भरतभेट
भरतभेट
अखेरीस ते चित्रकूटला पोहोचले. भरताने रामाच्या चरणी लोटांगण घातले. रामाला पाहून राण्यांना व इतर सर्वांना दुःख अनावर झाले. वसिष्ठांनी रामाला स्वर्गवासी पित्याचे अंतिम संस्कार करण्यास सांगितले. दोन दिवसानंतर त्या सर्वांना वनामध्ये राहण्याने सोसावे लागणारे कष्ट पाहून त्यांनी अयोध्येस परत जावे ह्यासाठी, रामाने वसिष्ठांना विनंती केली. कैकेयीने रामाकडे क्षमायाचना करण्याची संधी साधली. जे काही घडले ते त्याच्या इच्छेनुसार घडल्याचे रामाने तिला सांगितले. रामाच्या दर्शनाने सर्वांना आनंदाची प्राप्ती होत होती त्यामुळे कोणीही राम आणि सीतेला सोडून जाण्यास तयार नव्हते. सहाव्या दिवशी रामाशिवाय अयोध्येला परतण्याच्या कल्पनेविषयी भरताने पुन्हा एकदा रामापुढे त्याची नाखुशी व्यक्त केली. जर त्यांनी त्यांच्या पित्याच्या आज्ञेचे पालन केले तरच धर्ममार्गाचे अनुसरण होईल असे रामाने त्याला समजावून सांगितले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत.
जेव्हा आपण केलेल्या चुकीबद्दल आपल्याला पश्चात्ताप होतो आणि आपण ती चूक पुन्हा न करण्याचा शब्द देतो तेव्हा परमेश्वर त्याच्या दयाळू भावाने नेहमीच आपल्याला क्षमा करतो आणि अत्यंत प्रेमाने आपला स्वीकार करतो. आपणही आपल्या मित्रांबरोबर प्रेमळ आणि क्षमाशील असायला हवे .
अंतर्भूत मूल्ये- प्रेम म्हणजे देणे आणि क्षमा’ करणे. स्वार्थ म्हणजे घेणे आणि विसरणे.
गुरुंनी मुलांना हे ही सांगितले पाहिजे की रामाने कसे पित्याच्या मृत्यूनंतरही त्यांनी दिलेल्या वचनाचा मान राखून त्याचे पित्याप्रती असणारे प्रेम अजरामर केले. धर्माला (सदाचरणाला) उचलून धरण्याची अनिवार्यता दर्शवण्यासाठी त्याने राज्यावरील त्याचा हक्क सोडण्याचे ठरवले.
अंतर्भूत मूल्ये – पालकांप्रती आज्ञाधारकता/ तुमच्या शब्दाचा मान राखण्याचे मूल्य/ कोणत्याही भौतिक प्रतिष्ठेहून सदाचरण महत्त्वाचे आहे.
रामाने त्याच्या पादुका भरतास देऊन सांगितले की त्याने योग्य ती काळजी घेऊन १४ वर्षे राज्यकारभार चालवावा. भरत रामास म्हणाला की ह्या पादुका रामाचे प्रतिनिधित्व करतील आणि तो स्वतः केवळ रामाचा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार चालवेल. भरताने रामाच्या चरणी लोटांगण घातले व अयोध्येस परतण्यासाठी त्याची अनुमती घेतली.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत
भरत अयोध्येचे राज्य चालवण्याचा मानसन्मान स्वीकारु शकला असता व त्याच्याबरोबर येणाऱ्या ऐश्वर्याचा आनंद घेऊ शकला असता. तथापि लोभाच्या क्षुल्लक भावनेपासून अनासक्त राहून पद प्रतिष्ठा आणि सत्ता दूर सारली आणि केवळ त्या परिस्थितीत जे योग्य होते- (म्हणजेच रामाला अयोध्येस परत आणून त्याच्या हक्काचे पद त्याच्या स्वाधीन करणे) त्याचीच निवड केली.
अंतर्भूत मूल्ये- निर्णय घेण्याआगोदर विवेकबुद्धीचा वापर/ नेहमी सदाचरणाचा, धर्ममार्गाचा अवलंब करा.
ते अयोध्येस परतल्यानंतर, रामाच्या पादुका सिंहासनावर विराजमान करून राम वनवासाहून येईपर्यंत त्यांचे पूजन करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली. त्या दिवशी भरताने त्या पादुका त्याच्या मस्तकावर धारण करून तो सिंहासनापर्यंत गेला व अत्यंत आदराने त्याने पादुका सिंहासनावर प्रस्थापित केल्या. त्यानंतर त्याने संन्याशाची वस्त्रे धारण केली व तो नंदीग्राम नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये एका पर्णकुटीमध्ये व्रतस्थ जीवन जगत होता. तो मित आहार घेत होता व तपस्वी जीवन जगत होता.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत
गुरुंनी मुलांना भरताची त्याच्या बंधुप्रती असणारी भक्ती व त्याचा न्यायी भाव ह्याविषयी सांगावे. रामाने १४ वर्षांचा वनवास पूर्ण होण्याआगोदर अयोध्येस परतण्यास नकार दिल्यावर भरताने राम परत येईपर्यंत, केवळ रामाचा दूत म्हणून त्याच्या क्षमतेनुसार राज्यकारभार चालवण्याचे स्वीकारले.
गुरुंनी मुलांना पुढील मुद्दाही विशेष भर देऊन सांगावा. रामासारखे वनवासी आणि तपस्वी जीवन जगण्यासाठी त्याने घेतलेला संन्यस्त जीवन जगण्याचा निर्णय त्याची व्यवहारातील प्रामाणिकता दर्शवतो. आजच्या भौतिक जगात कौटुंबिक सदस्यांमधील कलह मोठ्या प्रमाणावर आढळतात. अयोध्येच्या ह्या राजपुत्रांमधील नाते प्रशंसनीय आहे.
अंतर्भूत मूल्ये- कुटुंबामधील बहीणभावांमधील नाते प्रेम आणि त्याग ह्यांच्या भक्कम पायांवर उभे असायला हवे.
जे तुमच्या हक्काचे नाही त्याची अभिलाषा धरु नका आणि जरी ते तुमच्या हक्काचे असेल तरी आपल्या प्रियजनांसाठी त्याचा त्याग करण्यात कोणतीही हरकत नाही. तुमच्या सर्व कार्यांमध्ये प्रामाणिक व्यवहार भाव विकसित करा मग ते क्रीडा , शिक्षण ,स्पर्धा इ. कोणत्याही क्षेत्रांशी संबंधित असो. गैरमार्गाने वा अन्यायाने संपादन केलेले यश अनुचित आहे. तसेच तुमच्या भोवतालच्या लोकांच्या नात्यातील सुसंवादित्व, मेळ जर त्या यशाने बिघडणार असेल तर तेही अनुचित आहे.
अवलोकन करा- तुमच्या शब्दांचे, कृतींचे, विचारांचे ,चारित्र्याचे आणि हृदयाचे.
हिरो बना ,झिरो नाही. (जो जीवनामध्ये न्यायी आणि सदाचरणी असतो तोच खरा हिरो )