‘इच्छांवर नियंत्रण’ ह्या विषयांवरील दिव्य संदेश उतारे
अन्न वाया घालवू नका.
पैशाची उधळपट्टी करू नका.
वेळ वाया घालवू नका.
ऊर्जेचा अपव्यय करू नका.
निसर्गाचं शोषण करू नका.
खाली दिलेले उतारे भगवान श्री सत्य साई बाबांच्या दिव्य संदेशामधून घेतले आहेत. ज्यामध्ये त्यांनी इच्छांवर नियंत्रण कार्यक्रमाविषयी विवरण दिले आहे.
इच्छा म्हणजे कारागृह आहे.
‘इच्छांवर नियंत्रण’ चा अर्थ काय आहे? मनुष्य त्यांच्या अगणित इच्छांमुळे भ्रमित झाला आहे. तो स्वप्नांच्या दुनियेत जगतो आहे .त्याला परमतत्वांचे विस्मरण होत आहे. म्हणून हे महत्वाचे आहे कि आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून, त्यांच्यावर आपला ताबा असला पाहिजे. आपण पैशांची खूप उधळपट्टी करतो. स्वतःचा आनंदासाठी बेसुमार खर्च करण्याएवजी आपण गरीब लोकांना दिलासा मिळावा ह्यासाठी खर्च केला पाहिजे. हा “इच्छांवर नियंत्रण” चा खरा अर्थ आहे.
पैसे देणे हे गरजेचे आहे असा विचार करण्याची चूक करू नका. तुमच्या स्वतःच्या अगणित इच्छांची पूर्ती करत इतरांना देऊ नका. भौतिक इच्छा अस्वस्थ आणि अर्थहीन जीवनाकडे घेऊन जातात म्हणून तुमच्या इच्छा कमी करा. इच्छा म्हणजे कारागृह आहे. मनुष्याने त्या इच्छांच्या मर्यादा पाळल्या तरच तो मुक्त होऊ शकतो. केवळ जीवनावश्यक गरजांच्या इच्छा तुम्ही ठेवल्या पाहिजेत.
तुम्ही तुमच्या इच्छा कशा कमी करू शकाल?
प्रथम आपण अन्नाविषयी पाहू. जेवढे आवश्यक आहे तेवढेच खा. लोभ करू नका. तुम्ही खाऊ शकाल त्याहून अधिक अन्न घेऊन उरलेले अन्न वाया घालवू नका. कारण अन्न वाया घालवणे महापाप आहे. अतिरिक्त घेतलेल्या अन्नातून एखाद्याचे पोट भरू शकते. अन्न परमेश्वर आहे. जीवन परमेश्वर आहे आणि मनुष्याचा जन्म अन्नामधून झाला आहे, म्हणून अन्न वाया घालवू नका. अन्न हे मनुष्याचा, जीवनाचा, देहाचा, मनाचा व चारित्र्याचा मूलस्रोत आहे.
अन्नाच्या स्थूल भागाचा म्हणजेच प्रमुख भागाचा देहाद्वारे वापर केला जातो आणि टाकाऊ पदार्थ म्हणून उत्सर्जित केला जातो. अन्नाच्या अल्प भागाचे म्हणजेच सुक्ष्म भागाचे देहाद्वारे पचन केले जाते व रक्त म्हणून प्रवाहित होते. अन्नाच्या अत्यल्प भागाने मन बनते म्हणून आपण ग्रहण केलेल्या अन्नाचे प्रतिबिंब मनामध्ये दिसते. आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नामुळेच आज आपल्या मनामध्ये पशुसमान व असुरी वृत्ती दिसून येतात.
दयाळूपणा, करूणा, प्रेम आणि सबुरी ह्यांच्या ऐवजी केवळ घृणा आणि आसक्ती ह्या दुष्प्रवृत्ती प्रबळ झाल्या आहेत. म्हणून आपण जे अन्न खातो ते अत्यंत शुद्ध, स्वच्छ, पवित्र आणि सात्विक असले पाहिजे. मनुष्याचे खरे पोषण अशा अन्नामधून होते.
आपण जे पाणी पितो त्यातील मोठा भाग आपण लघवीच्या रूपाने बाहेर टाकतो. प्यायलेल्या पाण्याच्या सूक्ष्म भागाने प्राणशक्ती बनते. म्हणून आपण ग्रहण करत असलेल्या अन्नाच्या आणि पाण्याच्या गुणवैशिष्ठ्यांचे नियंत्रण करून आपल्याला दिव्यत्वाची प्राप्ती होऊ शकते का ? म्हणून अन्न हाच परमेश्वर असे म्हटले जाते. अन्नाचा अपव्यय म्हणजे परमेश्वराचा अपव्यय. अन्न वाया घालवू नका. तुम्हाला आवश्यक असेल तेवढेच खा व ते अन्न सात्विक आहे ना ह्याची खात्री करा. अतिरिक्त अन्न गरजूंना द्या.
आता दुसरी बाब, धन ह्याविषयी पाहू. भारतीय धन अथवा संपत्तीस लक्ष्मीचे रूप मानतात. धनाचा गैरवापर करू नका – अन्यथा तुम्ही वाईट गुण, वाईट कल्पना आणि वाईट सवयी ह्यांचे गुलाम बनाल. सत्कर्मांसाठी तुमच्या धनाचा कौशल्याने वापर करा. पैशाचा गैरवापर करणे चांगले म्हणून पैशाची उधळपट्टी करू नका. ती तुम्हाला गैरमार्गावर घेऊन जाईल.
तिसरी बाब काळ, सर्वात महत्वाची व अत्यंत आवश्यक बाब म्हणजे काळ. काळाचा अपव्यय करू नका. वेळेचा सदुपयोग करा. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट काळावर अवलंबून असल्यामुळे काळाचे पावित्र्य राखा. आपल्या धर्मग्रंथामध्येही असे म्हटले आहे की परमेश्वर काळ आहे आणि कालातीत आहे. परमेश्वरासाठी काळाची मर्यादा नाही. तो काळाच्या पलीकडे आहे. काळावर त्याचे नियंत्रण आहे. काळ मूर्तिमंत परमेश्वर आहे. सर्व काळावर अवलंबून असते.
