कैकयीचे दोन वर
कैकयीचे दोन वर
अयोध्येला परतल्यावर राम आणि सीता आनंदात जीवन जगत होते. राम लोककल्याणाची काळजी घेत होता. सदैव सर्वांना मदत करत होता. आणि कधीही त्याने मनाचे समतोलत्व गमावले नाही. दशरथ वयोवृद्ध झाल्याने त्याने राज्याची सूत्रे रामाकडे देण्याची इच्छा वसिष्ठांकडे व्यक्त केली व रामाच्या राज्याभिषेकाचे आदेश दिले. ह्या दरम्यान, भरत आणि शत्रुघ्न आयोध्येत नसून त्यांच्या आजोळी गेले होते. रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून तिन्ही राण्या अत्यंत आनंदीत झाल्या.कैकयीचे रामावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम होते, परंतु तिची दासी मंथरा मात्र ह्या बातमीने खुश नव्हती. भरताने राजा व्हावे असे तिला वाटत होते त्यासाठी तिने एक कारस्थान रचले. रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर कौसल्येला सर्व अधिकार प्राप्त होतील आणि ती कैकयीला तिची दासी बनवेल असे मंथरेने कैकयीला सांगून तिचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, कैकयी तिच्या ह्या कारस्थानास बळी पडली. तिचे मन संशयाने भरून गेले आणि तिने मंथरेच्या योजनेस मान्यता दिली.
गुरुंनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे व अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजेत.
कैकयी मूलतः सुस्वभावी स्त्री होती. परंतु जिला ती अत्यंत निष्ठावान आणि हुशार दासी समजत होती तिच्या विषारी सल्ल्याने कैकयीचे मन कलुषित झाले. म्हणून आपण आपल्या संगतीबद्दल नेहमी दक्षता बाळगली पाहिजे.
आपण कधीही आपल्या मित्रांनी सांगितलेल्या गोष्टींचे अंधपणे अनुसरण करु नये, किंवा ते जे सांगतात वा आपल्याला जे काही करायला सांगतात ते मान्य करु नये. मग तो आपला जिवलग मित्र असला वा आपला त्याच्यावर भरवसा असला तरीही. ह्यासाठी आपण आपल्या विवेकबुध्दीचा वापर करून आपल्यासाठी आणि आपल्या भोवताली असणाऱ्या सर्वांसाठी खरोखरच चांगले आहे का असा निकष लावून निर्णय घ्यावा.
अंतर्भूत मूल्ये- जीवनाचे ABC – कुसंगती टाळा (Avoid bad company) आणि सदैव सावधानता बाळगा (Always Be Careful). निर्णय घेण्याआगोदर विवेकबुध्दीचा वापर करा.
मंथरेने कैकयीला तिला दशरथाने दिलेल्या दोन वरांची आठवण करुन दिली. युद्धक्षेत्रामध्ये कैकयीने दशरथाचे प्राण वाचवले त्यावेळी दशरथाने हे दोन वर तिला दिले होते. जेव्हा दशरथ कैकयीस रामाच्या राज्याभिषेकाविषयी सांगायला गेले तेव्हा ती अत्यंत दुःखी आणि क्रोधित होती. राजाने तिला विचारले तेव्हा तिने त्यांच्याकडे दोन वर मागितले जे देण्याचे त्यांनी पूर्वी वचन दिले होते. भरताला राज्यपद मिळावे हा पहिला वर आणि रामाला १४ वर्षांकरता वनवासात पाठवावे हा दुसरा वर असे दोन वर तिने मागितले. हे ऐकून दशरथ अत्यंत व्यथित झाला व त्याची शुध्द हरपली. सकाळी जेव्हा त्यांचा महामंत्री सुमंत त्यांच्याकडे रामाच्या राज्याभिषेकाची सर्व तयारी झाली हे सांगण्यासाठी आला तेव्हा त्यांनी दशरथास विमनस्क अवस्थेत जमिनीवर पडल्याचे पाहिले. ताबडतोब रामाला बोलावून घ्या अशी सुमंतास कैकयीने आज्ञा दिली. राम आला व त्याने पित्यास त्यांच्या दुःखाचे कारण विचारले. परंतु उत्तर मिळाले नाही. कैकयीने दशरथाकडून मागून घेतलेल्या दोन वरांविषयी रामाला सांगितले. रामाने तात्काळ सुहास्य वदनाने ते स्वीकारले आणि पालकांच्या आज्ञेचे पालन करण्याचे वचन दिले. त्याने कैकयीमातेस विनंती केली की तिने भरताची कारकीर्द पित्यासाठी आनंददायी होईल हे पाहावे
गुरुंनी मुलांना ह्याविषयी स्पष्ट करुन सांगावे व अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत
एखाद्याच्या शब्दांचा आदर कसा करावा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वडिलांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी, रामाने ताबडतोब आयोध्या सोडण्याचे ठरवले.
ब) रामाने समतोल वृत्ती कशी दर्शवली. त्यांनी त्यांच्या मनाचा तोल गमावला नाही, न हे वर ऐकून तो क्रोधित झाला.
बाकी सर्वजण ह्या वार्तेने अस्वस्थ झाले होते परंतु राम शांत व स्थिरचित्त होता. गुरुंनी मुलांना सांगावे: तुम्ही दिलेला शब्द नेहमी पाळला पाहिजे. तथापि शब्द देताना सावधानता बाळगली पाहिजे कारण एकदा तुम्ही शब्द दिला की मागे फिरणे शक्य नाही.
जर तुम्हाला एखाद्या स्पर्धेत वा खेळामध्ये अपयश आले तर तुम्ही अस्वस्थ वा क्रोधित न होता प्रयत्न करुन स्वतःमध्ये सुधारणा घडवली पाहिजे.
अंतर्भूत मूल्ये – वचनांचे मूल्य/ प्रतिकूल परिस्थितीत मनाचा समतोल राखा.
त्याने दशरथ आणि कैकयीस वंदन करुन तो कौसल्येकडे गेला. ती वार्ता ऐकून लक्ष्मण अत्यंत क्रोधित झाला परंतु पित्याच्या आज्ञेचे पालन करणे हे त्याचे कर्तव्य आहे असे रामाने त्याला समजावले.
गुरुंनी मुलांना ह्याविषयी स्पष्ट करुन सांगावे: राम कसा आज्ञाधारक पुत्र होता, त्याने केवळ पित्याच्या आज्ञेचे पालन केले नाही तर आदर्श पुत्राचे वर्तन कसे असावे ह्याविषयी लक्ष्मणास उपदेश केला.
अंतर्भूत मूल्ये- पालक आणि वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचे पालन/ आधी केले मग सांगितले /आधी आचरण मग शिकवण
कौसल्येला रामबरोबर वनात जाण्याची इच्छा होती. परंतु पतीची सेवा करणे हे तिचे कर्तव्य आहे असे रामाने तिला’ सांगितले. भरताच्या राज्याभिषेकाचा तिने तेवढाच आनंद मानावा असेही त्याने तिला सांगितले. लक्ष्मणास रामाबरोबर वनात जाण्याची इच्छा होती. रामाने त्याला मान्यता दिली. सीतेने रामाबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर, वनातील जीवन अत्यंत खडतर असेल असे त्याने तिला समजावून सांगितले. तथापि सीतेने रामाबरोबर वनात जाण्याचा संकल्प केला.