मैत्री व स्वार्थत्याग
मैत्री व स्वार्थत्याग
अनिल व सुनील हे दोघे कलकत्त्यामधील एका प्रसिद्ध शाळेत पाचवीत शिकणारे विद्यार्थी होते. ते जिवलग मित्र होते व एकमेकांवर सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम करीत असत, सुनीलचा वर्गात नेहमी प्रथम क्रमांक येत असे व अनिलला द्वितीय क्रमांक मिळत असे. दरवर्षी परीक्षा येत व संपत आणि या दोन मुलांना तेच अनुक्रम मिळत.
नंतर एके दिवशी सुनीलवर मोठाच आघात झाला. सुनीलची विधवा आई खूप आजारी पडली. अवघ्या जगात सुनीलच्या नात्याची ती एकमेव व्यक्ती होती. सुनीलने त्याच्या आईची रात्रंदिवस सेवा केली. तथापि तिचा थकवा दिवसेंदिवस वाढतच गेला. दोन महिने दुखणे सोसल्यावर एक दिवस तिने आपल्या प्रेमळ मुलाची काळजी घेण्याबद्दल देवाची प्रार्थना केली व ती मरण पावली. सुनील आता आपल्या मामा आणि मामी बरोबर राहायला लागला.
सुनील दोन महिने शाळेत जाऊ शकला नव्हता म्हणून जेव्हा वार्षिक परीक्षा जवळ आली तेव्हा त्याने आपला प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी कसून अभ्यास करायला सुरवात केली; परंतु अभ्यासात त्याच्या मृत आईच्या स्मृतीने त्याचे मन अत्यंत अस्वस्थ होत असे. प्रत्येकाला आणि सुनीललाही असे वाटत होते की त्या वर्षी अनिल प्रथम क्रमांक पटकावणार, परीक्षा संपली, शिक्षकांनी जेव्हा अनिलची उत्तरपत्रिका पहिली तेव्हा ते चकित झाले. विचारलेले प्रश्न जरी अगदी साधे होते तरी त्यापैकी काहींची उत्तरे अनिलने अजिबात लिहिलीच नव्हती. म्हणून गुरुजींनी अनिलला भोलावून घेतले आणि ते प्रश्न सोडविण्यात त्याला कोणती अडचण होती याची त्याच्यापाशी चौकशी केली,
एक क्षणभर अनिल गप्प राहिला, आपले रहस्य गुरुजींना संगावे की नाही याचा तो विचार करत होता, मग तो खिन्न आवाजात म्हणाला “गुरुजी तुम्हाला माहित आहे की आतापर्यंत दरवर्षी सुनील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या वर्षी त्याची प्रेमळ आई गेली. तो आता अनाथ झाला आहे. माझे आई वडील मात्र जिवंत आहेत. जर या परीक्षेत सुनीलचा प्रथम क्रमांक गेला तर तो आणखी एक निष्ठुर फटका त्याला बसेल, मी या दोन प्रश्नांची उत्तरं अशासाठी लिहिली नाहीत की त्यामुळे सुनीलला माझ्यापेक्षा अधिक गुण मिळतील आणि त्याला प्रथम क्रमांक मिळेल. त्यामुळे त्याचा उल्हास वाढेल व त्याला आनंदही होईल.” आणि त्यानंतर अनिल चिंतातूर होऊन म्हणाला, “पण गुरुजी, हे रहस्य तुमच्यापाशीच ठेवा. दुसऱ्या कोणालाही हे समजू देऊ नये, नाही तर जर सुनीलला कळलं तर मी जे केले आहे त्यामुळे तो अत्यंत दुःखित होईल. तो माझा मित्र आहे आणि मला तो नेहमी आनंदात असायला हवा आहे.”
शिक्षकांनी अनिलची पाठ थोपटली आणि ते म्हणाले, ” अरे माझ्या बाळा , आता आधीपेक्षाही मला थुझ जास्त अभिमान वाटू लागला आहे. मैत्री, प्रेम आणि त्याग हे तुझ्या मधील उत्तम गुण आहेत. एक दिवस या गुणांमुळे तू खूप मोठा माणूस होशील.”
प्रश्न:
- परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्याची संधी अनिलने का सोडली?
- आपले उत्तर गुप्त ठेवण्याची विनंती अनिलने गुरुजीना का केली?
- खरा मित्र कोण आहे व कोण नाही हे तुम्ही कसे ठरविता? तुमच्या अनुभवाची काही उदाहरणे द्या, आपल्या मित्रासाठी, भावासाठी बहिणीसाठी किंवा घरातील अन्य । कोणासाठी तुम्ही कधी कशाचा त्याग केला आहे काय असेल तर तुमचा अनुभव कथन करा.