मनुष्याच्या जन्ममृत्यूचे काळ हेच प्रमुख कारण आहे. काळ हा आपल्या वाढीमध्ये प्रमुख घटक आहे. जर आपण काळ वाया घालवला तर जीवन वाया घालवल्यासारखे होते. म्हणून काळ आपल्या जीवनातील एक अत्यावश्यक भाग आहे. वायफळ गप्पा व इतरांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये अडकत वेळेचा अवमान करू नका. ‘वेळेचा अपव्यय करू नका’ ह्या वचनामागील खरा अर्थ असा की कुविचार व कुकर्म ह्यामध्ये अजिबात वेळ वाया घालवू नये. याउलट कुशलतेने वेळेचा सदुपयोग करा.
चौथी बाब – ऊर्जा – आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचा कधीही अपव्यय करू नये. तुम्ही कदाचित म्हणाल, “आम्ही आमच्या ऊर्जेचा कसा अपव्यय करतो?” जर तुम्ही वाईट गोष्टी पहिल्या तुमच्या ऊर्जेचा अपव्यय होतो. वाईट गोष्टी ऐकल्या, अपशब्द उच्चारलेत, वाईट विचार केला, आणि वाईट कर्म केलीत तर ह्या सर्वांमधून तुमच्या उर्जेचा अपव्यय होतो. ह्या पाच क्षेत्रामधून तुमची ऊर्जा जतन करून ठेवा आणि तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनवा.
वाईट पाहू नका – जे चांगले आहे तेच पाहा.
वाईट ऐकू नका – जे चांगले आहे तेच ऐका.
वाईट बोलू नका – चांगले बोला.
वाईट विचार करू नका – चांगले विचार करा.
वाईट कर्म करू नका – सत्कर्म करा.
हा परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा मार्ग आहे.
काहीही वाईट न पाहणे, न ऐकणे, न बोलणे, विचार न करणे आणि वाईट कर्म न करणे हा दिव्यत्वाचा मार्ग आहे. जर आपण ह्या मार्गाचे अनुसरण केले नाही तर आपण आपली ऊर्जा वाया घालवतो. ह्या अपव्ययामुळे आपण आपली स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, तारतम्य शक्ती व न्यायशक्ती गमावतो.
आज मनुष्यामध्ये चांगले आणि वाईट ह्यामधील भेद जाणवण्याची क्षमता नसल्यामुळे तो यथार्त कर्म करण्याचा मार्गावर कसा प्रवेश करणार? तुम्हाला कदाचित आश्चर्यही वाटेल की हे कसं शक्य आहे? आपण कसा वेळ वाया घालवतोय? उदा.- जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ठ कार्यक्रम ऐकण्यासाठी चालू केला, मग तुम्ही त्याचा आवाज वाढवला किंवा कमी केला तरी जोपर्यंत रेडिओ चालू आहे तोपर्यंत विद्युतप्रवाह वापरला जाणारच.
आपले मन हे रेडिओसारखे आहे. जरी तुम्ही इतरांशी बोललात किंवा मनामध्ये स्वतःशी विचार केलात तरी तुम्ही तुमच्या ऊर्जेचा वापर करणार. तुमचे मन अखंड कार्यरत असते. ते नेहमी चालू असल्यामुळे तुमच्या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मनाच्या भरकटण्यामध्ये ती शक्ती, ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा, तो वेळ चांगल्या विचारांमध्ये व्यतीत करणे चांगले नाही का?
अन्न, धन, काळ, ऊर्जा ह्या चार क्षेत्रात मनुष्याने अपव्यय टाळावा ह्यासाठी ‘इच्छांवर नियंत्रण कार्यक्रम’ सूचित केला आहे.
[(सत्यसाई न्यूजलेटर (यू एस अे ) व्हॅाल्यूम -१३ नंबर -३ (स्प्रिंग १९८९ ) सेवा आणि साई संघटना या वरील दिव्य संदेशातून (२१ नोव्हेंबर १९८८ )]
वरील नियंत्रण मिळवण्याचा सर्वात सपा मार्ग
परमेश्वर सर्वांसाठी आहे ही जाणीव तुम्ही मनामध्ये प्रस्थापित केली पाहिजे. तुम्ही सर्व कर्म भगवंताच्या आनंदाप्रीत्यर्थ करत आहात ह्या भावाचे मनामध्ये सतत स्मरण ठेवले पाहिजे. हा मनावर नियंत्रण मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
तुमचे शरीर परमेश्वराच्या मालकीचे आहे ह्या भावाचे तुम्ही स्मरण ठेवले तर तुम्ही शरीराद्वारे पापकर्म करणार नाही. याउलट तुमचे सर्व प्रयत्न, प्रयास दिव्यत्वाच्या दिशेने केले जातील. तुमची ऊर्जा परमेश्वराच्या मालकीची आहे हा भाव जर तुमच्या मनामध्ये दृढ असेल तर तुम्ही त्याचा गैरवापर करणार नाही. ह्यावर अधिक प्रकाश टाकणार्या ह्या दृष्टिकोनातून आम्ही श्री सत्यसाई केंद्रांमध्ये “इच्छांवर नियंत्रण तत्त्व” नमूद केले आहे”.
चारसूत्री कार्यक्रम
“अन्न वाया घालवू नका. अन्न हाच परमेश्वर आहे.” हे पहिले इच्छांवर नियंत्रण आहे. तुमचा देह अन्नापासून बनतो. तुमच्या पालकांनी ग्रहण केलेल्या अन्नाची परिणती म्हणजे तुम्ही. अन्न हाच परमेश्वर आहे. जेवढे आवश्यक आहे तेवढेच खा. ताटामध्ये आवश्यकतेहून अन्न घेऊन उरलेले अन्न फेकून देऊ नका. अन्नाचा अपव्यय म्हणजे दिव्य ऊर्जेचा अपव्यय होय.
“धनाची उधळपट्टी करू नका. धन हाच परमेश्वर.” ही दूसरी सूचना. धन हाच परमेश्वर असल्यामुळे धनाचा गैरवापर करणे चांगले नाही. धनाची उधळपट्टी करण्याऐवजी धन, अन्न, वस्त्र व निवारा इ. गोष्टींचे दान करा. धनाचा गैरवापर करणे वाईटच नव्हे तर पाप आहे.
तीसरी सूचना आहे,” वेळ वाया घालवू नका. वेळेचा अपव्यय म्हणजेच जीवनाचा अपव्यय.
परमेश्वरास काळ असेही म्हणतात. तो काळाच्या पलीकडे आहे. कालातीत आहे आणि तो कालस्वरूप आहे. पवित्र शब्दांचा वापर करून वेळ व्यतीत करा. वेळ वाया घालवू नका.
वेळेचा अपव्यय म्हणजेच परमेश्वराचा अपव्यय. चौथी सूचना आहे “ऊर्जेचा अपव्यय करु नका”. लोकं वाईट विचार, वाईट गोष्टी पाहणे, ऐकणे आणि वाईट कर्म करणे ह्यामध्ये आसक्त होऊन त्यांची ऊर्जा वाया घालवतात.
यथार्थ राजमार्ग खाली दिला आहे-:
वाईट पाहू नका — – जे चांगले आहे ते पाहा.
वाईट ऐकू नका- — जे चांगले आहे ते ऐका.
वाईट बोलू नका- –चांगले बोला.
वाईट विचार करू नका- —चांगले विचार करा.
वाईट कर्म करू नका.— सत्कर्म करा.
वर दिलेला उपदेश आचरणात आणून तुम्ही तुमचा वेळ सत्कारणी लावू शकता. ही आध्यात्मिक साधना आणि सेवा आहे जिचा तुम्ही अंगिकार केला पाहिजे. एक वेळ अशी येईल की तुमच्या मनाचा लय झाला असेल व दिव्यत्वाशी एकत्व प्राप्त होईल.
[समर शॉवर्स इन वृंदावन १९९३: प्रकरण ६ द कॉन्क्वेस्ट ऑफ द माईंड]
अंतर्यामी प्रेमज्योत प्रज्वलीत करा.
आज मनुष्य आनंदासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत आहे. तुम्हाला परम आनंद कोठे मिळतो? तो भौतिक गोष्टींमध्ये, जगामध्ये,व्यक्तींमध्ये वा पुस्तकांमध्ये आहे का? नाही, नाही. परमानंद स्वतःच्या अंतर्यामीच आहे. तुम्ही परमानंदाचा स्रोत, तुमचे खरे स्वरुप विसरला आहात. बाहेरील कृत्रिम आनंदासाठी तुम्ही झगडत आहात. तुमच्या अंतरात असलेल्या वास्तविकतेची तुम्हाला जाण नाही. खरं तर आनंदाचा ठेवा तेथेच आहे. प्रेमत्वाचा मूलस्रोत हृदयामध्ये आहे, बाह्यजगतात नाही.
प्रत्येकाने आपल्यामध्ये अधिकाधिक प्रेम विकसित केले पाहिजे. परंतु आज सर्वत्र द्वेष आणि क्रोध दिसून येतो. जिकडे पाहावे तिकडे, इच्छा वासना, शत्रुत्व आणि भय प्रबल झालेले आहे. मग तुम्ही शांतीची अपेक्षा कशी करू शकता? आनंदावस्थेची अपेक्षा कशी करु शकता?
तुमच्या अंतरामध्ये प्रेमज्योत प्रज्वलीत करा. म्हणजे भय आणि भ्रम दूर होऊ शकेल व तुम्हाला स्वस्वरुपाचे दर्शन होईल. अन्यथा तुम्हाला दुःख भोगावे लागेल हे निश्चित! तुम्ही तुमच्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे. जमीन व संपत्तीच्या संदर्भातील नियंत्रणासाठी काही नियम आहेत. परंतु तुमचे तुमच्या इच्छांवर काहीही नियंत्रण नाही. इच्छांवर नियंत्रण ह्याचा अर्थ इच्छांवर मर्यादा घालणे. एकदा तुमच्या इच्छा नियंत्रित झाल्या की तुम्हाला आनंदाची प्राप्ती होऊ शकते.
कमी सामान, अधिक आराम, प्रवास सुखकर बनवते.
तुमचे जीवन हा एक प्रदीर्घ प्रवास आहे. जीवनाच्या ह्या प्रदीर्घ प्रवासात तुम्ही सामान (इच्छा) कमी ठेवले पाहिजे. म्हणून असे म्हटले आहे, “कमी सामान, अधिक आराम, प्रवास सुखकर बनवते.”ह्यासाठी इच्छांवर नियंत्रणाचा अंगिकार केला पाहिजे. दिवसेंदिवस तुम्ही तुमच्या इच्छामध्ये काटछाट केली पाहिजे. इच्छांच्या परिपूर्तीमध्ये आनंद दडला आहे अशी तुमची गैरसमजूत आहे.
वास्तविक जेव्हा इच्छांचा पूर्णतः नाश होतो तेव्हा आनंदाची पहाट होते.
जेव्हा तुम्ही तुमचा इच्छा कमी करता
जेव्हा तुम्ही तुमचा इच्छा कमी करता तेव्हा तुम्ही संन्यस्त अवस्थेच्या दिशेने पुढे जाता. तुम्हाला अनेक इच्छा असतात त्यातून, तुम्हाला काय मिळते? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुमची आहे असा दावा करता तेव्हा त्याच्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावे लागते. जेव्हा तुम्ही भूमीचा एक तुकडा तुमचा आहे असे म्हणता तेव्हा तुम्हाला पिकाची कापणी करावी लागते. अहंकार आणि आसक्ती ह्या वृत्ती तुम्हाला दुःखामध्ये लोटतात. ज्याक्षणी तुम्ही अहंकार
आणि आसक्तीचा त्याग करता तत्क्षणी तुम्हाला आनंदावस्था प्राप्त होते .
सत्य साई स्पीक्स, व्हॅाल्यूम 32 part-1 chapter-6 -put a ceiling on your desires
जेव्हा तुम्ही हे जग सोडता तेव्हा तुमच्याबरोबर काहीही येत नाही.
आज तुम्ही जिकडे पाहाल तिकडे, फक्त इच्छा, इच्छा आणि अधिकाधिक इच्छा ह्या इच्छांवर नियंत्रण घाला! तरच तुमचे मन शांत होईल. तुम्ही म्हणता, “मला हे हवे, मला ते हवे”. अशा तऱ्हेने तुम्ही अनेक इच्छा वाढवता. त्या निघून जाणाऱ्या ढग़ांसारख्या आहेत. तुम्ही ह्या निघून जाणाऱ्या ढगांसारख्या असणाऱ्या तुमच्या इच्छा अनेक पटीत का वाढवता? अखेरीस हे मर्त्य शरीर सोडतेवेळी काहीही तुमच्या बरोबर येत नाही.
महान राजा, महाराजांनी ह्या जगावर राज्य केले. त्यांनी अनेक देश जिंकून अमाप संपत्ती गोळा केली. एवढेच काय महान विश्वविजेता अलेक्झांडर, त्याने साठवलेल्या संपत्तीतला कणभर भागही तो बरोबर घेऊन जाऊ शकला नाही. रिकाम्या हातांनीच त्याला हे जग सोडावे लागले. हे सत्य लोकांना दर्शवण्यासाठी, त्याने त्याच्या मंत्र्यांना राजधानीच्या रस्त्यांवरुन त्याची अंतयात्रा काढण्यास सांगून, त्याचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने उंचावलेल्या अवस्थेत ठेवण्यास सांगितले. ह्या आगळ्यावेगळ्या विनंतीमागील कारणाविषयी मंत्र्यांना कुतुहल होते. तो म्हणाला, “मी अनेक देश जिंकले व अमाप संपत्ती गोळा केली. एक महान सैन्य माझ्या नियंत्रणाखाली आहे .तथापि हा देह सोडताना, काहीही माझ्या बरोबर येणार नाही. मी रिक्त हस्ताने जाणार हे सर्व लोकांना दर्शवले पाहिजे.
सत्य साई स्पीक्स, व्हॅाल्यूम ४१ प्रकरण- १९ Contemplate on God, the Real Hero, for Victory.
अमर्याद इच्छा निसर्गातील असंतुलनास कारणीभूत ठरतात
मनुष्याने त्याच्या इच्छांवर नियंत्रण घातले पाहिजे. मनुष्याची वर्तणूक उफराटी झाल्यामुळे, आज नैसर्गिक आपत्ती कोसळताना आपण पाहतोय. गुजरातमध्ये भूकंपामुळे झालेला विनाश तुम्ही जाणताच. हजारो लोकं त्यामध्ये मृत्युमुखी पडले. मनुष्याच्या मनातील अमर्याद इच्छा हेच त्याच्या पाठीमागचे कारण आहे. परमेश्वर त्याच्या सृष्टीमध्ये परिपूर्ण संतुलन राखतो. त्याच्या निर्मितीतील, पृथ्वी आणि महासागर ह्यांनाही संतुलनाची ईश्वरदत्त देणगी असते. कोणतेही तारतम्य न बाळगता केलेल्या निसर्गाच्या शोषणाची परिणती पृथ्वीवरील असंतुलनात होते,जे मानवी जीवनात हाहाःकार माजवते. केवळ मनुष्य जेव्हा त्याच्या अंतःकरणातील अस्थिरतेपासून मुक्त असेल तेव्हा तो भूकंपाने पीडित होणार नाही का?
तुमच्या लालसेची तृप्ती करण्यासाठी निसर्गातील साधन संपत्ती लुटू नका.
केवळ भारतातल्याच नव्हे तर अखिल जगतातील लोकांनाही संतुलन राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. पंचतत्त्वे म्हणजे अन्य काही नसून दिव्यत्वाचे प्रकटीकरण आहे. मनुष्याचे जीवन तेव्हाच सुरक्षित होईल जेव्हा त्याला ह्या सत्याचा बोध होईल आणि तो त्या अनुसार आचरण करेल. काही दिवसांपूर्वी मी गुजरातच्या भूकंपग्रस्तांसाठी एक ट्रकभरून तांदूळ, डाळ इ. वस्तु पाठवल्या.
काही लोकांनी विचारले, “स्वामी तुम्ही गुजरातच्या लोकांसाठी मदत म्हणून पाठवलेल्या वस्तूंवर एवढा पैसा खर्च करण्याची तसदी का घेतलीत? त्याऐवजी तुम्ही भूकंपच टाळू शकला असता.”
मी म्हटले, “माझ्या प्रियजनांनो, मनुष्याने भूकंपाच्या रोषाची जबाबदारी स्वतःवर घ्यायला हवी. संपत्तीच्या अवाजवी लोभामुळे,तो पृथ्वीचे संतुलन बिघडवतो आहे. भूकंपही त्याचीच परिणती आहे. तो प्रकृतीचा नियम आहे.” रंजल्या गांजल्यांना मदत करून तुम्ही मानवाप्रती प्रेम व्यक्त केले पाहिजे.प्रेम तुमचा स्थायीभाव आहे. जसे निसर्गासाठी संतुलन अत्यंत आवश्यक आहे,तसे मनुष्यासाठी प्रेम अत्यंत आवश्यक आहे. परमेश्वराने जे काही निर्मित केले आहे, ते तुमच्या कल्याणासाठीच आहे. तुम्ही आवश्यकतेनुसार निसर्गाचा आनंद लुटला पाहिजे. तुमच्या लालसेची तृप्ती करण्यासाठी निसर्गातील साधनसंपत्तीचे शोषण करू नका.
केवळ आवश्यक असेल तेवढाच विज्ञानाचा वापर केला पाहिजे.
एक उदाहरण पाहा. एका लोभी मनुष्याकडे एक बदक होते. ते रोज एक सोन्याचे अंडे देई. एक दिवस त्या मनुष्याने, एकाच वेळी खूप अंडी मिळतील ह्या विचाराने बदकाचे पोट फाडले. आज मनुष्य अशाच मूर्खतेच्या आणि लोभी कृत्यांमध्ये गुंतला आहे.निसर्ग जे त्याला देतो त्याने संतुष्ट होण्याऐवजी त्याला अधिकाधिक हवे असते. आणि ह्याच प्रक्रियेतून तो निसर्गामध्ये असंतुलन निर्माण करतो.
आज शास्त्रज्ञांना नवीन, नवीन शोध लावण्यात रस आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांची प्रगतीही निसर्गामधील असंतुलनाकडे घेऊन जाते. परिणामतः भूकंप होतात. वेळेवर पाऊस पडत नाही. आवश्यक असेल तेवढाच विज्ञानाचा वापर केला पाहिजे. विज्ञानाला त्याच्या काही मर्यादा आहेत. व त्या मर्यादा ओलांडणे धोक्याचे ठरते. तुम्हाला खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. सत्य आणि धर्माची कास धरा. आपल्या ऋषींनी म्हटले आहे, ” सत्य बोला, मधुर बोला ,कटू सत्य बोलु नका.” नैसर्गिक साधन संपत्तीचा यथोचित वापर करा, सर्व चांगल्या गोष्टी इतरांनाही सांगा.हे आपले आद्यकर्तव्य आहे.
[सत्य साई स्पीक्स व्हॅाल्यूम -३४ प्रकरण -३ ‘व्हिजन ऑफ द आत्मा’]
इच्छा मनुष्याच्या अशांततेचे मूळ कारण आहे.
मनाला शांत करणे,स्थिर करणे हे मनुष्याच्या सर्व आध्यात्मिक साधनांचे उद्दिष्ट आहे. जर मन स्थिर नसेल तर अखंड नामस्मरण,ध्यान आणि इतर आध्यात्मिक साधना करण्याचा काहीही उपयोग नाही. एकदा तुमची पंचेंद्रिये तुमच्या नियंत्रणात आली की तुम्ही परमेश्वराची अनुभूती घेऊ शकता. तो तुमच्यापासून दूर नाही. तो तुमच्या मध्ये आहे, खाली आहे,वर आहे आणि तुमच्या भोवती आहे. वास्तविक, परमेश्वर मनुष्याच्या अन्तर्यामी वास करतो तथापि मनुष्य त्याला पाहू शकत नाही .ह्याचे काय कारण आहे? मनुष्याच्या अमर्याद व अनियंत्रित इच्छा,त्याला परमेश्वराचे दर्शन घेण्यापासून रोखतात. इच्छा मनुष्याच्या अशांततेचे मूळ कारण आहे. इंद्रिय नियंत्रण व इच्छांवर नियंत्रण त्याला सर्वत्र परमेश्वरास पाहण्यासाठी आणि आनंदाची अनुभूती घेण्यासाठी सहाय्यकारी ठरते. आपल्या इच्छांची आपण पडताळणी केली पाहिजे. लोकांच्या वाईट बोलण्याने आपण चिंतीत होऊ नये. तसेच लोकांनी खोटा आळ घेतला वा निंदा केली तरी आपण त्याचा आपल्यावर प्रभाव पडु देऊ नये.
पंचेन्द्रियांचे नियंत्रण करा.
बुध्दांना त्यांच्या पंचेन्द्रियांचे नियंत्रण करण्याची इच्छा होती. प्रथम सम्यक दृष्टी प्राप्त करण्याचे त्यांनी ठरवले. मनुष्य त्याच्या चंचलतेमुळे, आज त्याच्या दृष्टीवर नियंत्रण मिळवू शकत नाही. चित्रपट, व्हिडिओ, टि.व्हि इ. गोष्टींनी मानवी मन प्रदूषित केले आहे. तो चांगले पाहत नाही, चांगले ऐकत नाही. मनुष्य स्वतःच त्याच्या अस्वस्थतेस कारणीभूत आहे.
सम्यक दृष्टी बरोबर बुध्दांनी सम्यक श्रवण, सम्यक वाणी, सम्यक भाव, सम्यक विचार ह्यांच्या आवश्यकतेवरही भर दिला. ह्या सर्वांच्या अभावामुळे मनुष्य वेगाने असूरीवृत्तीस व पशुवृत्ती स आमंत्रित करत आहे. मनुष्यामध्ये वेगाने पशुवृत्ती वाढत आहे. पशुंना तरी मोसम आणि निमित्त असते. तथापि मनुष्यास काहीच नाही. आज मनुष्य पशुहूनही अधिक वाईट बनला आहे. दया, करुणा, प्रेम आणि सहनशीलता ह्यासारख्या मानवी गुणांचा त्याच्यामध्ये अभाव आहे. त्याने कुविचारांपासून मुक्त राहिले पाहिजे. कुविचारच त्याच्या चिंतांचे मूळ कारण आहे. ह्यासाठी निरंतर आणि निर्धारपूर्वक सरावाची आवश्यकता आहे.
मनाचा स्वामी बना आणि मनोविजयी व्हा.
निरंतर आणि निर्धारपूर्वक सराव करून मनुष्य मनावर नियंत्रण मिळवू शकतो आणि शांती प्राप्त करु शकतो. केवळ मन शांत असेल तर त्यामध्ये उदात्त विचारांचा उद्भव होतो. मनावर मनुष्याचा काबू असायला हवा. मनाचा स्वामी बना आणि मनोविजयी व्हा. दुर्दैवाने मनाला ताब्यात ठेवण्याऐवजी मनुष्य स्वतःच त्याच्या इंद्रियांचा गुलाम बनला आहे. हेच त्याच्या अस्थिरतेचे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर त्याला देहाची आसक्तीही आहे. त्यामुळे लोकांनी त्याच्यामधील दोष दाखवले की तो अस्वस्थ होतो. देह जर पाण्याच्या बुडबुडयासारखा आहे तर त्याने देहाची चिंता का करावी? तुम्ही देहासक्ती मधून सुटका करून घेतली पाहिजे.
[समर शॉवर्स इन वृंदावन २००२: चॅप्टर -११- Sense control is the highest Sadhana]
निसर्गाकडून धडा शिका
‘इच्छांवर नियंत्रण’ ह्या संज्ञेमध्ये ४ घटक आहेत. हे पुढीलप्रमाणे, अति बोलणे (अति वाचकता)
ह्यावर अंकुश, बेसुमार इच्छांवर अंकुश आणि खर्चावर अंकुश, अन्नाच्या उपभोगावर नियंत्रण आणि ऊर्जेच्या अपव्ययावर लक्ष ठेवणे. मनुष्याला त्याच्या भरणपोषणासाठी काही आवश्यक गोष्टी लागतात. त्याहुन अधिक गोष्टींची आकांक्षा त्याने ठेवू नये. ह्या संदर्भात, आपण निसर्गाकडून धडा शिकू शकतो. हवा जर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल तर ती सुखकारक होईल जर ती अवाजवी प्रमाणात असेल आणि हवेमध्ये सोसाट्याचा वारा असेल, वादळ असेल तर तुम्हाला त्रासदायक व अस्वस्थ वाटेल.
तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही माफक प्रमाणात पाणी पिऊ शकता. न की तुम्ही गंगा नदीचे सगळे पाणी पिऊ शकता! शरीराच्या भरणपोषणासाठी जेवढे आवश्यक आहे केवळ तेवढेच आपण घेतो. शरीराचे सर्वसाधारण तापमान ९८.६ डिग्री असते हे डॉक्टरांना माहित असते. जर ते ९९ डिग्री पर्यंत गेले तर ते म्हणतात शरीरातील काही अव्यवस्थेमुळे, बिघाडामुळे ताप आला आहे. आपण सामान्य गतीने श्वास आणि उच्छवास करतो. जर त्या गतीमध्ये थोडा जरी चढ उतार झाला तर शरीरामध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे ते सूचित करते. नाडीच्या गतीमध्ये वा रक्तदाबामध्ये झालेला बदलही बिघाड झाल्याचे सूचित करतो. ह्यावरून तुमच्या असे लक्षात येईल की तुम्ही थोडे जरी मर्यादाचे उल्लंघन केलेत तर ते शरीरासाठी धोक्याचे व अपायकारक ठरते.
प्रत्येक गोष्टीला सामान्य रितीने कार्य करण्यासाठी मर्यादा असते. जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर वीज चमकली वा फोटो काढताना फ्लॅश लाईट चमकला तर डोळ्यांना तो तीव्र प्रकाश सहन होऊ शकत नसल्यामुळे ते आपोआप मिटतात. आपल्या कानाचे पडदेही विशिष्ठ मर्यादे पलीकडे आवाज सहन करु शकत नाहीत आणि आपण आपले कान झाकून घेतो किंवा कानात कापसाचे बोळे घालतो. ह्यावरून असे दिसून येते की आपले जीवन एक लिमिटेड (मर्यादित) कंपनी आहे.
आपल्या इच्छा मर्यादित असायला हव्यात.
त्याचप्रमाणे आपल्या इच्छाही मर्यादित असायला हव्यात. स्त्रिया जेव्हा खरेदीला वा एखाद्या प्रदर्शनास भेट देण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्या कपाटात भर घालण्यासाठी कितीही साड्या खरेदी करण्याची त्यांना इच्छा असते. तुमच्याकडे माफक प्रमाणात साड्या असाव्यात. केवळ दिखावा करण्यासाठी साड्यांचा भरपूर संग्रह करु नका. पैशाचा गैरवापर करणे चांगले नाही. एवढेच नव्हे तर पुरुषांनी ही स्वतःहून त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आणि अनावश्यक व नको असलेल्या गोष्टींवर खर्च करणे टाळले पाहिजे.
धन हे मूर्तिमंत दिव्यत्वाचे रुप आहे. जेव्हा संपत्तीबद्दल बोलता तेव्हा तुम्ही अति लोभाने संग्रह करणे व अवास्तव खर्च करणे टाळले पाहिजे. अन्न शिजवतानाही तुम्ही ते वाया जाणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. शरीरास आवश्यकतेहून अधिक अन्न पुरवठा करुन आपण शरीरास हानी पोहोचवतोय. तिसरा घटक, जीवनाचे मोजमाप असलेल्या काळाविषयी तुम्ही दक्ष राहिले पाहिजे. सेकंदाचे तास होतात. तासांची वर्षे होतात. वर्षांची युगे होतात. असे चालू राहते.
हा अमूल्य वेळ तुम्ही वाया घालवू नका . निरंतर गोष्टींचा पाठपुरावा करण्यात गमावलेला वेळ कोणत्याही मार्गाने परत मिळत नाही. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त लाभ होईल अशा दृष्टीने आपण आपल्या सर्व कर्मांचे नियोजन करुन वेळेचा वापर केला पाहिजे. आणि म्हणूनच आपण अन्न, धन, काळ आणि ऊर्जा ह्यांचा अपव्यय टाळला पाहिजे.
[सत्य साई स्पीक्स ,व्हॅाल्यूम १६ चॅप्टर -३ Ceiling On Desires-I]
इच्छांवर नियंत्रण कार्यक्रमाची उद्दीष्टे
इच्छांवर नियंत्रणाशी संबंधित एक कार्यक्रम आहे. धन, काळ,अन्न वा इतर साधनसंपत्तीचा, लोककल्याणासाठी उपयोग व्हावा म्हणून ह्या घटकांचा अपव्यय टाळणे हे ह्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. वेळेचा अपव्यय करु नका. काळाचा अपव्यय म्हणजे जीवनाचा अपव्यय. काळ हाच परमेश्वर आहे. शुध्द आणि निःस्वार्थ भावाने सेवाकार्य हाती घ्या व तुमचा वेळ सत्कारणी लावा.
आज आपण आपला वेळ अनावश्यक आणि नको त्या गोष्टींवर , वायफट गप्पांवर आणि निरर्थक कार्यांमध्ये वाया घालवतो. ह्या सर्व कार्यांमध्ये आपण देहाला वेळापुढे शरणागत करतो. ह्याउलट आपण वेळाला आपला दास बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याचा अर्थ आपण आपला वेळ चांगल्या विचारांमध्ये आणि चांगल्या कर्मांमध्ये खर्च केला पाहिजे. तुम्ही दररोज प्रत्येक क्षणी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, “मी माझ्या वेळाचा वापर कसा करतोय?त्यामागील हेतू चांगला आहे का वाईट आहे?”
त्याचप्रमाणे अन्नाच्या बाबतीतही तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे, “मी माझ्या गरजेपुरते खातेय का त्याहुन अधिक? मी अन्न वाया घालवत नाही ना?” तसेच धनाच्याही बाबतीत.” मी धनाचा वापर माझ्या स्वार्थासाठी वा माझा नावलौकिक वाढवण्यासाठी वा बढाई मारण्यासाठी, माझा अहंकार सुखावण्यासाठी करतेय का?” एकदा तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागलात तर त्याहून अधिक मोठी आध्यात्मिक साधना नाही. “इच्छांवर नियंत्रण कार्यक्रमाची” ही उद्दिष्टे आहेत.
तुमचे जीवन पवित्र आणि कृतार्थ बनवा
मनुष्याला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा तीन प्रकारच्या शक्ती प्रदान केल्या आहेत. असे म्हटले आहे की ह्या सर्व शक्तींचा त्याग करुन त्या समर्पित कराव्यात. ज्याने तुम्हाला देह आणि मन दिले त्याला ह्या शक्ती समर्पित करु नये कारण त्याला स्वतःसाठी ह्याची आवश्यकता नाही. परमेश्वर सर्व संपत्तीचा स्त्रोत आहे. तुमच्या संपत्तीतून त्याला काय हवे असणार? तुम्ही त्याचा उपयोग पवित्र कार्यांसाठी करा. तुमचे जीवन पवित्र आणि कृतार्थ बनवण्यासाठी तुम्हाला संधी प्रदान करणे, त्यागवृत्ती विकसित करणे हा सेवा कार्यक्रमाचा हेतू आहे.
[सत्य साई स्पीक्स ,व्हॅाल्यूम १७ चॅप्टर -१६ Ceiling On Desires-II ]
नेहमी आनंदी राहा
तुम्ही कदाचित अडचणींना तोंड देत असाल, तरी कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आनंदी राहायला शिकले पाहिजे. जर तुम्हाला विंचवाने दंश केला तर तुम्हाला सर्पाने दंश केला नाही असा विचार करुन स्वतःला दिलासा द्यावा. जर तुम्हाला सर्पाने दंश केला तर ते जीवघेणे ठरले नाही असा विचार करुन स्वतःला दिलासा द्या. जर तुम्हाला स्वतःचे वाहन घेणे शक्य नसेल तर तुमचे पाय चालण्यासाठी सक्षम आहेत, समर्थ आहेत ह्याचा आनंद माना. जरी तुम्ही लक्षाधीश नसलात तरी तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यापुरती वस्तुंची उपलब्धता आहे ह्यात आनंद माना.अशा तऱ्हेने तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही आनंद अनुभवू शकता.
तुमच्या प्रयत्नांना,अंतः
“करणातील वास्तव जाणून घेण्याकडे वळवा. शांतीपूर्ण आणि कृतार्थ जीवन जगण्यासाठी इच्छांवर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. अधिकाधिक संपत्ती मिळवण्याच्या इच्छेवर तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या वास्तवाचा बोध होण्याकडे तुमचे प्रयत्न वळवले पाहिजेत. ह्या प्रयत्नांचा पाठपुरावा करताना, परमेश्वराचे स्वरुप असलेल्या अन्न, धन, काळ, ऊर्जा आणि ज्ञान ह्यांचा अपव्यय तुम्ही टाळला पाहिजे. अनावश्यक बोलण्याने ऊर्जेचा आणि स्मरणशक्तीचा ऱ्हास होतो म्हणून अनावश्यक बोलणे टाळले पाहिजे.
[-सत्य साई स्पीक्स ,व्हॅाल्यूम २७ चॅप्टर २० spiritual orientation to education]
केवळ परमेश्वरी कृपेनेच शांती प्राप्त होऊ शकते .
आजच्या आधुनिक जगात प्रशांती मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.आध्यात्मिक नीतीनियंमांद्वारे तुम्हाला शांती मिळू शकत नाही वा एखाद्या वस्तुसारखी तुम्ही ती बाजारातूनही आणू शकत नाही.तुम्हाला ग्रंथातील ज्ञानामधून वा जीवनातील उच्च पदाद्वारेही ती मिळवता येत नाही. केवळ परमेश्वरी कृपेने शांती प्राप्त होऊ शकते .
मनुष्याला शांती प्राप्त करण्याची जरी तीव्र इच्छा असली तरी त्या मार्गावर त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. जे आगगाडीने प्रवास करतात त्यांना “कमी सामान, अधिक आराम, प्रवास अधिक सुखकर बनवतो.” हे घोषणवाक्य चांगले परिचित असेल. आज मनुष्य बेसुमार इच्छांचे ओझे स्वतःवर लादतो आहे. इच्छांच्या ह्या अत्यंत जड सामानामुळे, त्याचा जीवन प्रवास अत्यंत अवघड बनला आहे. इच्छांच्या ह्या बेसुमार वाढीमुळे, त्याचा तोल बिघडला आहे. तो त्याच्या ध्येयापासून भरकटला आहे आणि एवढेच नव्हे तर त्याचे मानसिक संतुलनही गमावण्याकडे वाटचाल सुरु आहे. ह्याच कारणांसाठी,इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ह्यावर जोर देत आहे. तुमच्या इच्छांना आळा घालून परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा.
[ सत्य साई स्पीक्स ,व्हॅाल्यूम ३१ चॅप्टर १९ :Faith, love and grace]
दुर्गुण हे तुमच्याच कुविचारांचे फळ आहे.
समजा,तुम्ही रागावलेले आहात. हा राग कोठून येतो? तो तुमच्यामधूनच येतो. त्याचप्रमाणे मत्सर हा दुर्गुणही तुमच्या मनातूनच उद्भवतो. म्हणून ह्या दुर्गुणांपैकी प्रत्येक दुर्गुण तुमच्याच विचारांची निष्पत्ती आहे. म्हणून जर तुम्ही तुमच्या विचारांना योग्य रितीने नियंत्रित करु शकलात तर तुम्ही जीवनामध्ये काहीही प्राप्त करू शकता. मन, बुद्धी आणि ज्ञान ही आत्म्याची प्रतिबिंबे आहेत. मनाला स्थिरता नाही. मन हे विचारांचे आणि इच्छांचे भांडार आहे.”केवळ मन बंध आणि मोक्ष ह्यास कारणीभूत आहे.” इच्छांना मर्यादा घालून मनावर योग्य नियंत्रण ठेवले पाहिजे.
[सत्य साई स्पीक्स ,व्हॅाल्यूम ४२ चॅप्टर -१ :know thyself ! you will know everything]
निसर्गाच्या नकारात्मक अंगास सक्रिय करु नका.
जसे मनुष्याच्या शरीरातील अवयव त्याच्या क्षेमकुशलतेसाठी वापरले जातात तसे मनुष्याने स्वतःला समाजाचा एक अवयव मानून समाजाच्या’ कल्याणासाठी सहाय्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे समाज निसर्गाचा एक अवयव आहे व निसर्ग परमेश्वराचा एक अवयव आहे म्हणून मनुष्य आणि परमेश्वर यांच्यामध्ये खूप जवळचे नाते आहे.
निसर्ग मनुष्याहून अधिक प्रगतीशील आहे. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, मनुष्याने स्वतःच्या फायद्यासाठी मर्यादित प्रमाणात निसर्गाचा वापर केला पाहिजे. जेव्हा मनुष्य बेपर्वाईने निसर्गाशी छेडछाड करतो तेव्हा निसर्ग विपरीत प्रतिक्रिया देतो व आपत्ती उद्भवतात. निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी मनुष्याने इच्छांवर नियंत्रण ठेवणे आचरणात आणले पाहिजे. त्याने निसर्गाच्या नकारात्मक अंगास सक्रिय करु नये.
ह्या बाबतीत ,शास्त्रज्ञ त्यांनी लावलेल्या शोधांच्या, कालांतराने समाजासाठी अपायकारक होऊ शकतील अशा वाईट परिणामाच्या बाबतीत उदासीन असतात. मानवजातीच्या कल्याणाची त्यांना पर्वा नसते. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर ते संहारक शस्त्रे बनवण्यासाठी करतात. सुखसोयी पुरवताना काळजी घेतली पाहिजे, अवाजवी सुखसोयी मनुष्याचे मन बिघडवू शकतात आणि आनंदाच्या ऐवजी दुःख पदरी येते. निर्बंधांशिवाय कोणतीही चांगली गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही.
तंत्रज्ञानातील प्रगती व अवाजावी सुखसोयींचा पुरवठा ह्यांच्यामुळे जीवन यांत्रिक बनले आहे व अध्यात्माचा ऱ्हास झाला आहे. विज्ञान प्रत्येक गोष्टीचे तुकड्यांमध्ये विभाजन करते तर अध्यात्म विविधतेतून एकतेची बांधणी करते. आज मनुष्य मानवजातीमध्ये ऐक्य भाव विकसित करण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही.
मनुष्य परमेश्वर आणि निसर्ग ह्यांच्यामधील जवळचे नाते.
उदाहरणार्थ, वातावरणातील ओझोनचा थर पृथ्वीवरील लोकांचे सूर्यकिरणोत्सर्जनाच्या दुष्परिणामांपासून रक्षण करते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, वातावरणात अपायकारक वायू उत्सर्जित करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. परिणामतः ओझोनचा थर विरळ झाला आहे. जर हे अनियंत्रितपणे असेच चालू राहिले तर त्याचे विनाशकारी परिणाम होतील. ओझोनचा थर विरळ होणे थांबवण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत तथापि त्यांना त्यावर उपाय सापडलेला नाही. वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हेच आजच्या परिस्थितीचे खरे कारण आहे. साधारणतः वृक्षांकडून कार्बन डायऑक्साईड शोषला जातो व तो वायू सामावला जाऊन फोटोसिन्थेसिस ह्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे प्राणवायूचा
पुरवठा होतो. तथापि बेसुमार जंगलतोड केल्यामुळे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप वाढले आहे. ह्या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर वनीकरण, जंगलवृध्दी करणे हाच उपाय आहे. सर्वत्र जास्तीत जास्त झाडे लावणे आणि त्या झाडांचा इतर गोष्टींसाठी वापर न करता त्यांचे रक्षण करणे ह्यावर भर दिला पाहिजे. अशा तऱ्हेने मनुष्य,परमेश्वर आणि निसर्ग ह्यांचे अत्यंत जवळचे नाते आहे जे कदाचित वैज्ञानिक जाणू शकत नाहीत.
[सत्य साई स्पीक्स ,व्हॅाल्यूम २६ चॅप्टर ३ The Predicament of Man Today]