भाग दोन
भाग दोन
स्वामी लहानपणी सुंदर सुंदर कविता पण करीत असत. दुकानदार आपल्या मालाचा खप व्हावा म्हणून, जाहिरातीसाठी छोट्या कविता लिहून मागत आणि मुले ती छान तऱ्हेने म्हणत त्यामुळे विक्री भरपूर होत असे.
आपल्या गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचेही काम त्यांनी सुरू केले. गावात एक करनम नावाचा धनाढ्य सावकार होता. नीतीबाह्य आणि अनुचित असे त्याचे आचरण होते. पारंपरिक कपडे घालणे सोडून अतिशय मौल्यवान रेशमी वस्त्रे परिधान तो करी आणि आपल्या सोन्याच्या घड्याळाचा गर्व बाळगत गावात फिरे.
एक दिवस त्या सावकाराची पत्नी सुबम्मा, राजूला म्हणाली, “राजू तू सगळ्यांना उपदेश तर फार सुंदर करतोस मग माझ्या पतीला सन्मार्ग का नाही दाखवत ?’ त्यांच्या घरासमोर एक तुळशीचे झाड होते आणि करनम रोज सायंकाळी त्या झाडापाशी बसत असे.
सत्याने एक सुंदरसे गीत मधुरशा चालीवर मुलांना गायला शिकविले. मुलांनी त्या सावकाराच्या घरासमोर गीत गायन केले. त्याचा अर्थ असा –
आजच्या स्त्री-पुरुषांना झाले आहे तरी काय? पुरुष आपल्या डाव्या मनगटावर चामड्याचा पट्टा बांधतात आणि खूप गर्वाने फिरतात. अशा स्त्री-पुरुषांबद्दल तर आपण आदराने बोलूच शकत नाही. जर कोणी अनाचाराचा त्याग करणार नाही तर लोक त्याला बाहेर ओढतील आणि जोड्यांनी मारतील. त्या गीतात त्यांच्या हिटलरसारख्या मिशांचे सुद्धा वर्णन होते. हे सगळं ऐकून करनम अत्यंत चिडले आणि तत्काळ उठून घरात गेले. नंतर मुलांना बोलावून त्यांनी विचारले की, हे गीत कुणी लिहिले? मुलांनी थोडं बिचकतच सांगितलं की राजूने लिहिलयं. त्यांच्या मनातून त्यांना वाटतच होते की हे काम सत्याचेच असणार.
दुसऱ्या दिवशी त्यांनी सत्याला बोलावले. तो आला तेव्हा त्यांच्या मिशा काढलेल्या त्याला दिसल्या. राजूला ते म्हणाले की, सत्या, मुलांना असली गीते नको शिकवूस रे! तेव्हा सत्याने त्यांना गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला असे आचरण शोभत नाही असे सांगितले. स्वतःची चूक जाणवून आपण आता सदाचरणाने वागू पण सत्यानेही त्यांना त्रास देऊ नये असे करनम म्हणाले. आणि दोघांनीही आपले वचन परोपरीने पाळले. सुबम्मा मात्र खूप आनंदित झाली.
या गाण्यांमुळे एक मजेशीर घटना घडली. स्वातंत्र्य संग्रामाच्या दिवसातली ही गोष्ट. काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी सभांचे आयोजन करीत असे आणि ब्रिटिश पोलीस येऊन सभा उधळून लावीत. तेव्हा पक्षाच्या लोकांनी सत्याला विनविले की सद्यपरिस्थितीचे यथार्थ वर्णन ज्यात असेल अशी एक गीतरचना करून दे जी आम्ही बुक्कापट्टनमच्या सभेत सादर करू. सत्याने सुंदर सुंदर गीते रचली. आता काँग्रेसवाल्यांना याहून अधिक काही हवे होते. सत्याला त्यांनी बुक्का पट्टनम्ला आणले. मंचावर एक झुला लावला होता व रबराची बाहुली बाळ म्हणून ठेवली आणि मुलीचा वेष परिधान करून सत्या त्या झुल्याला झोका देत देत अंगाई गीत म्हणतोय असा तो देखावा होता. गीताचे शब्द होते,
‘अरे माझ्या तान्हुल्या नको रे रडू. स्वत:ला भारताचा सुपुत्र कसा रे म्हणवतोस? हिटलरने रशियावर आक्रमण केले आहे आणि रशिया प्रतिकार करण्यास असमर्थ आहे म्हणून का तू रडतोस? अरे नको रे रडू. एक वेळ अशी येईल की लाल सेना सुद्धा प्रतिकार करून नक्कीच बदला घेईल. आपल्या देशातल्या एकतेच्या अभावाबद्दल तुला वाईट वाटतय का? नको रडू. एक ना एक दिवस आपण सगळे एक होऊ आणि भारत एकतेच प्रतिक बनेल बघ.’ पोलीसवाले पण त्यात मग्न होऊन टाळ्या वाजवीत होते. ब्रिटिश ऑफिसर पण तिथे येऊन पोचले. गीताचा मधुर ध्वनी ऐकून आनंदाने टाळ्या वाजवून साथ देऊ लागले. तेलगुमधील ते गीत भले ही त्यांना शब्द समजले नाही. पण आनंदित मात्र करू शकले. सभा किती यशस्वी झाली ते सांगायला नकोच.
