विवेकानंदांची प्रार्थना
विवेकानंदांची प्रार्थना
नरेन श्री रामकृष्णांना अत्यंत प्रिय होता आणि नरेनचेही रामकृष्णांवर मनापासून प्रेम होते. जेव्हा गुरु आणि शिष्यामध्ये अत्यंत शुद्ध असे प्रेमाचे नाते असते तेव्हाच शिष्याला परमेश्वराविषयी ज्ञान दिले जाते. गुरु शिष्यामधील परमेश्वराला जागृत करतो. नरेन श्री रामकृष्णांचा शिष्य बनला आणि तो अत्यंत आनंदी होता.
तो दक्षिणेश्वराकडे वरचेवर जात असे आणि परमेश्वराविषयी ज्ञानाचे श्रवण करत असे. त्या दरम्याने एक अत्यंत वाईट घटना घडली. नरेनच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर हलाखीची परिस्थिती ओढवली. कधीकधी त्यांना पुरेसे अन्नही मिळत नसे. नरेनला खूप वाईट वाटत असे. त्याने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.
नरेन अत्यंत बुद्धीमान विद्यार्थी होता. त्याने B.A. ची डिग्री मिळवली होती तरीही त्याला नोकरी मिळाली नाही. तो एका ऑफिसमाधून दुसऱ्या ऑफिसमध्ये हेलपाटे घालत होता. पण व्यर्थ! त्याच्या मनात आले, “मी जर काही पैसे कमावू शकलो नाही तर माझी आई, बहिणी आणि भावाचे कसे होईल?”
एक दिवस त्यांनी हे सर्व श्री रामकृष्णांना सांगितले.
“नरेन, आज मंगळवार आहे, जे काही तू आज मातेकडे मागशील ते ती तुला प्रदान करेल. तू तिच्याकडे मदत मागू शकतोस.” श्री रामकृष्ण त्याला म्हणाले.
त्या दिवशी संध्याकाळी, प्रार्थना करण्यासाठी नरेंद्र कालीमातेच्या मंदिरात गेला. तो तेथून परत आल्यावर, श्री रामकृष्णांनी त्याला विचारले, “माता काय म्हणाली?”
“अरे! मी विचारायचेच विसरलो” नरेन एकदम मोठ्याने म्हणाला.
“तू विसरलास? लगेच परत जा!” श्री रामकृष्ण म्हणाले.
ह्यावेळेसही पुन्हा तसेच घडले.
तिसऱ्यावेळी नरेन परत आला. तेव्हा तो शांत वाटत होता. त्याने रामकृष्णांना म्हटले, “मी मातेकडे पैसे कसे मागू? ते राजाकडे जाऊन भोपळा मागितल्यासारखे होईल! मी तिच्याकडे भक्ती, निःस्वार्थ प्रेम आणि समजून घेण्याची शक्ती, ह्या गोष्टीच मागू शकतो!”
त्यानंतर श्री रामकृष्णांनी नरेनला सांगितले की त्याच्या कुटुंबाला कधीही जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा भासणार नाही. त्यानंतरच नरेनला असे वाटले की पैसे कमावण्याचे प्रयत्न न करणे हे त्याच्यासाठी योग्य होते. त्या रात्री, श्री रामकृष्णांनी नरेनला कालीमातेवर रचलेले एक सुंदर गीत शिकवले. नरेन रात्रभर ते गीत गात होता आणि तो गात असताना श्री रामकृष्ण गाढ ध्यानात बसले होते.
प्रश्न
- नरेन का दुःखी होता?
- श्री रामकृष्णांनी त्याला काय सल्ला दिला?
- त्याने कालीमातेकडे काय मागितले?
- त्याला जे हवे होते ते तो कालीमातेकडे का मागू शकला नाही?
- त्यानंतर रामकृष्णांनी काय केले?
[स्त्रोत- Stories for children-II
प्रकाशक- SSSBPT Prashanti Nilayam]