वेदानुद्धरते श्लोका – पुढील वाचन

Print Friendly, PDF & Email
वेदानुद्धरते श्लोका – पुढील वाचन
स्पष्टीकरण

ही प्रार्थना महाविष्णूला केलेली आहे. जेव्हा जेव्हा भक्ताना अधार्मिकतेपासून रक्षणाची गरज पडली, तेव्हा तेव्हा त्याने अवतार घेतले आहेत. हे प्रभो! वेदांना वाचवून त्यांचे रक्षण करण्यासाठी तू मत्स्यावतार घेतलास. मग महाकूर्म होऊन बुडणारी पृथ्वी तू आपल्या पाठीवर उचलून धरलीस. महावराह म्हणून अवतार घेऊन आपल्या सुळ्यावर आधार देऊन जगाचे सरक्षण केलेस, नरसिंह अवतार घेऊन तू हिरण्यकशिपु राक्षसाचा वध केलास. मग वामनावतार धारण करून तू बलीला पाताळात ढकललेस नतर प्रभु रामाच्या रूपाने रावणवध केलास. कृष्णरुपात तुझा नांगर तू दुष्टांविरुद्ध वापरलास. जणू करुणेचा सागर असा तू बुद्धरुपाने अवतरलास. कल्कि होऊन तू दुष्टांचा नाश करणार आहेस. हे ईश्वरा! मी तुझ्या चरणकमलांना शरण येतो. श्रीहरीच्या दहा अवतारांचे वर्णन या श्लोकात केले आहे.

(1) वेदानुद्धरते: मत्स्यावतार

वेद म्हणजे ‘भगवंताचा आवाज’ आहेत. भगवंत म्हणतात: “जोपर्यंत वेद पूज्य, आदरणीय मानले जात आहेत आणि या जगात वाचले जात आहेत तोपर्यंत रक्षण करण्यास मी नेहमी इथे आहेच.” या वेदांमध्ये ईश्वराविषयी ज्ञान आहे. पाप आणि अज्ञान यांच्यामध्ये वेद बुडू लागले आणि ईश्वरविषयक ज्ञान नष्ट होऊ लागले, म्हणून भगवंत मत्स्याचे रूप घेऊन पृथ्वीवर आले. भगवंताला पाप नष्ट करायचे होते आणि चांगुलपणा टिकून राहावा असे वाटत होते.

ब्रह्माचे मानसपुत्र मनु हा थोर ऋषी होता. त्याच्यापासून मानवजात निर्माण झाली. भगवंताला पाप नष्ट करायचे होते. त्यावेळी मनु एका नदीच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करीत होते, एका छोट्या माशाच्या रूपाने भगवंत मनूसमोर आला. त्याने मनूला विनंती केली, मोठमोठे जलचर प्राणी आपल्यास खाऊन टाकतील म्हणून त्यांच्यापासून वाचवावे. मनूने त्या माशाला उचलले व एका छोटया भांड्यात ठेवले, पण तो मासा अशा विचित्र जातीचा होता की रात्रीत तो इतका वाढला की त्याला भांडे पुरेनासे झाले. म्हणून मनूने त्याला त्यापेक्षा मोठ्या भांड्यात ठेवले. पुन्हा रात्रीत तो एवढा वाढला की मनूला त्याला हौदात ठेवावे लागले. मग त्याने त्याला लहानशा तळ्यात सोडले, नंतर नदीत सोडले आणि शेवटी समुद्रात सोडले. त्या माशाला एक शिंग होते. मग तो मासा म्हणाला, “मनु, तू मला वाचविले म्हणून मी तुला आशीर्वाद देतो. लवकरच अशी वेळ येणार आहे की सर्व पापे नष्ट होऊन प्रलय होईल, पण मी तुला वाचवीन. एक होडी तयार कर आणि सर्व तऱ्हेच्या वनस्पती व प्राणी तिच्यात ठेव, योग्य वेळी तुला या जगात या सर्व गोष्टींची निर्मिती करावी लागेल. हे सर्व तयार ठेव, मी परत येईन.” मनुने सर्व तयारी ठेवली आणि तो दिवस आल्यावर ती होडी माशाच्या शिंगाला अडकवली. माशाने त्याला सर्वात सुरक्षित ठिकाणी नेले व सर्व पापे नष्ट होईपर्यंत त्याचे रक्षण केले. अशा तऱ्हेने भगवंताने मनूचे रक्षण केले व त्याचबरोबर अन्य प्राणी व उपयुक्त गोष्टींचेही रक्षण केले आणि त्याचबरोबर वेदांच्या ज्ञानाचा बचाव केला, त्या विशिष्ट कामासाठी त्या वेळी योग्य तो आकार त्याने धारण केला.

(2) जगन्निवहते: कूर्मावतार

अमृतप्राप्तीसाठी देव व दानव समुद्रमंथन करीत असताना एक वेळ अशी आली की मंदराचलाची रवी समुद्रात बुडू लागली. तेव्हा त्यांनी मदतीसाठी भगवान् नारायणाची प्रार्थना केली. भगवंत कूर्म रूप धारण करून अवतरला आणि त्याने आपल्या पाठीवर मंदराचल उचलून धरला. अशा रीतीने अमृतप्राप्ती होईपर्यंत त्याने समुद्रमंथन चालू ठेवले. ही गोष्ट चांगले व वाईट यांचा एकमेकांवर मात करण्याचा जो संघर्ष चालतो तो सूचित करते. मंदराचलाची म्हणजे अहंकार, वासुकी सर्पाचा दोर म्हणजे माणसाचे विषतुल्य मन, जेव्हा अहंकार व मन मिळून भवसागर घुसळतात तेव्हा त्या कृतीचा परिणाम म्हणून चौदा रत्ने प्राप्त होतात. या रत्नांपैकी काही चांगली व (हलाहलासारखी) काही अपायकारक असतात. जेव्हा दुष्परिणाम दिसतात तेव्हा माणूस खिन्न होतो. जर त्याने भगवंताची मदतीसाठी प्रार्थना केली तर भगवंत (कूर्माप्रमाणे) प्रकट होतो व त्याचे रक्षण करतो.

(3) भूगोलम् उद्विभ्रते: वराह अवतार

हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपु हे दोघे भाऊ होते. हिरण्यकश्यपु लहान होता. पण हिरण्याक्ष मात्र शक्तिशाली व आडदांड होता. त्याची आकृती भव्य व बळकट होती. त्याने उग्र तपश्चर्या करून वर मिळवला होता की तो फक्त द्वंद्वयुद्धातच (कुस्तीत, कोणत्याच शस्त्राचा वापर न करता केलेल्या लढतीत) मारला जाऊ शकेल. त्यामुळे त्याला मारणे फारच कठीण होते. हिरण्याक्षाच्या पापांच्या भाराने जग पापाच्या समुद्रात बुडू लागले (हिरण्याक्षाचे पाप इतके भारी होते की त्यामुळे जगातला चांगुलपणा जेरीस आला). त्यामुळे भगवंताला मानवी आकृतीऐवजी रानटी वराहाचे रूप घेणे भाग पडले. माणसाच्या रूपाने त्याला मारणे असंभव होते. (मानवी देहाचे सामर्थ्य मर्यादित असते). भगवंताने त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार मारले. त्या वेळी हिरण्यकश्यपु अगदीच लहान होता. पण नंतर त्याला समजले की आपल्या भावाचा भगवंताने वध केला आणि त्याला कोणत्याही शस्त्राने नष्ट करता येणार नाही असा वर असूनही एकाच कुस्तीत तो मारला गेला. तेव्हा त्याने सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने तपश्चर्या करून अमरत्त्वाचा वर मिळवायचा असे ठरवले.