सत्या ज्यावेळी उरवकोंडा येथे शिकत होता त्यावेळी त्याने ऋष्पेंद्रमणिचा नकली वेष धारण करून अभिनय करून दाखवला. त्याचे असे झाले की शाळेचा वार्षिकोत्सव होता आणि त्यात ऋष्येंद्रमणि या नर्तिकेचा कार्यक्रम होता. शाळेच्या नवीन इमारतीसाठी रक्कम जमा करण्यासाठी तो ठेवला होता. परंतु शेवटल्या दिवशी ती येणार नाही असे समजले. मुख्याध्यापक तर चिंतामग्न झाले. त्यांनी तर प्रथम महिला अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पण निमंत्रण दिले होते. तिकिट विक्री पण झाली होती. अशा परिस्थितीत देव जणू शिक्षकांसाठी धावून आला. दुसरे कोण सत्याच! त्याने आश्वासित केले, “मी तिच्यासारखी वेषभूषा धारण करून तेच नृत्य करीन जे ती आज करणार होती.”
रिष्येन्द्रमणी अतिशय अवघड आणि कौशल्यपूर्ण नृत्य करण्यात तरबेज होती.
ती तिच्या डोक्यावर एक बाटली ठेवत असे, त्या बाटलीवर एक थाळी व त्यावर एक पेटता दिवा ठेवून ती नृत्य करत असे आणि मग नृत्य करताना खाली वाकून डोक्यावरील एकही गोष्ट ना पाडता ती जमिनीवर ठेवलेला रुमाल उचलत असे.
नर्तकीसारखी वेषभूषा करून आणि पायात घुंगरू बांधून एका जुन्या गाडीतून ते आले आणि घोषणा झाली ‘नर्तकी ऋष्येद्रमणि येत आहे. लोक एकदम सजग झाले सत्याने घुंगराच्या रुणझुम आवाजात मंचावर प्रवेश केला. शिक्षकांनी त्याच्या डोक्यावर एक बाटली, त्यावर ताटली आणि वरती जळता दिवा ठेवला. हे सर्व प्रेक्षकांसमोर करणे जरूरीचे होते. नाहीतर ते चिकटविले आहे असे वाटले असते. या सर्व करामतीसाठी ती नर्तकी प्रसिद्ध होती.
सरते शेवटी सत्याने खाली पडलेला रुमाल उचलण्याची करामत दाखवताना रूमालाऐवजी सुई आणि तीही पापणीवर तोलली. लोक टाळ्या वाजवून थकत नव्हते. कलेक्टरांनी स्वतः मंचावर येऊन तिला पदक लावण्याचे जाहीर केले पण ते सत्याला नको होते. म्हणून त्याने भारतीय परंपरेचा दाखला देत आपण एक स्त्री असल्याने कृपया पदक हातात द्यावे असे विनविले.
जिल्हाध्यक्षा तर इतकी प्रसन्न झाली की दुसऱ्या दिवशीच्या पारितोषिक वितरण समारोहात नर्तकीला साडी भेट देण्याची इच्छा तिने प्रदर्शित केली. कारण तिच्यामुळे शाळेला अमाप पैसा मिळाला होता. ऋष्येद्रमणिच्या नावाचा पुकारा होताच पँट घातलेला सत्या मंचाकडे जाऊ लागाल तेव्हा पोलिसांनी त्याला अडवले. आता मुख्याध्यापक स्वतः पुढे आले आणि सत्याला मंचावर घेऊन गेले. ते म्हणाले की काल जी आपण नृत्याची करामत पाहिली तो या लहान मुलाचीच होती. अध्यक्षानी अत्यंत प्रभावित होऊन सत्याला एकदम कडेवर उचलून घेतले आणि खरोखर जे अभूतपूर्व पुढे घडणार होते त्याची भविष्यवाणीच जणू तिच्या मुखातून निघाली. “तू या शाळेचाच काय पण देशाच्या गौरवास प्राप्त होशील.” जिथे जिथे ती गेली तिथे तिने या घटनेचा वृत्तांत कथन केला.