना कोणत्या?
उत्तर: शारीरिक, मानसिक, सांपत्तिक आणि लौंगिक वासना. जरी अजून काही प्रकारच्या वासना असल्या तरी शेवटी वरील मुख्य चार प्रकारच्या वासनांवरच त्या आधारित असतात.
प्रश्न: माणूस अहंकारामध्ये आपल्याच तोऱ्यात अंध बनतो. हा अहंकार काय आहे जो त्याला सारखा टोचत राहतो? अहंकाराचे किती प्रकार आहेत?
उत्तर: अहंकाराचे चार प्रकार आहेत. कुळाचा अहंकार, संपत्तीचा (श्रीमंतीचा) अहंकार, तारुण्याचा अहंकार, विद्वत्तेचा अहंकार. या शिवाय आणखी काही प्रकारचे अहंकार आहेत ज्यांचा समावेश याच गटात केला जाऊ शकतो. (बळाचा अहंकार, कलेचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार, कीर्तिचा अहंकार वगैरे).
[Source: Adapted from Prasnottara Vahini: Answers to Spiritual Questions Chapater 1 – The Body and the Indriyas