(4) दैत्यं दारयते: नरसिंह अवतार

(प्रथम वरच्या वराहाच्या गोष्टीतील दुसरा परिच्छेदाचा उल्लेख करा). हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली व भगवंताला प्रसन्न करून घेतले. भगवंताने त्याला वर मागायला सांगितले. हिरण्यकश्यपु म्हणाला, “देवा, मला अमर कर.” भगवंताने उत्तर दिले, “कोणालाही अमरत्व देता येत नाही. अगदी भगवंताने जरी पृथ्वीवर जन्म घेतला तरी त्या शरीराला देखील मृत्यु येतोच. तू दुसरे काहीतरी मागू शकतोस.” तेव्हा हिरण्यकश्यपूने पुढील वर मागितले :

१. मातेच्या गर्भातून जन्माला आलेल्या कोणत्याही प्राण्याने मला मारू नये.
२. मला दिवसा किंवा रात्री मृत्यु येऊ नये.
३. कोणतेही शस्त्र मला मारण्यास समर्थ ठरू नये.
४. देव, मानव किंवा पशू यांनी मला मारू नये.
५. मी घरात किंवा घराबाहेर मारला जाऊ नये.
६. माझा मृत्यु जमिनीवर अथवा आकाशात घडू नये.

भगवंत ‘तथास्तु’ म्हणाला व अदृश्य झाला. हिरण्यकश्यपूला वाटले की आपण देवाला फसविले आहे आणि आपल्याला अमरत्व प्राप्त झाले आहे. त्याला सामर्थ्याचा माज चढला. तो ऋषींना सांगू लागला की आता त्यांनी श्रीनारायणाचे नाम घेणे थांबवावे व त्याऐवजी त्याचे नाम घ्यावे कारण तो आता स्वतः नारायणासारखाच आहे. ऋषींनी त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. कारण ते ज्ञानी होते. मग त्याने त्यांना तुरुंगात टाकले. अशा वर्तनाने तो आपल्या पापात भर घालू लागला. मग त्याला प्रह्लाद नावाचा मुलगा झाला. तो आस्तिक होता. तो दिवसभर नारायण, नारायण म्हणत असे. हिरण्यकश्यपूने त्याचा बापच देव आहे असे शिकविणारे शिक्षक नेमले. प्रह्लाद शिक्षकांचे ऐकून घेत असे परंतु भगवान नारायणाचीच प्रार्थना करीत असे. शेवटी हिरण्यकश्यपु इतका चिडला की त्याने प्रह्लादाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याने अनेक प्रयत्न केले. तथापि प्रत्येक वेळी भगवान नारायणाने प्रह्लादाला वाचविले. आपले प्रयत्न विफल झालेले पाहून हिरण्यकश्यपु अतिशय संतापला. एकदा नारायणाचे नाव घेत प्रह्लाद त्याच्या वडिलांपाशी आला. त्याक्षणी नारदमुनि तेथे हजर होते. ते म्हणाले, “हिरण्यकश्यपु, तुझं नाव न घेण्याबद्दल तू कित्येकांना तुरुंगात टाकले आहेस आणि पहा, प्रत्यक्ष तुझा मुलगा नारायणाचं नाम घेत आहे.” हिरण्यकश्यपूने रागाने प्रह्लादाला विचारले की त्याचा नारायण कुठे आहे? प्रह्लादाने उत्तर दिले की तो सगळीकडेच आहे. हिरण्यकश्यपूने रागाने एका खांबाकडे बोट दाखविले व विचारले, “या खांबात तो आहे?” प्रह्लाद म्हणाला ‘होय’, त्याने रागाने त्या खांबाला लाथ मारली आणि तो मोडला. खरोखर भक्ताचे शब्द खरे करण्यासाठी भगवंत नरसिंहाच्या रूपात प्रकट झाला. हिरण्यकश्यपूला थरकाप सुटला, पण प्रह्लाद मात्र घाबरला नाही. त्याने भगवंताच्या पायांवर मस्तक ठेवले. मग भगवंताने हिरण्यकश्यपूला पकडले. खोलीच्या उंबऱ्यावर जाऊन बसला व त्याने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतले. मग भगवंत म्हणाला, “हे पाहा, हिरण्यकश्यपु, मी तुझे सारे वर पूर्ण करीत आहे आणि तरीही तुला ठार करीत आहे. देवाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस, जरी तुझे सर्व वर पूर्ण झाले तरी तू अमर होऊ शकत नाहीस.”

