भागवत वाहिनीच्या ४२व्या अध्यायातून कृष्णाचे आगमन मुक्ती प्रदान करण्यासाठी होते. वासुदेवाची भक्ती
भागवत वाहिनीच्या ४२ व्या अध्यायातून
ऋषींनी, कृष्णावताराची वास्तविकता प्रकट करत अत्यंत ऐश्वर्यशाली घटना सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, “कारागृहामध्ये दिवस कंठणारे देवकी आणि वसुदेव ह्या दोघांची आणि वेड्या लोकांची अवस्था ह्यात फारसा फरक नव्हता. पिस्कटलेले केस,भूकेमुळे दीन दुबळे झालेले शरीर. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा अभाव; त्यांना भूक वा झोप दोन्हीचे भान नव्हते. गमावलेल्या मुलांचे दुःख त्यांना हळुहळु अधिकच क्षीण बनवत होते. जेव्हा कारागृहात प्रवेश केल्यानंतर, दुसऱ्या वर्षी देवकी ८व्यांदा गर्भवती राहिली! ते आश्चर्यकारक होते! केवढे परिवर्तन आणले त्याने! देवकी आणि वसुदेवाचे कोमजलेले आणि सुकलेले चेहरे पूर्ण विकसित कमलपुष्पासारखे बहरले! ते एका अलौकिक तेजाने चमकत होते.”
“त्यांच्या आस्थिपंजर, शुष्क देहांवर मूठभर मांस चढले. देहांना गोलाई व मृदुता प्राप्त झाली. मुखावर सोनेरी आभा विलसत होती. देवकीला ज्या कक्षामध्ये बंदी बनवले होते,तेथे आल्हाददायक सुगंध दरवळत होता, अलौकिक प्रकाश भरून राहिला होता. गूढ़ संगीत आणि नृत्य करणाऱ्या पायांचा मंजुळ नाद ऐकू येत होता. खरोखर विलक्षण अद्भुत दृश्य, व नाद! देवकी आणि वसुदेवास ह्या सर्वाची जाणीव होत होती परंतु कंसाला हे सांगितले तर कदाचित तो खुनशी भावनेच्या उन्मादात गर्भ छिन्नविच्छिन्न करून टाकेल ह्याची त्यांना भीती वाटत होती. जन्माला येणाऱ्या मुलाच्या भविष्याविषयी ते चिंतीत होते. तसेच विचित्र अपशकुनांनी अस्वस्थ होते. “एका रात्री कारागृहात जमिनीवर झोपली असताना, देवकीला प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिने तिचे मन परमेश्वरावर केंद्रित केले आणि तेथे असलेल्या छोट्याशा कंदीलाच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहिली. चिंताग्रस्त स्थितीत ती स्वतःलाच विचारत होती, “आता माझे काय होणार? माझ्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे? “अचानक दिव्याची ज्योत विझली आणि कक्षात सर्वत्र अंधार झाला. तेवढ्यात, एक तेजस्वी अलौकिक रुप तिच्यासमोर उभे असल्याचे तिने पाहिले. ती विस्मयचकीत झाली, हे कोण असावे बरं?तिने वसुदेवास बोलावले. तिला भीती वाटली की त्या रुपात कंस आला की काय. ती संभ्रमात पडली. तिच्या समोर उभे असलेले ते अलौकिक रूप कोणाचे होते ह्याविषयी तिच्या मनात संभ्रम व शंका उत्पन्न झाली.
“अचानक ते रूप स्पष्ट दिसू लागले!त्याच्या तीन हातांमध्ये शंख, चक्र, गदा धारण केली होती व चौथा अभयहस्त होता जो भीती न बाळगण्याचे निदर्शन करतो. मृदु आणि मधुर आवाजात म्हणाले,” दुःख करू नकोस, मी नारायण आहे. मी काही क्षणातच तुझा पुत्र म्हणून जन्माला येणार आहे. तुझ्या वेदना, याचना दूर करण्यासाठी, तसेच तू निर्धारपूर्वक केलेल्या तपाचे फळ म्हणून जेव्हा तु खूप कामनेने माझे रुप डोळयासमोर आणलेस तेव्हा मी तुला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी मी येत आहे. माझी चिंता करू नकोस. रंगमंचावर घडणाऱ्यानाटकाकडे तटस्थतेने पाहा. १४ भुवनांमध्ये असा कोणीही जन्माला आला नाही वा जन्म घेणार नाही माला इजा पोहचवू शकेल ह्याची खात्री बाळग. आणि जरी मातेच्या ममत्यामुळे माझी जराशीही चिंता वाटली, मनावर भ्रांतीचे धुके दाटले तर तात्काळ तू माझा नैसर्गिक स्वभाव प्रकट करणाऱ्या चमत्कारांची साक्षी होशील.
माझा जन्म होता क्षणीच तुझ्या हातापायातल्या बेड्या गळून पडतील. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतील. येथून तुम्ही कोणाच्याही नकळत मला गोकुळातील नंदाच्या घरी घेऊन जा. त्याच्या पत्नीच्या यशोदाच्या बाजूला नेऊन ठेवा. यशोदास आता ह्याक्षणी प्रसूती वेदना होत आहेत. तिने जन्म दिलेल्या तिच्या पुत्रीस येथे कारागृहात घेऊन या आणि तुमच्या जवळ ठेवा. त्यानंतर कंसाला निरोप पाठवा. जोपर्यंत कंसाला ही वार्ता मिळत नाही, तोपर्यंत मथुरा वा गोकुळामधील कोणीही तुम्हाला पाहणार नाही वा पकडू शकणार नाही, अशी मी व्यवस्था करेन”. ते दिव्य तेजाने तळपत होते. त्यांनी देवकी आणि वसुदेवास आशीर्वाद दिले. व तेजरूपाने देवकीच्या गर्भात प्रवेश केला. काही क्षणातच बालक जन्माला आले.
पहाटेचे ३ वाजून ३० मिनिटे झाली होती, ब्रह्ममुहूर्ताची मंगल घडी होती. विष्णुमाया निद्रादेवीस घेऊन आली. कारागृहाच्या सर्व कक्षातील सुरक्षा रक्षकांना व रखवालदारांना अचानक निद्रादेवीने घेरले. सर्वजण उभ्या असलेल्या ठिकाणीच खाली निश्चल अवस्थेत झोपी गेले. एका क्षणात, वसुदेवाच्या हातातील व पायातील जाड लोखंडी बेड्या गळून पडल्या. दरवाजे आपोआप उघडले. काळोखी रात्र असूनही कोकीळा अचानक मधुर कुजन करू लागली पोपटही त्यांचा स्वर्गीय आनंद व्यक्त करू लागले. तारे चमकू लागले. प्रत्येकाच्या हास्यातून अंतरंगातील आनंद प्रकट होत होता. पर्जन्य देवता जलबिंदुंमधुन जणुकाही भूतलावर पुष्पवृष्टी करत होती कारागृहाच्या भोवती पक्ष्यांचे थवे आनंद गान करत होते. मधुर स्वरात किलबिलाट करत होते.
हे सर्व परमेश्वराच्या मोहिनीचे प्रकटीकरण असल्याचे वसुदेवाने जाणले. त्याने नवजात बालकाकडे दृष्टि वळवली त्याच्या जे दृष्टीस पडले त्याने तो विस्मयचकीत झाला. हे सत्य होते का? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला. का हा मनाचा भ्रम आहे? तो आहे त्याच जागीच एखाद्या खांबासारखा निश्चल उभा राहिला. त्या बालकाच्या भोवती एक दिव्य तेजोवलय दिसत होते! मातापित्यांना पाहुन बालक हासले. असे वाटत होते की ते बाळ काहीतरी बोलणार आहे! हो त्यांच्या कानावर शब्द पडले,” माता उशीर करू नका मला गोकुळात घेऊन जा!” वसुदेवाने जराही न रेंगाळता बांबुच्या टोपलीमध्ये एक जुने धोतर अंथरले व त्यावर बाळाला ठेवले. देवाकीच्या जुन्या साडीचा पदर फाडून बाळाला पांघरला व निद्रिप्त रखवालदारांच्या बाजूने दरवाजाच्या दिशेने चालू लागला. पावसाची भुरभुर चालू होती. बाळ भिजेल ह्या विचाराने त्याला वाईट वाटले. परंतु जेव्हा त्याने मागे वळून पाहिले तेव्हा त्याच्या पाठोपाठ, बाळ पावसात भिजू नये म्हणून आदिशेष येत असल्याचे त्याला दिसले. आदिशेषाने बालकावर त्याच्या विशाल फण्याचे छत्र धरले होते! पावलापावलावर वसुदेवास शुभशकुन व अनुकूल संकेत मिळत होते. सूर्योदय झाला नसूनही तळ्यातील कमलपुष्पे पूर्ण विकसित झाली होती व त्या सर्वांची देहे वसुदेवाच्या दिशेने वळलेली होती. अष्टमीच्या रात्री चंद्रप्रकाश तेजस्वी नसतो परंतु कदाचित त्या दिव्य बालकाचे दर्शन घेण्यासाठी व्याकुळ झालेला पूर्ण चन्द्राने ढगाआडून पाहिले. त्याच्या शीतल किरणांनी बांबूच्या टोपलीमधील गादीस प्रकाशमान केले. ज्यावर ते बालक झोपले होते. ह्या सर्व मांगल्यास आकर्षित करणाऱ्या त्या बालकास नंदाच्या घरी ठेवालेवा तेथे नुकत्याच जन्मलेल्या बालिकेस देवकीच्या हाती सोपवले. हे सर्व झाल्यानंतर वसुदेवाच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते.
कृष्णाचे आगमन मुक्ती प्रदान करण्यासाठी होते.
कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला. जन्म झाल्याचा क्षणापासूनच त्याला अनेकदा त्रास व अडचणीना सामोरे जावे लागले. परंतु जे परमेश्वराचे नाम हृदयामध्ये जतन करतात ते बंधमुक्त होतात. वसुदेव एक बंदीवान होता. परंतु देवकीने कृष्णाला त्याच्या मस्तकावर ठेवता क्षणीच तो मुक्त झाला. परमेश्वराने त्याच्या मस्तकाला स्पर्श करताच वसुदेवाच्या बेड्या निखळल्या। त्यांने. कृष्णाला त्याच्या मस्तकावर घेऊन नंदाच्या घरी सोडेपर्यंत तो मुक्त होता. त्याने त्या बालकास यशोदाच्या घरी सोडले व तो कारागृहात परतला आणि पुन्हा बंधात अडकला. ह्या गोष्टीचा अर्थ काय? जोपर्यंत आपले मन दिव्य विचारांनी व्याप्त असते तेव्हा आपण बंधमुक्त असतो परंतु जेव्हा आपण परमेश्वराला दूर करतो तेव्हा आपण सर्वतोपरी बंधा मध्ये अडकतो”
[- SSS 9 / 93,19 227]
वसुदेवाच्या भक्ती
दिव्य आकाशवाणीच्या सूचनांनुसार वसुदेवाने त्या बालकास टोपलीत ठेवून, ती टोपली मस्तकावर घेऊन यमुना नदी पार केली (यमुना नदी त्याला पार करण्यासाठी मार्ग करून दिला.) व गोकुळात घेऊन गेला. त्याचवेळी नंदाची पत्नी यशोदाने एका बालिकेस जन्म दिला.
कारागृहातून बाहेर पडल्या पडल्या त्याला शुभ शकुन सूचित करणारा गाढवाचा आवाज ऐकू आला! परंतु त्या आवाजाने पहारेकरी जागे होतील अशी वसुदेवाला भीती वाटली व त्याने टोपली जमिनीवर ठेवून त्याने आपल्या हातांनी त्याचे पाय धरले व त्या गाढावाचा आवाज बंद होण्यासाठी प्रार्थना केली. परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार, परमेश्वराला घेऊन जाणाऱ्या वसुदेवाच्या भक्तीची सखोलता ह्यावरुन दिसून येते.
[दिव्य संदेश -२ सप्टेम्बर २०१०]