नमस्तेस्तु श्लोका – पुढील वाचन
नमस्तेस्तु श्लोका – पुढील वाचन
गोष्ट
देव आणि असुर अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करीत होते. त्यांना एकापाठोपाठ एक चौदा रत्ने मिळाली. मंथन चालू असताना समुद्रकन्या लक्ष्मी देवी प्रकट झाली. ती म्हणजे सौंदर्याचे साकार स्वरूप होती आणि अतिसुंदर आभूषणांनी सजलेली होती. तिच्या हातात वैजयंतीमाला (कमलमाला) होती. तिला पाहताक्षणी सर्व देव-असुरांना तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली. सगळे तिच्याकडे उत्सुकतेने पाहात राहिले. ती पति म्हणून कोणाची निवड करते इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. देवीने सगळीकडे पाहिले. पण त्यांच्यापैकी एकावरही तिचे मन बसले नाही. मग तिला श्रीविष्णु दिसले. ते शेषावर पहुडले होते व ऐहिक गोष्टींविषयी उदासीन होते. त्यांनी तिच्याकडे पाहाण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही. मग तिच्याविषयी अभिलाषा बाळगणे तर दूरच राहिले! ते निजानंदात निमग्न होते.
श्रीविष्णूंची ऐहिक गोष्टींविषयीची अनासक्ति पाहून ‘आपला पति होण्यास हेच योग्य आहेत’ असा लक्ष्मीने निश्चय केला. मग ती त्यांच्यापाशी गेली आणि हातातली माला त्यांच्या गळ्यात घालून पति म्हणून त्यांचा स्वीकार केला. अशा त-हेने साऱ्या समृद्धीचे अधिष्ठान तिने प्राप्त करून घेतले. कारण श्रीविष्णूंपाशी भाग्यश्री, राजश्री, जयश्री इत्यादी सर्व प्रकारच्या समृद्धी वसत असतात. विष्णुपत्नी झाल्याने लक्ष्मी शंखाची म्हणजे शब्दशक्तीची, चक्राची म्हणजे कालचक्राची, पद्माची म्हणजे सर्व प्राण्यांच्या मनांची व हृदयांची, गदेची म्हणजे विश्वरक्षणास समर्थ अशा बलाची स्वामिनी झाली. तेव्हापासून ती भगवंताची माया म्हणून प्रसिद्ध झाली. परम पुरुषाची प्रकृती म्हणून ऋषी आणि देवसुद्धा तिची आराधना करतात.
[Illustrations by Sainee, Sri Sathya Sai Balvikas Student]