१. मी गर्भातून जन्मलो नाही तर स्तंभातून आलो.
२. आता सकाळ नाही व रात्रही नाही. (संध्याकाळ आहे).
३. माझ्यापाशी शस्त्र नाही. (फक्त नखे आहेत).
४. मी देव, मानव अथवा पशू नाही. (तिन्ही एकवटले आहेत).
५. मी घरात नाही, घराबाहेरही नाही. (उंबऱ्यावर आहे).
६. मी तुला जमिनीवरही मारत नाही व आकाशातही मारत नाही. (तू माझ्या मांडीवर आहेस). असे म्हणून त्याने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून टाकले व त्याला ठार केले.

(5) बलिं छलयते:

वामनावतार बलि हा राक्षसांचा राजा होता तरी त्याच्या अंगी अनेक सद्गुण होते. तो अतिशय उदार होता व आपले वचन पाळणारा होता. तो भगवंताचा भक्त होता. त्याच्यापाशी एकच दुर्गुण होता. तो म्हणजे तो वडील मंडळींचे ऐकत नसे व शास्त्राज्ञा मानत नसे. हे त्याच्या अहंकारामुळे व गर्वामुळे असे.

अहंकारामुळे त्याला नेहमी असे वाटत असे की इतर कोणाहीपेक्षा ज्ञान त्याच्यापाशी आहे. भगवंताला आपल्या भक्तानी गर्व केलेला साहजिकच आवडत नाही. कारण नेहमी गर्वाचे घर खाली होत असते. आणि भगवंताला भक्तांचे अधःपतन व्हायला नको असते. म्हणून बलीला धडा शिकवावा व त्याचा गर्व नष्ट करावा असे भगवंताला वाटते. एकदा बलि यज्ञ करीत होता. भगवंत वामन रूप ब्राह्मणाचे रूप धारण करून आला व बलीला काहीतरी मागायचे असे त्याने ठरविले. (बलीने ओळखू नये व आपली मागणी पूर्ण करावी म्हणून भगवंताने वामनरुप धारण केले होते). भगवंत बलीला म्हणाला, ‘हे राजा, मला एक छोटीशी मागणी करायची आहे. माझी तीन पावले व्यापतील इतकी भूमी तू मला दे.’ बलिने त्याची विनंती मान्य केली. पण बलीचे गुरु शुक्राचार्य यांनी भगवंताला ओळखले आणि ही विनंती मान्य करू नये असे सांगितले. पण बलीने आज्ञा मानली नाही. तो म्हणाला, “मी एकदा शब्द दिला की त्याप्रमाणे वागत असतो.” आपले दान पुरे करण्यासाठी बली ब्राह्मणाच्या हातावर झारीने पाणी सोडू लागला. आपल्या शिष्याला वाचविण्यासाठी शुक्राचार्यांनी बारीक माशीचे रूप घेतले व तो झारीच्या नळीत जाऊन बसला. बलीच्या हातात तीक्ष्ण दर्भाची अंगठी होती. तिने झारीची नळी मोकळी करून त्याने ब्राह्मणाच्या हातावर पाणी सोडले. बलीकडून वचन मिळताच भगवंताने अवाढव्य आकार धारण केला. एका पावलाने त्याने सारा स्वर्गलोक व्यापून टाकला. दुसऱ्या पावलाने पूर्ण भूलोक व्यापला आणि मग त्याने बलीला तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले. बली भगवंताचा भक्त व बहश्रुत होता. त्यामुळे त्याने देवापुढे आपले मस्तक नमविले आणि म्हणाला, ‘हे देवा, ते माझ्या डोक्यावर ठेव. तू तसं केलंस तर मी धन्य होईन.’ म्हणून देवाने आपले तिसरे पाऊल बलीच्या डोक्यावर ठेवले व त्याला पाताळात ढकलले. देव म्हणाला, ‘हे बली, यापुढे तू पाताळाचे राज्य कर.’ (बलीला फक्त शिक्षा करण्यात आली, मारले नाही कारण त्याच्याकडे पुष्कळ चांगले गुण होते).

