नसिरुद्दीनचे बुद्धीचातुर्य
नसिरुद्दीनचे बुद्धीचातुर्य
मुल्ला नसिरुद्दीन हा तुर्कस्थानचा रहिवासी होता. तो त्याच्या बुद्धीचातुर्याबद्दल प्रसिद्ध होता. आजही त्याच्या स्मरणार्थ पशु उत्सव भरवला जातो.
एक दिवस नसिरुद्दीनने साबणाची एक वडी आणली व त्याच्या पत्नीस त्याने त्याचा शर्ट धुण्यास सांगितला. त्याची पत्नी शर्टाला साबण लावत असताना, अचानक एक मोठा कावळा वेगाने खाली आला आणि साबण घेऊन झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. मुल्लाची पत्नी अत्यंत क्रोधित झाली.ती मोठ्यामोठ्याने त्या कावळ्याला अपशब्द बोलू लागली.
नसिरुद्दीन घरातून धावत बाहेर आला. “काय झाले प्रिये?” त्याने विचारले. ती म्हणाली, “मी तुमचा शर्ट धुवत असताना ह्या दुष्ट कावळ्याने खाली येऊन साबणाची वडी पळवली.”
मुल्ला हसत हसत म्हणाला, “माझ्या शर्टाचा रंग बघ आणि त्या कावळ्याचा रंग बघ. तुला नाही वाटत माझ्यापेक्षा त्याला साबणाची जास्त गरज आहे. मी जाऊन दुसरा साबण घेऊन येईन, काळजी करू नकोस.”
एक दिवस रस्त्याच्या कडेला, अत्यंत दुःखी,कष्टी आणि हताश झालेला एक मनुष्य नसिरुद्दीनने पाहिला. तो त्याच्याजवळ गेला आणि त्याची विचारपूस केली.
तो मनुष्य म्हणाला, “भाऊ, जीवनात काहीही स्वास्थ्य उरले नाही. माझ्याकडे भरपूर दौलत आहे, चांगली पत्नी आहे, मुले आहेत पण जीवनात आनंद मिळवू शकलो नाही.”
एकही शब्द न बोलता नसिरुद्दीनने त्याची प्रवासी बॅग पळवली व तो वेगाने धाऊ लागला. त्या मनुष्याने बॅग परत मिळवण्यासाठी नसिरुद्दीनचा पाठलाग केला पण तो त्याला पकडू शकला नाही. त्याला काही काळ पळायला लावून नंतर ती बॅग त्याने रस्त्याच्या कडेला ठेवली व तो एका झाडाच्या मागे लपून पाहू लागला. त्या दुःखी कष्टी मनुष्याने ती बॅग रस्त्याच्या कडेला पडलेली पाहुन तो धावतच तेथे गेला आणि आनंदाने जल्लोष करु लागला.
“हाच आनंद आहे. तुला तो सापडला, हो की नाही?” नसिरुद्दीन त्याला म्हणाला.
प्रश्न
- नसिरुद्दीनची पत्नी क्रोधित का झाली?
- नसिरुद्दीनने काय उत्तर दिले?
- त्या मनुष्यास आनंद मिळवून देण्यासाठी नसिरुद्दीनने काय केले?
[स्त्रोत- Stories for children -II
प्रकाशक- SSSBPT Prashanti Nilayam]