सत्याने परमेश्वराची कृपा प्राप्त होते
सत्याने परमेश्वराची कृपा प्राप्त होते
आजकाल सेवा हा केवळ बोलण्याचा विषय झाला आहे, करण्याचा नाही. परंतु देवाला कोणी फसवू शकत नाही. तो सर्वज्ञ आणि जागरूक आहे.
एकदा शिवरात्रीच्या दिवशी परमेश्वर आणि पार्वती काशीनगरीवरून आकाशातून चालले होते. लाखो भक्त पवित्र घाटांवर व छोट्या गल्लींमध्ये जमले होते. विश्वेश्वराच्या मंदिराचे आवार भक्त स्त्री-पुरुषांनी भरले होते. सर्वजण शिवाची स्तुतिपर भजने म्हणत होते. पार्वती परमेश्वराकडे वळून म्हणाली, “ही लाखो माणसे पाहा. ते स्वर्ग निश्चितच जिंकतील. कारण त्यांची हृदये भक्तीने भरलेली आहेत आणि ते अतिशय पवित्र दिवशी येथे आहेत. मला शंका आहे की या सर्वांसाठी स्वर्गात जागा पुरेल का ?” शिव तिच्या अज्ञानाला पाहून हसले. ते म्हणाले, ” प्रत्येक जण जो शिवरात्रीच्या दिवशी काशीला येतो त्याला जर स्वर्ग प्राप्त झाला तर वाराणशीच स्वर्ग होईल. ही माणसे स्वार्थी वासनांनी इतकी भरलेली आहेत की यापैकी एकालाही स्वर्गात यायला रस्ता नाही. चोरी करुन पैसे मिळविलेला चोर जर तिकीट काढून वाराणशीला आला तर तो स्वर्गात पोहोचू शकेल का? पवित्रता, प्रेम व सत्य यामुळेच केवळ कृपेचे दरवाजे आनंदाने उघडू शकतील. माझ्या बरोबर ये. मी माझा सिद्धांत सिद्ध करतो की यांच्यापैकी फारच थोडे स्वर्गात प्रवेश करु शकतील. आपण या शहरात अशक्त वृद्ध भिकारी बनून जाऊया.”
मंदिराकडे जाणाऱ्या एका गल्लीत असे दृश्य दिसत होते की शेकडो लोक गंगाजल घेऊन विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन लिंगावर अभिषेक करण्याच्या तयारीत आहेत आणि एक वृद्ध पुरुष आपल्या वयस्कर पत्नीच्या मांडीवर झोपला आहे. अतिशय तहान लागलेल्या स्थितीत तो आपली जीभ गोलाकार फिरवीत आहे. आपल्या मरणासन्न पतीला पाणी देण्यासाठी पत्नी अतिशय करुणेने सर्वांना विनवीत आहे. ती ओरडत होती, “माझ्या पतीला जगण्यासाठी एक ओंजळभर पाणी द्यावे.” त्यांची खिन्नता दूर करण्यासाठी कोणीही भक्त पुढे आला नाही. काहींनी तिला कर्कश प्रार्थनेबद्दल शाप दिला. तर कहींनी तिला रस्ता सोडून दुसरीकडे जाण्यास सांगितले. थोड्यांनी सांगितले की मंदिरातील पूजा आटोपल्यावर ते त्याला पाणी देतील. मोठ्या संख्येने लोकांनी भिकेला गुन्हा ठरविण्यात यावा असे सांगितले आणि शिपायांनी गल्लीमधील हा त्रास संपवावा असे सांगितले. एक दोन माणसे हसली आणि त्यांनी शेरा मारला की लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही स्त्री चांगले नाटक करीत आहे. म्हाताऱ्या असहाय जोडप्याच्या व्यथांनी कोणाचेही हृदय विरघळले नाही.
शेवटी एक माणूस सहानुभूतीने कळवळून त्यांच्यापाशी आला. तो खिसेकापू होता. आपला दुष्ट व्यापार करण्यासाठी तो वाराणशीच्या घाटावर आला होता. तो त्या म्हाताऱ्या माणसाच्या शेजारी गुडघ्यावर उभा राहिला आणि त्याने आपला पाण्याने भरलेला वाळका भोपळा काढला. तो म्हणजे त्याची पाण्याची बाटली होती. परंतु त्याच्यात अन्य काही सद्गुण आहेत किंवा कसे याची पार्वतीला परीक्षा घ्यायची होती. म्हणून ती म्हणाली, “प्रिय बंधू, धन्यवाद! परंतु माझे पती तेव्हाच पाणी घेतील ज्यावेळी त्यांच्या तोंडात पाणी घालीत असताना तू आतापर्यंत केलेल्या चांगल्या गोष्टीचे वर्णन ऐकवशील. ते मरायला टेकले आहेत, म्हणून तुझ्या आयुष्यात तू केलेले एखादे सत्कृत्य त्यांना सांग आणि पाणी देताना त्याचं पुण्य तू त्यांना देऊन टाक.” त्या बनेल चोराने उत्तर दिले, “नाही. मी आजपर्यंत एकही सत्कृत्य केलेले नाही. दुसऱ्याचे दुःख बघून माझे हृदय द्रवले आहे पहिलीच वेळ आहे. पलिकडच्या देवळातील. काशिनाथ विश्वेश्वर या बाबतीत माझा साक्षीदार होईल.” असे म्हणून त्याने पवित्र जल अर्पण केले. त्याबरोबर शिव त्याच्या खऱ्या स्वरुपात प्रकट झाला व पार्वतीही देवीच्या स्वरुपात उभी राहिली. थिटे गोळा झालेल्या लाखो रिकाम्या हृदयाच्या लोकांच्यामध्ये तोच एकटा स्वर्गाला जाण्यास पात्र आहे अशी त्यांनी त्याची प्रशंसा केली. सत्य आणि प्रेम यांच्यामुळे त्याला भगवंताची कृपा प्राप्त झाली.
प्रश्न
- शंकर-पार्वतीच्या संवादाचे वर्णन करा.
- दैवी मातापित्यांनी कोणती योजना आखली?
- मदतीसाठी कोण पुढे आले?
- त्याने काय केले?