(6) क्षत्रक्षयं कुर्वते: परशुराम अवतार

परशुराम हा जमदग्नि ऋषींचा पुत्र होता. रेणुकादेवी त्याची आई होती. परशुराम हा भगवान शंकराचा अवतार होता. शंकराने जमदग्निला वर दिला होता की त्याचा पुत्र म्हणून अवतार घेईन. जमदग्नीला तीन मुलगे होते. त्यात परशुराम हा धाकटा होता. जमदग्नि ऋषी दुर्वासमुनींप्रमाणेच खूप क्रोधाविष्ट होत असत.

एक दिवस रेणुकादेवी नदीवर पाणी भरायल गेली होती. तेव्हा तिने तेथे काही गंधर्व जलक्रीडा करीत असलेले पाहिले. आपण आपल्या पतीबरोबर अशीच जलक्रीडा करावी असे तिला घरी परत येताना वाटले. तिच्या मनात आलेला विचार ऋषींना समजला आणि ते कोपाविष्ट झाले. (कारण ते मुनि होते व असल्या ऐहिक सुखांपलिकडे गेले होते). त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला आईचे मुंडके उडवायला सांगितले. ज्येष्ठ मुलगा ते करू शकला नाही. मग त्यांनी दुसऱ्या मुलाला सांगितले. पण तोही तसे करायला धजला नाही. शेवटी त्यांनी परशुरामाला सांगितले. तेव्हा त्याने कुऱ्हाड उचलून मातेचा शिरच्छेद केला. त्याच्या आज्ञाधारकपणाने ऋषी प्रसन्न झाले व त्यांनी त्याला काय हवे ते मागायला सांगितले. परशुरामाने मातेला परत जिवंत करण्याची मागणी केली. जमदग्नींना मग उमजले की क्रोधाविष्ट होणे चूक आहे आणि तपश्चर्या करून त्यांनी क्रोध ताब्यात आणला व शेवटी पूर्णतया सोडून दिला. त्या वेळी कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा राज्य करीत होता. तो भारी दष्ट व बलवान् होता.

एकदा परशुराम तपश्चर्येला गेला असताना राजाने जमदग्नींच्या आश्रमावर हल्ला केला व त्यांना ठार मारले. जमदग्नींनी क्रोध सोडून दिला असल्याने ते काहीच बोलले नाहीत. जेव्हा परशुराम परत आला तेव्हा आपल्या वडिलांचा मृत्यु झाला आहे हे त्याने पाहिले. परशुराम अत्यंत संतापला व त्याने कार्तवीर्यार्जुन राजाचा वध केला. हा राजा सहस्त्रार्जुन म्हणूनही माहीत होता. (कारण त्याला सहस्त्र बाहू होते). त्याकाळी सर्व अधिकार क्षत्रियांच्या हाती होते. त्यांना त्याचा गर्व होता आणि चुकीच्या गोष्टी करण्यासाठी ते आपल्या अधिकाराचा वापर करीत असत. त्यांचा नाश करून त्यांना धडा शिकविण्याची वेळ आता आली होती. तीन वेळा युद्ध करून परशुरामाने जवळपास सर्व क्षत्रियांचा निःपात केला. त्या वेळी इक्ष्वाकूची माता गर्भवती होती. (इक्ष्वाकु हा रघुवंशाचा पहिला राजा होता). म्हणून वसिष्ठ ऋषींनी तिचे व तिला होणाऱ्या मुलाचे रक्षण करण्यासाठी तिला एका गुहेत लपविले, कारण या वंशात पुढे दिलीप, रघु व दशरथ यांच्यासारखे महान राजे जन्माला येणार आहेत हे त्यांना माहीत होते. अशा तऱ्हेने सूर्यवंशाची सुरवात झाली. (कालांतराने रघुवंश म्हणून माहीत झाला). आता अवतारी परशुरामाचा अंतकाळ जवळ आला होता, पुढचा अवतार प्रभु राम हा दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला आला आहे हे त्याल माहीत होते. परशुरामाजवळ एक जबरदस्त धनुष्य होते. ते भगवान शिवाचे असल्याने दिव्य होते. ते त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी खास बनविलेले होते. परशुराम ते प्रभू रामाला देऊ इच्छित होता. कारण त्याच्याखेरीज अन्य कोणीही ते धारण करण्यास योग्य नव्हता. म्हणून तो रामासमोर आला व त्याने रामाला आव्हान दिले. प्रभु रामाने परशुरामाचे धनुष्य हातात घेतल्याबरोबर तो भगवान विष्णुप्रमाणे तेजाने तळपू लागला व परशुराम बलहीन झाला. नंतर आपले अवतारकार्य झाले आहे असे तो बद्रीला निघून गेला.

