रामसीतेचा दिव्य विवाह
रामसीतेचा दिव्य विवाह
जनक राजाला सीता नावाची एक कन्या होती. लहान असताना, एक दिवस ती तिच्या सख्यांबरोबर खेळत असताना, तिचे खेळणे घरंगळत एका मोठ्या पेटीच्या खाली गेले. त्या पेटीमध्ये शिवधनुष्य ठेवले होते. सगळ्यांनी ते खेळणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु व्यर्थ !
सीतेने तिच्या कोमल हातानी ती पेटी बाजूला सरकवली व खेळणे बाहेर काढले. ते पाहून जनक राजा विस्मयचकीत झाला आणि त्याने ठरवले की जो कोणी ह्या शिवधनुष्यास प्रत्यंचा लावेल,त्याच्याशी सीतेचा विवाह करायचा.
शिवधनुष्य यज्ञमंडपात आणल्यानंतर , जनकाने तेथील सर्व उपस्थितांना शिवधनुष्यास प्रत्यंचा लावण्यास आमंत्रित केले. विश्वामित्रांच्या आदेशानुसार , रामाने डाव्या हाताने पेटीचे झाकण उघडले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून,अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावित
– शाळेत शिक्षकांबरोबर वा अन्यत्र वडीलधाऱ्यांबरोबर असताना , आपण नेहमी कोणतेही काम करण्याआगोदर , रामासारखी शिक्षकांची वा वडीलधाऱ्यांची अनुमती मिळण्याची प्रतिक्षा केली पाहिजे.
अंतर्भूत मूल्ये – आज्ञाधारकता आणि गुरुंप्रती आणि वडीलधाऱ्यांप्रती आदर भाव
रामाने उजव्या हाताने धनुष्य उचलले आणि सहजतेने प्रत्यंचा लावली. त्यानंतर एक बाण लावून तो सोडण्यासाठी दोरी मागे खेचली. तेवढ्यात कर्णकर्कश आवाज झाला आणि धनुष्य तुटले.
जनक राजा विश्वमित्रांजवळ गेला व त्याने लोटांगण घातले आणि रामाकडे दिव्य शक्ती असल्याचे त्याने मान्य केले. त्याने त्याची कन्या सीतेचा विवाह रामाशी करण्यासाठी त्यांची अनुमती मागितली. ही बातमी तात्काळ दशरथास कळवण्यात आली. त्याने आनंदाने ह्या विवाहास अनुमती दिली व तो त्याच्या लवाजम्यासह मिथिलेला आला.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून,अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावित
जीवनामधील कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआगोदर ,आपल्या पालकांशी चर्चा करुन त्यांची अनुमती व आशिर्वाद प्राप्त करावेत.
अंतर्भूत मूल्ये – आज्ञाधारकता आणि पालकांप्रती आदरभाव.
चौघा भावांचा विवाह एकाच वेळी संपन्न झाला. रामाचा सीतेशी, लक्ष्मणाचा सीतेची बहिण उर्मिलेशी , भरताचा मांडवीशी आणि शत्रुघ्नचा सुकीर्तिशी विवाह झाला. ह्या तिघीजणी जनकाच्या भावाच्या कन्या होत्या. सर्वांनी ह्या विवाह सोहळ्याचा आनंद घेतला.