सीतेचा शोध
सीतेचा शोध
वालीच्या मृत्यूनंतर सुग्रीवाचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. रामलक्ष्मण ऋष्यमुख पर्वतावर काळ व्यतीत करत होते. सीतेचा मोठ्या प्रमाणावर शोध घेण्याची सुग्रीव व्यवस्था करत होता. व्यवस्था करण्यास सुग्रीवाकडून वेळ लागत असल्याने रामलक्ष्मण अधीर झाले होते.
हनुमानाने सुग्रीवास त्याने दिलेल्या वचनाची आठवण करुन दिली आणि वानरसेनेस सीतेच्या शोधार्थ बाहेर पाठवण्याची आज्ञा देण्यास भाग पाडले. वानरसेनेचे चार गट करुन पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा चारी दिशांना पाठवण्यास सज्ज केले. ह्या गटाचे नेतृत्व करण्यासाठी चार शक्तिशाली वानरांची सेनापती म्हणून नियुक्ती केली. दक्षिणेकडे जाणाऱ्या गटाचा सेनापती युवराज अंगद होता. ह्या गटामध्ये हनुमान, जांबवान आणि नील ह्यांचा समावेश होता. तो गट प्रस्थान करण्या आगोदर रामाने हनुमानाला बोलवले. हनुमानच सीतेची बातमी घेऊन येईल असे त्याला वाटले. त्याने हनुमानाला त्याची स्वतःची मुद्रा असलेली अंगठी दिली व सीता भेटल्यावर त्याने तिला ती अंगठी द्यावी असे सांगितले. हनुमान रामाचा जिवलग दास बनला.
उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेला गेलेले गट एका महिन्यात परतले. त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळाले नाही. दक्षिणकडे गेलेला गट मात्र परतला नाही. ते टेकड्यांवर, जंगलामध्ये आणि गुहांमध्ये कसून शोध घेत होते. अखेरीस ते समुद्रकिनारी आले. समोर अथांग, विशाल महासागर दिसत होता. हा महासागर कसा ओलांडून जावा हे वानरांच्या बुद्धीपलीकडचे होते.
टेकडीच्या माथ्यावरून गरुडराज संपाती वानरांचे अवलोकन करत होता. तो सर्वांचे भक्षण करण्याच्या संधीची प्रतिक्षा करत होता. परंतु त्याने जेव्हा त्यांच्या संभाषाणात जटायूचे नांव ऐकले तेव्हा त्याने वानरांना त्याच्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. वानारांनी संपातीची भेट घेतली व त्यांच्या कार्याविषयी आणि रामाची कथा सांगितली. त्याने जेव्हा, त्याचा भाऊ जटायूची रावणाने हत्याकेल्याचे ऐकले तेव्हा त्याने आपल्या तीक्ष्ण दृष्टीने महासागरापलीकडे असणाऱ्या रावणाच्या लंकेमध्ये पाहिले. संपतीने रामाला सहाय्य केल्यानंतर त्याला एक वरदान लाभले. जटायूचे प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करताना त्याने गमावलेले पंख त्याला पुन्हा प्राप्त झाले. त्याला त्याचे पंख प्राप्त झाले आणि तो आनंदाने दूर उडून गेला.
आता त्यांना सीतेचा ठावठिकाणा समजला होता. तेथे कसे पोहोचायचे ह्याची वानरांमध्ये चर्चा सुरु झाली.त्यांच्या गटाचा सेनापती अंगद प्रत्येक वानरास त्यांच्या शक्तीचा अंदाज विचारत होता. प्रत्येकाने आपापल्या शक्तीची मर्यादा सांगितली. परंतु महासागर पार करण्याची सर्वांनी असमर्थता व्यक्त केली. हनुमानानेही मौन धारण केले होते. त्यावर जांबवानाने हनुमानाची पाठ थोपटून त्याच्यातील सुप्त शक्तींना आवाहन केले. हळूहळू हनुमानाला त्याच्या स्वतःच्या शक्तीची जाणीव झाली. मन वळवण्याचा बराच प्रयत्न झाल्यानंतर, हनुमान सीतेचा शोध घेण्यासाठी महासागर पार करुन जाण्याग्स तयार झाला. जांबवनने हनुमानाच्या धैर्याची प्रशंसा केली. हनुमानाने ते अवघड कार्य हाती घेण्यास मान्यता दिली. संपूर्ण पर्वत झाकून टाकेल एवढे त्याने आपले शरीर मोठे केले. त्याने रामाची आणि त्याचे पिता वायुदेव ह्यांची प्रार्थना केली आणि महासागरावरुन उड्डाण केले.
प्रश्न:
- सीतेचा शोध घेण्याची व्यवस्था करण्यासाठी सुग्रीवाने वेळ का घेतला?
- सीता लंकेत असल्याचे वानरांना कसे समजले?