खरा ब्राह्मण कोण?
खरा ब्राह्मण कोण?
एक ब्राह्मण साधू अनेक वर्ष एका पवित्र नदीच्या किनारी राहून व्रतवैकल्य करीत असे. त्यामुळे तो स्वतःला अतिशय धार्मिक आणि पवित्र समजू लागला. त्याची पवित्रता म्हणजे सामान्य माणसापासून दूर राहणे. कारण त्याला वाटे की त्यांच्यात मिसळणे कमी दर्जाचे आहे. तसेच त्यांचा स्पर्श अथवा संपर्काने त्याचे पावित्र्य कमी होईल. तो विचार करीत असे की त्याचे पवित्र नदीमधील नित्य स्नान, क्त स्वतःच्या हाताने बनवलेले सात्विक भोजन सेवन करणे, दिवसाचे कितीतरी तास डोळे मिटून करीत असलेले वेद पठण आणि गावापासून दूर एकांतात राहणे, यामुळे तो शुद्ध आणि सद्गुणी झाला आहे. तथापि त्याच्या हृदयात कोणाविषयी यत्किंचितही प्रेमभाव नव्हता, ना गरिबांसाठी करुणा होती. त्याला कधीही कोणाला मदत करण्याची इच्छा होत नसे. त्याचे हृदय म्हणजे एखाद्या खोल खाईसारखे, जेथे फक्त काळाकुट्ट, भयाण अंधार, जिथे सूर्यप्रकाशाची उब आणि शुद्ध हवा नाही. त्याने कधीही कोणाला त्याच्या जवळपास फिरकू दिले नाही. जणू त्यांच्यापासून त्याला काही संसर्ग होईल. इतके तपस्वी जीवन जगत असूनही त्याचा स्वभाव रागीट होता त्याला क्रोध अनावर होत असे.
एकदा एक धोबी तेथे शेजारी नवीनच रहायला आला. त्याला त्या साधूविषयी काही माहीत नव्हते. तो नदीवर कपडे धुवायला आला आणि त्याचवेळी साधू जवळच्या झुडपामधे बसून, डोळे बंद करून स्तोत्र पठण करीत होता. धोबी दगडावर कपडे आपटून धुवत असताना साधूच्या अंगावर मळक्या कपड्यांचे पाणी उडाले. डोळे उघडले असता, साधूला दिसले की एका चांडाळ धोब्याने त्याची पवित्र जागा घाण पाणी उडवून अपवित्र केली आहे. त्याचा क्रोध अनावर झाला. तो त्याला खूप रागाने अपशब्द बोलला आणि त्याचे घाणेरडे काम थांबवून निघून जाण्यास सांगितले. बिचारा धोबी, जोरजोरात कपडे आपटत असल्याने, त्याला साधूचे बोलणे ऐकूच आले नाही. तो शांतपणे त्याचे काम करीत राहिला. धोबी दुर्लक्ष करीत असलेले पाहून साधू रागाने खवळला. तो त्याच्या अंगावर धावून गेला. त्याला निर्दयपणे बेदम मारले. मारून मारून त्याची अगदी दमछाक झाली. धोबी अगदी नि:शब्द झाला. अचानक झालेल्या हल्ल्याचे त्याला आश्चर्य वाटले. परंतु समोर एका ब्राह्मण साधूस पाहून तो शांतपणे म्हणाला, “महाराज, माझ्या गरीबाकडून काय बरे गुन्हा घडला?” साधूने रागाने उत्तर दिले, “काय झाले? माझ्या झोपडीजवळ येऊन माझ्यासारख्या महात्म्याच्या अंगावर घाण पाणी उडवायची तुझी हिम्मत कशी झाली?”
धोब्याला स्वतःचा अपराध काय हे न कळूनही नम्रपणे माफी मागून तो निघून जाऊ लागला. चांडाळाच्या संपर्काने अपवित्र झाल्याने साधू पुन्हा स्नान करण्यास निघाला. त्याने स्वतःला स्नानाने पुन्हा पवित्र केले. धोब्यानेही त्याचे अनुकरण केले. धोब्याने का स्नान केले हा साधूला प्रश्न पडला. धोबी म्हणाला, “तेच कारण ज्यासाठी तुम्ही स्नान केले”. साधूला अधिकच आश्चर्य वाटले. तो म्हणाला, “मी स्नान केले कारण मी एका नीच चांडाळ, धोब्याला स्पर्श केला, आणि म्हणून मी अपवित्र झालो. पण तू का अंघोळ केलीस? माझ्यासारख्या पवित्र माणसाच्या स्पर्शाने नक्कीच तुला विटाळ होऊ शकत नाही.”
धोबी शांतपणे उत्तरला, “महाराज, चांडाळापेक्षाही नीच तुमच्या मार्फत मला शिवला. कारण तुमचा भावनांचा उद्रेक, ज्यामुळे तुम्ही स्वत्व विसरून माझ्यावर हात उगारला, हे जन्मजात चांडाळापेक्षाही अस्वच्छ आणि शापित होते.
हे ऐकल्यावर साधूच्या डोळ्यावरील झापड दूर झाले. धोब्याच्या उत्तरावर तो विचार करू लागला. तो धडा शिकला जो त्याच्या तपस्या आणि साधनेनेही तो शिकला नाही. ते असे की एखाद्याच्या महालापेक्षाही, भावनांवर विजय मिळणे अधिक श्रेष्ठ. तसेच, स्वतःच्या क्रोधावर ताबा नसलेली व्यक्ती चांडाळापेक्षा कमी नाही.
साधूने नंतर स्वतः ज्याला धार्मिकतेच्या गुलामीचा गर्व होता आणि त्याच्या रागाच्या थराची तुलना एक धोबी, जो जुलूम होऊनही शांत, निर्विकार राहिला, त्याच्याशी केली. त्याच्या असे लक्षात आले की तो त्याच्या पेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे आणि दोघांमधे कोणी खरोखरीच चांडाळाची भूमिका केली.
प्रश्न:
- संन्यासी का रागावला आणि धोब्यावर ओरडला?
- धोब्याने काय केले?
- धोब्याने काय स्पष्टीकरण दिले?