हनुमानाचा लंकेत प्रवेश
हनुमानाचा लंकेत प्रवेश
महासागरावरून उड्डाण करताना हनुमानास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. परंतु समयसूचकतेने आणि धैर्याने त्यानी त्यावर मात केली आणि अखेरीस लंकेच्या किनाऱ्यावर उतरला. एका छोट्या पर्वताच्या माथ्यावर विश्रांती घेऊन त्याने नगरीचा आढावा घेतला. लंकेची भव्यदिव्यता आणि सौंदर्य पाहून तो थक्क झाला. तेथे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैनात असल्याने त्याने रात्री प्रवेश करण्याचे ठरविले.
रात्र झाली. त्याने स्वतःचा देह लहान वानराइतका संक्षिप्त केला आणि तो भिंतीवर चढणार एवढ्यात अचानक एका राक्षसीने त्याला पकडले. ती लंकेची संरक्षक देवता होती. हनुमानाने एक जोरदार ठोसा दिल्याने ती लटपटली व तीने नतमस्तक होऊन त्याला नगरात प्रवेश करण्याची अनुमती दिली. अशा तऱ्हेने त्याने खूप मोठया अडथळ्यावर विजय मिळवला. त्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्याला हा शुभ शकुन वाटला.
आता महालातून फिरून हनुमानाने कसून शोध सुरू केला. लंका ही दिव्य वास्तुविशारद विश्वकर्म्याने नियोजित केलेली आणि बांधणी केलेली एक भव्य नगरी होती. तेथे असंख्य मंदिरे, उपवने आणि इतर इमारती होत्या. तेथे वेदमंत्रोच्चारण, काव्यवाचन, कौशल्यपूर्ण नाजुक कला, संगीत, नृत्य इत्यादी सर्व प्रकारचे उपक्रम चालत होते. लंका नगरीचे वैभव पाहून त्याच्या मनात प्रशंसा व विस्मयपूर्ण आदर निर्माण झाला. त्याने खाजगी कक्ष, स्वयंपाकगृहे, उपहरगृहे येथे शोध घेतला. तेथे अनेक लावण्यवती स्रिया आढळल्या परंतु त्याला सीता दिसली नाही.
अखेरीस, तो रावणाच्या शयनगृहात गेला. तेथील वैभव पाहून तो आवाक झाला. महान तपस्व्यांनाही भुरळ घालतील अशा आकर्षक स्त्रिया हनुमानाने पाहिल्या परंतु त्याचे त्याच्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण होते. तो जितेंद्र होता. त्यामुळे त्याला सीतेचा शोध ह्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नव्हते.
रावण त्याच्या बिछान्यावर झोपला होता. त्याला पाहून हनुमानाला वाटले, “किती तेजस्वी व्यक्तिमत्व आहे.” सीतेचा शोध लागत नसल्याने तो महालातून बाहेर पडला व थोडा वेळ इकडे तिकडे फिरुन ‘अशोकवन’ नावाच्या उपवनामध्ये त्याने प्रवेश केला. रामाने त्याला योग्य मार्गदर्शन करावे. ह्यासाठी त्यांनी रामाची प्रार्थना केली. अशोकवनात अनेक राक्षसी त्याच्या दृष्टीस पडल्या. त्यातील काहीजणींची रूपे अत्यंत भयंकर होती. एवढ्या संख्येने त्या येथे काय करत आहेत असा विचार त्याच्या मनात आला. अचानक, त्याला एक गोरी, आकर्षक पण निस्तेज स्त्री एकटीच अशोक वृक्षाखाली बसलेली दिसली. तिने साधी वस्त्रे परिधान केली होती. तिचा केशसंभार तिच्या पाठीवर रुळत होता. तिचा चेहरा कोमेजलेला होता आणि अविरत अश्रुपातामुळे तिचे डोळे सुजले होते.
हनुमानाने जराही आवाज न करता त्या वृक्षावर उडी मारली व तो जवळून निरीक्षण करू लागला. तिच्या मुखातून येणाऱ्या रामनामात सुसंगती नव्हती. रामाचे नाम ऐकून तो रोमांचित झाला. त्या पवित्र स्त्रीच्या दर्शनाने त्याला निर्मल झाल्यासारखे वाटले. ती सीता असल्याचा त्याने त्वरित निष्कर्ष काढला. सीतेचा शोध लागल्याने तो अत्यंत उल्हासित झाला.
अचानक त्याला कुजबुज ऐकू आली. रावणाचे उपवनात आगमन होत असल्याची नांदी दिली जात होती. रावण त्याच्या स्त्रियांच्या लवाजम्यासह तेथे पोहोचला. सीतेसमोर उभा राहून, तिने त्याचा पती म्हणून स्वीकार करावा यासाठी त्याने आर्जव केली. सीता स्तब्ध होती. रावण अत्यंत क्रोधित झाला व त्याचे गंभीर परिणाम होतील असे त्याने सांगितले.
सीतेने अत्यंत तिरस्काराने त्याला म्हटले,
“माझा रामाशी विवाह झाला आहे. मी रामाची आहे. अन्य कोणत्याही पुरुषाचा मी विचारसुद्धा करत नाही. राम तुझी गय करणार नाही. त्याच्या शस्त्रांच्या अग्नीमध्ये संपूर्ण लंका बेचिराख होईल म्हणून जा आणि त्यांच्या चरणावर लोळण घे. तो अत्यंत उदात्त आहे तो तुला क्षमा करेल.”
तिच्या शब्दांनी रावण अत्यंत क्रोधित होऊन मोठ्याने ओरडला, “मी तुला अजून दोन महिन्यांची मुदत देतोय. तोपर्यंत जर तू माझा स्वीकार केला नाहीस, तर मी माझ्या सेवकांना, तुझे तुकडे-तुकडे करून, मला नाश्त्यामध्ये देण्याची आज्ञा देईल” क्रोधाने धुमसत तो महालात परतला.
सीतेच्या जन्मजात सद्गुणांनी तिला रावणाचा प्रतिरोध करण्याचे व त्याला स्पष्टपणे नाकारण्याचे धैर्य दिले. रामाच्या सान्निध्यासाठी स्वेच्छेने जंगलातील खडतर जीवनास प्राधान्य दिलॆ. रामाच्या सान्निध्यापुढे रावणाने देऊ केलेले राजसिक सुख व अगणित संपत्ती कस्पटासमान मानून तिने ते नाकारले.
हनुमान चटकन झाडावरून खाली उतरला व छोट्या वानराच्या रुपात
सीतेच्या जवळ गेला. त्याने रामाच्या जन्मापासून ते तो किश्किंधा नगरीत येईपर्यंत सर्व हकीकत कथन केली. एक वानर मानवी भाषेत कसा बोलू शकतो हे तिला समजले नाही. तो हात जोडून तिच्यापुढे उभा राहिला. ती त्याच्या अलौकिक शक्तीने प्रभावित झाली. परंतु तात्काळ तिला त्याच्याविषयी संशय आला. व ती तिरस्काराने त्याला म्हणाली, “मला माहित आहे तू रावण आहेस. मला फसवण्यासाठी तू विविध रूपे धारण करतोस पण लक्षात ठेव तुला कधीही यश मिळणार नाही.
हनुमान संभ्रमित झाला. तिने त्याच्याविषयी गैरसमज करून घेऊ नये ह्यासाठी त्याने याचना केली. “मी रामाचा सच्चा सेवक आहे. तुमच्यासाठी त्यांनी माझ्याकडे त्यांची अंगठी दिली आहे.” असे म्हणून त्याने अंगठी दिली. हातात अंगठी घेतल्यावर तिचे डोळे पाण्याने डबडबले. तिला श्रीराम साक्षात समोर उभे असल्यासारखे वाटले. नंतर हनुमानाने सीतेला जंगलातील वास्तव्यास घडलेल्या भेटीविषयी सांगितले. सीतेच्या मनात भावनांचा कल्लोळ झाला व तिच्या मनातील संशय निवळला.
लंकेमधून सीतेला घेऊन जाण्यासाठी हनुमानाने तिला त्याच्या खांद्यावर बसण्याची विनंती केली. परंतु सीतेने त्यास नकार दिला. ती म्हणाली, “हे प्रिय पुत्रा, एखाद्या चोरासारखी मी येथून पळून जाणार नाही. रामाने ते आव्हान स्वीकारले पाहिजे. त्यांनी लंकेवर आक्रमण करून, रावणाचा पराभव करून माझी मुक्तता केली पाहिजे. तरच तो खरा क्षत्रिय आहे.
तिथे हे शब्द ऐकून, त्याचा तिच्या विषयीचा आदर शतगुणित झाला. त्याने तिची रजा घेतली. तो जाण्यापूर्वी सीतेने, रामाला देण्यासाठी एक आभूषण त्याच्याकडे दिले.
