चांगली कानगोष्ट
चांगली कानगोष्ट
उद्दिष्ट:
हा एक असा मनोरंजक खेळ आहे, की ज्यामध्ये लक्षपूर्वक ऐकण्याची आणि परिणामकारक संवाद करण्याची कला मुलांच्या मनावर ठसते.
संबंधित मूल्ये:
सकारात्मक आणि प्रेरणादायी वाक्यातून मुलांची आकलनशक्ती, समज वाढवण्यासाठी हा खेळ साहाय्यभूत होतो.
आवश्यक साहित्य:
मूल्ये लिहिलेली पुठ्याची छोटी कार्ड्स.
गुरुंसाठी आवश्यक पूर्वतयारी:
- वचनांची यादी – सकारात्मक, मूल्याधिष्ठित आणि विनोदी मजेशीर वाक्ये
- वाक्ये लहान, सुटसुटीत असावीत. एका वाक्यात ४ पेक्षा जास्त शब्द नसावे. (उदा. सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, नेहमी मदत करा, कधीही दुखवू नका, तुमच्या पालकांवर प्रेम करा)
- मानवी मूल्यांच्या कार्डांचा संच.
खेळ कसा खेळायचा
- गुरुने मुलांना वर्तुळात खाली बसायला सांगावे. एक मूल गुरुंजवळ जाईल आणि गुरु त्याच्या कानात एक वाक्य कुजबुजेल.
- ते मूल आपल्या जागेवर जाईल आणि त्याच्या शेजारच्या पुढच्या मुलाच्या कानांत हळूच एक वाक्य सांगेल. याप्रमाणे त्यांनी ऐकलेले वाक्य मुले क्रमाने त्यांच्या शेजारी बसलेल्या मुलांच्या कानांत सांगतील.
- कोणालाही हे वाक्य मोठ्याने सांगण्याची परवानगी नाही.
- फक्त गोलात बसलेल्या शेवटच्या मुलाने ते मूळ वाक्य मोठ्याने सांगायचे आहे. यानंतर ज्या मुलाने खेळाला सुरुवात केली, तो ते मूळ वाक्य मोठ्याने सांगेल.
- जर शेवटच्या मुलाने वाक्य बरोबर सांगितले, (निदान साधारण अर्थ) तर तो गट मानवी मूल्याचे १ कार्ड जिंकेल.
- यानंतर वेगवेगळी वाक्ये घेऊन खेळ पुढे चालू राहील आणि प्रत्येक वेळी वेगळा मुलगा खेळाची सुरुवात करेल.
- यानंतर गुरूने मुलांबरोबर चर्चा करून या वाक्याचा अर्थ आणि त्याच बरोबर प्रभावी परस्परसंवादाचे महत्त्व त्यांना सांगावे.