रावणाने हितकारक सल्ला नाकारला
रावणाने हितकारक सल्ला नाकारला
राम, लक्ष्मण आणि सुग्रीव लंकेवर आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये व्यस्त होते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी वानरसेना समुद्रकिनारी पोहोचली. त्यानंतर हा प्रचंड महासागर कसा पार करावा ह्यावर सर्वजण विचार करु लागले.
वानरसेनेच्या हालचालींविषयी रावणाला माहिती होती. रावण चिंताग्रस्त झाला व त्याने मंत्र्यांची एक सभा बोलावली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, “एका वानराने आपल्या नगरात कसा हाहाकार माजवला हे तुम्ही पाहिले आहे. त्याला रामाने पाठवले होते. राम आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. तुम्ही सर्वांनी तुमची मूल्यवान मते काय आहेत ते सांगावे.” निःसंशय रावणाचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता, म्हणून त्याचे मंत्री व सेना अधिकारी ह्यांच्या प्रोत्साहनाने तो आत्मविश्वास पुनर्प्राप्त करु इच्छित होता. त्याच्या भावना जाणून, एकेकाने आपल्या आसनावरुन उठून त्याच्या शक्तिची व अजिंक्यत्वाची प्रशंसा केली आणि राक्षससेना सहजपणे वानरसेनेस पराभूत करेल असे ते एकमुखाने म्हणाले. रावण राम-लक्ष्मणास मारेल ह्याची त्यांना पूर्ण खात्री होती.
मंत्र्यांच्या आणि सेनाधिकाऱ्यांच्या प्रशंसेने व त्यांच्या महाआशावादाने अहंकारी रावण उत्तेजित झाला.
परंतु ह्याला सहमती नसलेला एकच आवाज आला. आवाज होता भक्ति परायण आणि धार्मिक वृत्तीचा रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण ह्याचा. त्याने रावणाला एक नम्र प्रस्ताव सादर केला, “हे बंधु, मला तुझी वीरता आणि धैर्य ह्याविषयी अत्यंत आदर आहे. ह्या मूर्ख सेनाधिकाऱ्यांच्या प्रशंसेने तू. भरकटू नकोस. ते तुझी दिशाभूल करत आहेत. काहीही होवो, ते तुला खूश करु इच्छितात. तू रामाच्या पत्नीचे अपहरण करुन खूप मोठा गुन्हा केला आहेस. अजूनही उशीर झालेला नाही. तिला सन्मानपूर्वक परत पाठव. तो तुला क्षमा करेल. ह्याची मला खात्री आहे. तथापि तू जर गर्व आणि अहंकाराचा मार्ग स्वीकारलास तर लंकेवर आणि समस्त राक्षसकुलावर संकट ओढवेल यात शंका नाही.” त्याला बिभीषणाचा सल्ला आक्षेपार्ह वाटला. रावणाने त्याच्यावर भ्याडपणाचे व मात्सर्याचे आरोप केले आणि सर्वांनी राम आणि त्याच्या वानरसेनेबरोबर युध्द करण्यास तयार राहावे अशी त्याने घोषणा केली.
बिभीषणाने पुन्हा एकदा त्याची आर्जवे केली. परंतु त्याच्या अहंमन्यतेला ठेच पोहोचल्यामुळे त्याने विभीषणाचा सल्ला नाकारला. रावण त्याच्या सुवर्णरथातून बाहेर पडणार तेवढ्यात, त्याची पत्नी मंदोदरी तेथे आली व त्याच्या पायांवर लोळण घेऊन त्याला म्हणाली, “हे प्रभु, सीतेला रामाकडे परत पाठवा. सीतेने लंकेत पाऊल टाकल्यापासून येथे अशुभ घटना घडत आहेत. तुमच्या अंतःपुरात अनेक सुंदर स्त्रिया आहेत. एका सामान्य मानवी स्त्रीची अभिलाषा का धरता? रामाचे बाण अत्यंत शक्तिशाली आहेत असे मी ऐकले. निःसंशयपणे आपला विनाश करतील.”
रावण तिला दूर सारत म्हणाला, “हे अन्य काही नसून एका दुर्बल स्त्रीचे भय आहे. जर मी तुझा सल्ला मानला तर सर्वजण माझा उपहास करतील. ह्या क्षुद्र मानवाची मी पर्वा करत नाही.”
प्रश्न:
- रावणाच्या मंत्र्यांनी आणि सेनाधिकाऱ्यांनी रावणास कसे प्रोत्साहित केले?
- रावणाने बिभिषण आणि मंदोदरी ह्यांचा हितकारक सल्ला का नाकारला?