(7) पौलस्त्यं जयते: रामावतार

रावण हा पुलस्ति ऋषींचा मुलगा होता. म्हणून त्याला पौलस्त्य म्हणतात. त्याचा वध रामाने केला. पित्याने कैकयी राणीला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी राम वनात गेला. तिथे रावणाचा मामा मारीच राक्षस आला. तो सुवर्णमृगाचे रूप घेऊन आला. त्या सुवर्णमृगाच्या देखणेपणामुळे सीता आकर्षित झाली व तिने तो हरिण आणून द्यावा अशी प्रभुरामाला विनंती केली. त्या हरिणाचा पाठलाग करीत प्रभु राम वनात निघून गेला असता रावण साधूचे रूप घेतले व तो भिक्षा मागण्यास आला. सीता भिक्षा घालण्यास आली असता त्याने तिचा हात पकडला व तिला आपल्या रथाकडे खेचले. मग तो तिला आपल्या लंकाराज्यात घेऊन गेला. लंकेकडे जात असताना रामभक्त जटायू पक्षाने सीतेचा विलाप ऐकला आणि तिला वाचवण्यासाठी त्याने रावणावर हल्ला केला. व्हा प्रभु राम झोपडीकडे परत आला तेव्हा त्याला दिसले की सीता नाहीशी झाली आहे. त्याने अरण्यात तिचा शोध सुरू केला. त्याला वानरांचा हद्धपार झालेला राजा सुग्रीव भेटला. सुग्रीवाकडून त्याचा दुष्ट भाऊ वाली याची माहिती रामाला समजले. प्रभू रामाने सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळवण्यास मदत करण्याचे वचन दिले. वालीचा वध करून प्रभू रामाने सुग्रीवाला र बसविले. सुग्रीवाने त्याचा सेवक असलेल्या हनुमंताला सीतेचा शोध करण्यास पाठविले. हनुमंताने समुद्र ओलांडला व तो लंकेत पोहोचला. दुष्ट रावणाला शासन करण्यासाठी त्याने ती नगरी जाळली. नंतर सीतेचा निरोप घेऊन तो प्रभुरामापाशी पोहोचला. सुग्रीव व त्याचे सैन्य यांच्या मदतीने प्रभूरामाने रावणाविरुद्ध युद्ध पुकारले व त्याच्यावर हल्ला केला. युद्धामध्ये त्याने रावण व त्याचा दुष्ट भाऊ कुंभकर्ण यांचा वध केला. युद्ध संपल्यानंतर रावणाचा धाकटा भाऊ रामभक्त बिभीषण याला प्रभुरामाने लंकाधीश म्हणून राज्याभिषेक केला आणि सीतेसह राम अयोध्येस परतला.

