धर्मराज अत्यंत बुद्धीमान

Print Friendly, PDF & Email
धर्मराज अत्यंत बुद्धीमान

पांडवांचा थोरला बंधु धर्मराज म्हणजेच युधिष्ठिर हा धर्माचे मूर्तिमंत स्वरूप मानला जात असे. महाभारतामध्ये असे अनेक प्रसंग आहेत ज्यामधून हे स्पष्ट दिसून येते. तथापि त्याच्या धर्मदेवतेशी भेटीतील प्रसंगात, एका विचित्र परिस्थितीत यमराज स्वतः समोर उभे राहिले.

एकदा जंगलामध्ये हिंडत असताना, पांडव तहानेने व्याकुळ झाले होते. त्यांच्यामधील सर्वात लहान सहदेव एका झाडावर चढला व थोड्या अंतरावर त्याला एक सरोवर दिसले. त्याने त्याच्या भावांना तेथेच प्रतीक्षा करायला सांगून तो सरोवराच्या दिशेने निघाला. तो सरोवरापाशी पोहोचला. त्याची तहान भागवून तो त्यांच्यासाठी सुरईमध्ये पाणी घेऊन जाणार होता. तो त्या सरोवरात उतरणार तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला. “थांब! मी ह्या सरोवराचे रक्षण करणारा एक यक्ष आहे. माझ्या; प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय तू पाणी पीऊ शकत नाहीस.” त्या हुकमी आवाजाकडे सहदेवाने दुर्लक्ष केले व त्याने गटागट पाणी प्यायले. तात्काळ त्याला गुंगी आली व तो सरोवराच्या काठावर मृत्युमुखी पडला.

थोड्या वेळाने नकुल आपल्या भावला शोधत तेथे आला. त्याच्या बाबतीतही तेच घडले आणि त्याचप्रमाणे अर्जुन आणि भीमही तेथे आले व मृत्युमुखी पडले.

अखेरीस, युधिष्ठिर तेथे पोहोचला. त्याचे चारही भाऊ मृत्युमुखी पडल्याचे पाहून तो भयचकित झाला.

सावकाशपणे तो पाण्यापाशी गेला. तेव्हा त्याला यक्षाचा आवाज ऐकू आला. धर्मराज त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तेथेच थांबला. यक्षाने त्याला अनेक प्रश्न विचारले. त्यातील काही प्रश्न व धर्मराजाने दिलेली उत्तरे:

  1. संकटातून मनुष्याची कोण मुक्तता करते ?
    उ. धैर्य.
  2. कोणत्या शास्त्राच्या अभ्यासाने मनुष्य ज्ञानी होतो?
    उ. कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासाने मनुष्याला ज्ञान प्राप्त होत नाही. मनुष्यास सत्संगाने ज्ञानप्राप्ती होते.
  3. पृथ्वीहून अधिक उदात्त आणि अधिक सहनशील कोण आहे?
    उ. माता, जी आपल्या मुलांचे संगोपन करते. ती पृथ्वीहून अधिक उदात्त आणि अधिक सहनशील असते.
  4. वाऱ्याहुन वेगवान कोण आहे?
    उ. मन.
  5. प्रवाशाचा उत्तम मित्र कोण आहे?
    उ. त्याचे ज्ञान.
  6. आनंद म्हणजे काय?
    उ. सदाचरणाची परिणती म्हणजे आनंद.
  7. मनुष्य सर्वांना प्रिय केव्हा होतो?
    उ. जेव्हा तो त्याच्या अहंकाराचा त्याग करतो.
  8. अशी कोणती गोष्ट आहे जी गमावल्याने दुःख न होता आनंद मिळतो?
    उ. क्रोध.
  9. कोणत्या गोष्टींचा त्याग केल्याने मनुष्य श्रीमंत होतो?
    उ. इच्छा.
  10. पृथ्वीवरील महान आश्चर्य कोणते?
    उ. मनुष्य दररोज जीवांचा मृत्यू झालेला पाहतो तरीही ह्यात असलेले अमरत्त्व मिळावे अशी इच्छा ठेवतो. मनुष्य, ज्याला मृत्यू येणार आहे, तो मृत व्यक्तीसाठी शोक करतो. हे पृथ्वीवरील महान आश्चर्य आहे.

त्याच्या उत्तरांवर यक्ष खुश झाला व त्याने धर्मराजाला वर दिला. धर्मराजाने आपल्या चारही भावांपैकी एकास पुनर्जिवित करण्यासाठी निवडावे असे यक्षाने त्यास सांगितले. युधिष्ठिराने नकुलास निवडले.

“माझ्या पित्यास दोन पत्नी (राण्या) होत्या. मी जीवंत असल्याने, कुंतीमातेस तिचा एक पुत्र जीवित असल्याचे समाधान आहे. परंतु माद्रीमातेचे दोन्ही पुत्र मृत पावले आहेत म्हणून समतोल न्याय करण्यासाठी, मी नकुलला निवडले.” यक्षाचे तत्क्षणी यमराजात रुपांतर झाले. त्याने धर्मराजाच्या उदात्ततेची व बुध्दिमत्तेची प्रशंसा केली. त्याने सर्व पांडवांना पुनर्जीवित करुन यश आणि आनंद प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद दिले.

प्रश्न-
  1. सरोवरापाशी चार पांडव मृत का पावले?
  2. धर्मराजाने त्याची बुद्धिमत्ता कशी दर्शवली?
  3. पुनर्जीवित करण्यासाठी त्याने नकुलास का निवडले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: