वर्गामध्ये इच्छांवर नियंत्रण ह्याच्याशी संबंधित खेळ कसा खेळावा ?
- गट १ च्या मुलांना त्यांच्या आवडीची खेळणी वर्गामध्ये घेऊन येण्यास सांगावे.
- जमिनीवर वर्तमानपत्रे पसरून ठेवावी.
- मुलांना त्यांची आवडती खेळणी वर्तमानपत्रावर ठेवण्यास सांगावे.
- आता खेळणी बाजूला काढून वर्तमान पत्राची अर्धी घडी घालावी.
- मुलांना त्या घडी केलेल्या वर्तमानपत्रावर खेळणी ठेवण्यास सांगावे. आता वर्तमानपत्र आधीच्या आकाराच्या तुलनेंत अर्धा आहे. आता ज्यांच्याकडे थोडी खेळणी आहेत त्यांची सर्व खेळणी त्या वर्तमानपत्राच्या घडीवर मावतील, परंतु ज्यांच्याकडे जास्त खेळणी आहेत त्यांनी जागेच्या उपलब्धतेनुसार १/२ खेळणी बाजूला काढावी लागतील. (एखादा मुलगा आपली सर्व खेळणी तेथे ठेवण्यासाठी इतर मुलांशी भांडतो का) याकडे गुरूंनी लक्ष द्यावे.
- आता पुन्हा एकदा सर्व खेळणी बाजूला करून वर्तमानपत्राची अर्धी घडी करावी. आता वर्तमानपत्राचा आकार अजून लहान झाला आहे. आता त्यावर मुलांना त्यांची खेळणी ठेवण्यास सांगावे. मुलांना त्यांची अजून खेळणी बाजूला काढावी लागतील.
- प्रत्येक मुलाचे फक्त एक खेळणे ठेवता येईल एवढीच जागा राहीपर्यंत हा खेळ चालू ठेवावा.
बोध:
मुलांशी चर्चा करून, मुलांनी काही विशिष्ठ खेळणी बाजूला काढण्याचे का ठरवले, त्यांना ती खेळणी खरंच हवी होती का? जर त्यांना ती खेळणी खरच हवी असतील तर मग ती ठेवण्यासाठी पुरेशी जागा का नव्हती ह्याविषयी गुरूंना माहिती घेता येईल. अखेरीस गुरु ह्या मुद्द्यावर विशेष जोर देऊन सांगू शकतील की जर आपण इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सराव केला तर आपण आपले अनेक कपडे, खेळणी, पुस्तके गरजूंना देऊ शकतो आणि तरी आंनदी व सुखावह जीवन जगू शकतो.