इच्छा दूर करणे
इच्छा दूर करणे
इच्छा ही शेवटी सर्वनाशाचे कारण होते. समाधानाने कधी त्याचा अंत होत नसतो. ती समाधानावर स्वार होऊन राक्षस बनून त्या माणसाचा बळी घेते. म्हणून, इच्छा कमी करा, सतत कमी करत जा.
एक वाटसरू होता. तो चुकून एका कल्पवृक्षाखाली बसला. त्याला खूप तहान लागली होती. तो स्वतःशीच बोलला, “मला जर आत्ता कोणी थंडगार मधुर पाणी दिले तर!” आणि लगेच त्याच्यासमोर पेलाभर थंड पाणी आले. त्याला खूपच आश्चर्य वाटले, पण तो ते पाणी प्यायला. मग त्याने चविष्ट भोजनाची इच्छा केली आणि ते सुद्धा त्याला मिळाले. मग त्याला मऊ गादी असलेल्या पलंगाची इच्छा झाली. ते मिळाल्यावर त्याला वाटले हे सर्व बघायला आपली पत्नी येथे हवी होती. तर क्षणात ती सुद्धा समोर आली. बिचारा वाटसरू तिला भूत समजून ओरडला, “अरे बापरे! ही चेटकीण आहे!” त्याबरोबर ती चेटकीण झाली. नवरा भीतीने ओरडला, “आता ही मला खाणार” आणि खरंच तिने त्याला खाल्ले.
इच्छांच्या साखळीत माणूस गुदमरला जातो. इच्छांवर नियंत्रण ठेवा. अथवा दुसऱ्या गोष्टीची इच्छा करण्याच्या प्रवृत्तीवर ताबा मिळवा. परमेश्वराला सांगा, “तू माझ्यासाठी पुरेसा आहेस. मला इतर कशाची इच्छा नाही.” सुवर्ण अलंकाराची इच्छा कशाला करावी? ईश्वराविषयी तळमळ असायला हवी. गीता आपल्याला शरणागतीचा धडा शिकवते; आपली इच्छा पूर्ण होण्याची नव्हे, तर त्याच्या इच्छेनुसार होण्याची इच्छा करावी.
प्रश्न:
- वाटसरू विश्रांतीसाठी कुठे थांबला?
- त्याने कशा कशाची इच्छा व्यक्त केली?
- या लहानशा गोष्टीत तुम्ही काय बरं शिकलात?
[स्रोत: मुलांसाठी गोष्ट भाग २
प्रकाशक: श्री सत्य साई बुक्स अँड पब्लिकेशन्स ट्रस्ट, प्रशांति निलयम]