अहं वैश्वानरो भूत्वा-पुढील वाचन
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।।
(अध्याय 15, श्लोक 14)
मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा वैश्वानर अग्नी (जठराग्नी) आहे. चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण आणि अपान वायूशी सहयोग साधतो. बाबा म्हणतात, “वैश्वानराच्या रुपाने परमेश्वर आपल्या शरीरामध्ये वास करतो, आपण ग्रहण केलेल्या अन्नाचे तो पचन करतो आणि शरीराच्या विविध
अवयवांना ऊर्जा पुरवतो.
चावून खाण्याचे अन्न (भाकरी, पोळी) म्हणजे खाद्य, पिण्याचे अन्न (पाणी, दूध. फळांचे रस इ.) म्हणजे पेय, चारण्याचे अन्न (चटणी)जो पदार्थ आपण गिळून टाकतो म्हणजे लेह्य आणि चोखायचे अन्न (ऊस) म्हणजे चोष्य, असे चार प्रकारचे अन्न असते.
स्वामी चिन्मयानंद, एक गोष्ट सांगतात- लक्षणा राज्याचा एक राजा होता. तो अत्यंत धार्मिक आणि दयाळु होता. त्याचा मंत्री सत्यवृताही अत्यंत धार्मिक, बुध्दिमान आणि मुत्सद्दी होता. दोघांनी मिळून राज्यामध्ये शांती, आनंद व समृध्दी प्रस्थापित कली. राज्यातील प्रजाजनांमध्ये त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर भाव होता.
महान संतमहात्मे, कवी, पंडीत राजमहालामध्ये सत्संग देत असत. ह्या सत्संगात परमेश्वराचा महिमा आणि संतांची शिकवण ह्याविषयी चर्चा होत असे.
काही काळानंतर, त्या राजाचा तरुण, सुशिक्षित, आधुनिक विचारांचा पुत्र राजा बनतो. तो परमेश्वराचे गुढ जाणू शकत नाही. त्याला ते सर्व अर्थशून्य, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा वाटते. तथापि तो अत्यंत उदात्त अंतः करणाचा तरुण असतो. त्यामुळे सत्संग बंद करण्याच्या अंतिम निर्णयाप्रत येण्याआगोदर त्याला सत्य जाणून घ्यायचे असते.
तो महामंत्री सत्यवृतांना बोलावणं पाठवतो व त्यांना ३ प्रश्नांची खात्री पटेल अशी उत्तरे देण्यास सांगतो.
१) परमेश्वर कोण आहे?
२) परमेश्वर कोठे आहे?
३) तो काय करतो?
उत्तरं देण्यासाठी राजा त्याला ४१ दिवसांची मुद्दत देतो. ह्या तरुण राजाची खात्री पटवणे साधी सोपी गोष्ट नाही हे महामंत्री जाणतो.
ह्या अवघड कार्यास सुरुवात करण्यापूर्वी तो परमेश्वराची प्रार्थना करतो, “हे परमेश्वरा, ह्या तरुण मुलाला तुझी महिमा पटवून देण्यासाठी मला योग्य ती शक्ती दे.”
तो वयोवृद्ध मंत्री, संतांना, ऋषिमुनींना, आश्रमांना व मठांना भेटी देतो. परंतु कोणाकडूनही त्या तरुण राजाची खात्री पटेल अशी उत्तरं त्याला मिळत नाहीत.
त्यानंतर तो शास्त्र, पुराण, उपनिषदें वाचतो. मुदतही कमी, कमी होत असते.
दरम्यान त्याचा जो आचारी असतो तो त्याच्या मालकाची अवस्था पाहत असतो.
एक रात्री, परमेश्वर त्या आचार्याच्या स्वप्नात येऊन सर्व प्रश्नांची उत्तरे सांगतो.
उत्तरे देण्याचा दिवस उजाडतो. तो वृध्द ब्राह्मण आचारी मंत्र्याला सांगतो. “मी प्रश्नांची उत्तरं देईन.” तो दरबारात प्रवेश करतो आणि राजाला म्हणतो, “तुम्ही माझे शिष्यत्व स्वीकारले नाहीत तर मी तुम्हाला सत्याचे ज्ञान देऊ शकणार नाही,” राजा त्वरित त्याची अट मान्य करतो आणि ते दोघ त्यांच्या स्थानांची अदलाबदल करतात.
आता पहिला प्रश्न आहे,” परमेश्वर कोण आहे?”
आचारी सेवकास राजवाड्याच्या गोठ्यामधून काळ्या रंगाच्या गाईला घेऊन यायला सांगतो. ती गाय घेऊन आल्यानंतर त्याला गाईचे दूध काढण्यास सांगतो. तो सेवक ते ताजे निरसे दूध एका सुवर्णपात्रात घालून त्या आचार्याकडे देतो. आचारी ते पात्र राजाकडे देतो आणि विचारतो, “हे राजन, आपण त्या पात्रातील दूध पाहिले का?”
“हो, पाहिले.”
“ते कोणत्या रंगाचे आहे.?”
“ते शुभ्र पांढऱ्या रंगाचे आहे.”
“ज्या गाईने हे दूध दिले ती कोणत्या रंगाची आहे?”
“काळ्या रंगाची आहे.”
“ह्या दूध निर्मितीसाठी ती गाय काय खाते?”
“गवत.”
“मग त्या काळ्या गाईने खाल्लेल्या हिरव्या गवताचं पांढऱ्या दुधात रुपांतर कोण करतं ? तुमचं विज्ञान हे करु शकतं का?”
आचारी म्हणतो, ” मित्रांनो ! काळ्या गाईने खाल्लेल्या हिरव्या गवताचं पांढऱ्या दुधात रुपांतर करणारी जी शक्ती आहे तीच परमेश्वर आहे!”
त्यानंतर तो दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो. “परमेश्वर कोठे आहे?” तो सेवकास एक सुवर्णथाळी, एक मेणबत्ती व एक काडेपेटी आणण्यास सांगतो. दरबारातील सर्व दारंखिडक्या बंद करण्यात येतात. दरबारात मिट्ट काळोख होतो. मेणबत्ती पेटवण्यात येते. मेणबत्तीच्या ज्योतीने अंधार नाहीसा होऊन प्रकाश पसरतो.”
“हे राजन, मेणबत्तीचा प्रकाश कोठे आहे?”
“सर्वत्र आहे.”
“मेणबत्तीचा प्रकाश जसा ह्या दरबारात सर्वत्र आहे तसाच परमेश्वरही सर्वत्र आहे.”
“आता तिसरा अंतिम प्रश्न “तो काय करतो?”
“विश्वामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो कर्ता करविता आहे, विविध नामारुपांद्वारे तो ते अमलात आणतो.
तो तरुण राजा अत्यंत कृतज्ञतेने उत्तरांमधील सत्याचा स्वीकार करतो.”