गुरु नानक जयंती
गुरु नानक जयंती
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव ह्यांचा जन्म कार्तिक (ओक्टोबर /नोव्हेंबर) महिन्यात झाला. त्यांचा जन्मदिन म्हणजे गुरु नानक जयंती. १४६९ मध्ये लाहोरजवळील तलवंडी गावात त्यांचा जन्म झाला.
गुरु नानक जयंतीस पहाटेच्या वेळी गुरुद्वारापासून मिरवणूकीतून प्रभात फेऱ्या काढल्या जातात आणि वसहतींच्या भोवती श्लोकाचे गायन करत गोल फेरी मारतात. गुरु ग्रंथ साहिब ह्या पवित्र ग्रंथाचा ३ दिवस अखंड पाठ केला जातो. गुरु परंपरेनुसार उत्स्वाच्या दिवशी, ग्रंथ साहिब हा पवित्र ग्रंथ फुलांनी सजवलेल्या एका उंच बैठकीवर ठेवून संपूर्ण गावातून वा शहरातून त्याची मिरवणूक काढली जाते. पाच शस्त्रधारी रक्षक आणि पंज प्यारे निशान साहिब म्हणजे शीखांचा ध्वज घेऊन मिरवणुकीच्या अग्रस्थानी असतात. स्थानिक बँण्ड पथकाद्वारे वाजवले जाणारे धार्मिक संगीत मिरवणुकीचा एक विशेष भाग असतो.
त्यादिवशी प्रत्येक व्यक्तीस मिठाई व लंगर भोजन देण्यात येते मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असो! ह्या समाजसेवेमध्ये, कारसेवेमध्ये स्त्री, पुरुष, मुले सहभागी होतात. सर्वजण अन्न शिजवून गुरुच्या लंगरमध्ये पारंपरिक कडा प्रसादाबरोबर त्याचे वाटप करतात.
किर्तनासारखे विशेष कार्यक्रम ज्या गुरुद्वारांमध्ये आयोजित केले जातात तेथेही शीख लोकं भेट देतात. उत्सव अधिक उत्साहपूर्ण बनवण्यासाठी गुरुद्वारातील घरांवर दिव्यांची रोषणाई करतात.