(8)हलं कलयते: बलराम अवतार

बलराम हा कृष्णाचा मोठा भाऊ. वसुदेवाच्या रोहिणी या पत्नीपासून झालेला पुत्र. बलरामाला शेषाचा अवतार मानतात. बलरामाला हलधर असेही म्हणतात. हल म्हणजे नांगर. धर म्हणजे धरणारा. फक्त नांगर हेच बलरामाचे शस्त्र होते. वस्तुतः बलराम हा देवकीचा सातवा मुलगा होता. पण जर तो देवकीपासून जन्मला असता तर कंसाच्या हातून त्याला मृत्यु आला असता. म्हणून भगवंताच्या इच्छेनुसार वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात त्याचे स्थानांतर झाले. भगवान कृष्णाला गोकुळामध्ये बकासुर, धेन्वासुर, वृत्रासुर इत्यादी राक्षसांचा निःपात करण्यात त्याने अनेकवेळा मदत केली. कंसाच्या दरबारातील मल्ल चाणूर यालाही त्याने ठार केले. कृष्णावतारासाठी मार्ग सुलभ करण्यासाठी बलराम आला होता. कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर लगेच हा अवतार संपला. तो हिमालय पर्वतावर तपश्चर्येसाठी निघून गेला व तिथेच अदृश्य झाला.

(9) कारुण्यमातन्वते :

कृष्णावतार कृष्णजन्माची कथा सांगणे.

(10) म्लेच्छान् मूर्छ्यते :

कल्कि अवतार – (आपले भगवान साई)

भागवत पुराणात असे सांगितले आहे की कलियुगात कल्कि दक्षिण भारतात एका नदीच्या किनाऱ्यावर अवतार घेतील. त्याचे केस मेघमंडलासारखे मृदु व कुरळे असतील. ते चवीने लहान असून कृष्णवर्ण असतील. ते तांबडी कफनी परिधान करतील. ते कोणतेही शस्त्र धरणार नाहीत. ते पांढऱ्या घोड्यावरून रपेट करतील आणि त्यांचा घोडा सर्व दुष्टपणाचा आपल्या टापांनी तुडवून नाश करील. हा कल्कि अवता कोण असेल? ते आपले भगवान् साई आहेत. ते कोणतेही शस्त्र घेत नाहीत. ते शुचितारुपी पांढऱ्या घोड्यावरून जातात. त्यांच्या घोड्याचे चार पाय म्हणजे सत्य, धर्म, शांती व प्रेम हे आहेत. ते कलियुगातील दुष्टपणाचा निरास करीत आहेत. परमेश्वराचे १० प्रमुख अवतार आणि त्यांचे सनातन संदेश

१. मत्स्य – भ्रांतीच्या महाप्रलयातून ज्ञानाचा ठेवा परत प्राप्त करून घ्या.
२. कूर्म – स्वामी बनून आहे आणि परलोकातील जीवन अनासक्त वृत्तीने जगा.
३. वराह – शिस्त आणि भक्ती ह्या दोन सुळ्यांवर कर्तव्याचे ओझे वाह.
४. नरसिंह – तुमच्या अहंकाराने परमेश्वराचा महिमा दडवून ठेवू नका.
५. वामन – स्वतःला परमेश्वराचा चरणी समर्पित करा व चरण प्राप्त करा.
६. परशुराम – शरणागतीचा धडा शिका पाण्यात दुःख भोगा.
७. श्रीराम – जे काही तुमच्या जीवनात घडते ते प्रारब्ध व त्याला कसे सामोरे जात ते स्व प्रयत्न.
८. कृष्ण – परमेश्वराच्या हातातील साधन बनण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.
९. बुद्ध – स्वतःला परिपूर्ण बनवा म्हणजे इतरांना परिपूर्ण बनण्यासाठी तुम्ही सहाय्य करु शकाल.
१०. कल्कि -सत्य, सदाचरण, शांती, प्रेम आणि अहिंसा (सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा) ह्यावर जीवनाची वास्तु उभी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *