भज गोविन्दम्
भज गोविन्दम्
(गोविंदाला भजा-देवाला शोधा)
गोविंदाला भजा – देवाला शोधा – भज गोविन्दम्। ‘भज’ आणि ‘गोविंदम्’ या दोन शब्दांनी बनलेल्या या धृपदामध्ये भगवत्पाद श्री शंकराचार्यांनी वेदान्ताचा व धर्माचा संपूर्ण उपदेश मानवजातीच्या उद्धारासाठी जणू काही थोडक्यात आणला आहे. गोविंदाचे निवासस्थान असलेल्या आनंदसाम्राज्यात प्रवेश करण्याची आणि सध्या आपल्या जीवनात असलेल्या दुःखाचा अंत करण्याची चावी हे धृपद आपल्याला देते.
साध्या, गोड व सुबोध अशा एकतीस श्लोकांमध्ये आपल्याला सहज कळावे म्हणून घरगुती सादृश्य दाखवीत व उदाहरणे देत शंकराचार्य आपल्याला आपल्या जीवनाची भ्रममूलकता व निरर्थकता सांगतात आणि श्लोकाश्लोकांतून आपले अज्ञान, भ्रांती व मोह दूर करीत पडद्यामागून पडदे बाजूला करतात. म्हणूनच या स्तोत्राला ‘मोहमुद्गर’ असेही म्हणतात. ते आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करतात आणि आपल्याला अज्ञान, दुःख यांच्या गर्तेत खोल खोल भिरकावीत ते पैलू आपल्याला कसे अंघ व बद्ध करतात ते सांगतात. आपल्यापैकी प्रत्येकाने शाश्वतापासून अशाश्वत, असत्यापासून सत्य वेगळे कळावे म्हणून विवेकाची जोपासना करावी, ऐहिक आकर्षणे व गोंधळ यांच्याबाबत वैराग्य आचरावे, शाश्वत सत्य असलेल्या गोविंदाचे होण्यासाठी भक्ती करावी आणि अशा तऱ्हेने या इंद्रियगोचर जीवनातील दुःख व बंधनांतून सुटका करून घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
भारत किंवा जगाने आजतागायत जे तत्वज्ञानी निर्माण केले त्यांच्यांत जगद्गुरू आदिशंकराचार्य हे निर्विवादपर्ण सर्वांत मोठे होते. जगाच्या इतिहासात ते अजोड आहेत कारण त्यांच्या ठिकाणी तत्त्वज्ञ, भक्त, साक्षात्कारी, कवी आणि धर्मसुधारक या सगळ्यांच्या गुणांचे एकत्रीकरण झालेले होते. ते जरी बाराशे वर्षांपूर्वी होऊन गेले असले तरी भारत आणि जग या दोन्हींनाही आजही या अलौकिक आध्यात्मिक बुद्धिमंताचे जीवन व कार्य यांचा प्रभाव जाणवतो.
सदाचरण व धर्माधिष्ठित सर्व गोष्टी यांचा जेव्हा जेव्हा -हास होईल तेव्हा देव पृथ्वीवर अवतार घेईल या गीतेत दिलेल्या वचनानुसार ज्या वेळी भारतात नैतिक व धार्मिक अंदाधुंदी माजली होती तेव्हा शंकराचार्य भारतीय भूमीवर प्रकट झाले, शंकराचार्यांचा जन्म आठव्या शतकात झाला. त्या वेळी देशात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला होता पण त्याचे स्वरूप भगवान बुद्धाने शिकवलेल्या शुद्ध व साध्या नैतिक उपदेशापेक्षा अगदीच बदललेले होते. जैन धर्मही प्रभावी होता, त्याचा अनुयायी वर्गही मोठा होता. दोन्ही धर्म सर्वसाधारण आकलनानुसार म्हणजेच सामान्य माणसाच्या समजुतीप्रमाणे देवाची संकल्पना नसलेले होते. याचा परिणाम म्हणून नास्तिकता लोकप्रिय झाली होती व लोकांचा सामान्य संप्रदाय बनली होती. खुद्द हिंदुधर्मदेखील असंख्य संप्रदायांमध्ये विभागला गेला होता आणि प्रत्येक पंथ दुसऱ्या पंथाच्या विरोधी व असहिष्णू होता. देशातील धार्मिक सुसंगती नष्ट झाली होती आणि शिवाय शैवांची, शाक्तांची, गाणपत्यांची आणि भागवतांची व्रते व वामाचार यांच्यासारखी अनेक अनिष्ट बांडगुळे घुसली होती आणि ती धर्माची शुचिता व खरा आशय भ्रष्ट करीत होती. धर्माच्या शाश्वत तत्त्वांची उतरती कळा थांबविण्यासाठी, हिंदुघर्मांच्या पंथोपपंथांमध्ये वाढत चाललेला धार्मिक -हास, बेबनाव व मतभेद कमी करण्यासाठी आणि नैतिक, धार्मिक व पारमार्थिक सुसंवाद, सचोटी व पुनरुज्जीवन घडवून आणण्यासाठी देशातील सर्व विचारांचे संकलन करणे ही काळाची गरज होती. असले प्रचंड व अफाट कार्य करणे फक्त देवालाच शक्य होते……. आणि शंकराचार्य आले, त्यांनी ते कार्य स्वीकारले व सिद्धीलाही नेले!
जीवनाच्या बत्तीस वर्षांच्या अल्प कालावधीत शंकराचार्यांनी हिंदुधर्माच्या एकीकरणाचा महत्त्वाचा मूलाधार म्हणून अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञानाची दृढ स्थापना केली. त्यांनी देशात धार्मिक सुसंवाद, पारमार्थिक सुसंगती आणि नैतिक उन्नती घडवून आणली.