हनुमानाने रावणास चिथावले
थेट समुद्रकिनाऱ्यावर जाण्याऐवजी हनुमानाच्या मनात एक खोडसाळ योजना आली. रावणाला चिथावणी देवून त्याला एक धडा शिकवावा अशी त्याची इच्छा होती. त्याने तात्काळ सुंदर अशोकवनाचा विध्वंस करण्यास सुरुवात केली. तेथील रक्षकांनी तातडीने रावणाच्या दरबारात धाव घेतली आणि एक अघोरी वानर, नगरीतील सुंदर अशोकवनाची नासधूस करत असल्याचे सांगितले. हे एक साधेसुधे प्रकरण आहे असे समजून, त्या वानरचा बंदोबस्त करण्यासाठी रावणाने सैनिकांची एक तुकडी तेथे पाठवली. परंतु हनुमानाने सर्व राक्षसांचा वध केल्यामुळे रावणाने काही सैन्यातील अधिकारी व त्यांच्या एका पुत्रास या मोहिमेवर पाठवले. त्या सर्वांचाही हनुमानाने वध केला.
रावणाने थोड्याशा काळजीने, इंद्रजितला (त्याचा पुत्र) पाठवले. इंद्रजितने वापरलेली सर्व अस्त्रे हनुमानाने परतवून लावली. अखेरीस इंद्रजितने ब्रह्मस्त्राचा वापर केला. ब्रह्माविषयी असणाऱ्या आदर भावनेतून, हनुमानाने स्वतःला त्या अस्त्राने बुद्ध करून घेतले.
त्याला रावणाच्या दरबारात नेण्यात आले. तेथे त्याला, तू कोण आहेस आणि तू लंकेत कशासाठी आलास? असे प्रश्न विचारण्यात आले. हनुमानाने सांगितले मी रामाचा सेवक आहे. तू त्याच्या पत्नीस कपट मार्गाने येथे आणले आहेस म्हणून मी तुला येथे इशारा देण्यासाठी आलो आहे की याचे गंभीर परिणाम होतील. रावणाने क्रोधायमान होऊन त्या वानरास मारण्याची आज्ञा दिली. रावणाचा बंधू बिभीषण यांनी हस्तक्षेप करून सांगितले की दूताला मारणे योग्य नाही. म्हणून हनुमानाच्या शेपटीला चिंध्या गुंडाळल्या व त्यावर तेल ओतून चिंध्या पेटवल्या.
हनुमान त्वरित समस्त नगरावरून उड्डाण करू लागला. तेथील सर्व इमातींना आग लागल्यामुळे त्या जळून खाक झाल्या. त्याने जळणारी शेपूट समुद्रात बुडवली. थोडा वेळ विचार केला तेव्हा त्याला त्याची चूक उमगली, “हे परमेश्वरा, मी काय मूर्खपणा केला. सीता मातेलाही अग्नीची झळ पोहचली असेल. तो अशोकवनात गेला. सीतेला तेथे शांतपणे बसलेले पाहून त्याला दिलासा मिळाला. त्याने पुन्हा एकदा तिची रजा घेतली आणि समुद्र पार करुन जाण्याच्या प्रवासास सुरुवात केली.
त्याने समुद्र पार केला. अंगद, जांबुवंन व इतरांनी त्याचे स्वागत केले. सर्वजण त्याच्या भोवती जमा झाले आणि त्याने लंकेतील हकीकत सर्वांना कथन केली. त्याच्या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. अंगदने सर्वांना ताबडतोब किश्किंधानगरीस जाऊन राम आणि सुग्रीवास ही सुवार्ता देण्याची आज्ञा दिली.
वानर किश्किंधेस पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून, ते खात्रीने त्यांच्या कार्यात यशस्वी झाल्याचे राम आणि सुग्रीवाने ओळखले. हनुमानाने रामापुढे नतमस्तक होऊन सीतेचे दर्शन, संभाषण व त्याचे लंकेतील अनुभव याविषयी सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर त्याने, सीतेने दिलेले आभूषण रामाला दिले. ते आभूषण पाहून आणि हनुमानाद्वारे सीतेने पाठविलेल्या संदेशाने रामाचे मन हेलावले. त्याने प्रेमाने वायूपुत्राला आलिंगन देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
प्रश्न :
- हनुमान रामाचा दूत आहे ह्याची त्याने सीतेला कशी खात्री पटवली?
- सीतेला संशय का आला? तिची खात्री कशी पटली?
- हनुमानाने रावणाला कोणता धडा शिकवला?