खोर्दाद साल: महात्मा झरतुष्ट्राची जयंती
पारशी धर्मसंस्थापक महात्मा झरतुष्ट्राचा जन्म स्पितम या धर्मगुरूंच्या घराण्यात (पुरोहितांच्या कुळात) झाला. त्याच्या आईचे नाव दोग्दो आणि वडिलांचे नाव परउरूषास्प होते. बॅक्ट्रिया प्रांतातील, वेदांत नदीजवळील राए या गावात त्याचा जन्म झाला. वर्षाचा पहिलाच महिना फ्रवद्रिनमधील, सहावा दिवस, खोर्दाद दिवस हा तो दिवस होता. त्याच्या जन्मापूर्वीच, त्याच्या आईला, दोग्दोला आपल्याला होणाऱ्या मुलाच्या दिव्यकार्यांची अगाऊ सूचना देणारी स्वप्ने पडली होती. असे सांगतात की, जेव्हा झरतुष्ट्राचा जन्म झाला तेव्हा त्याच्या तेजोवलयाचा प्रकाश (तेज, प्रभा) संपूर्ण राए गावावर पसरलेला होता. “तमसो मा ज्योतिर्गमय’ (मला अंधःकाराकडून प्रकाशाकडे ने) या मानवाच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून महात्म्यांचा अवतार होत असतो, याही घटनेचा अर्थ असा होता की, जो मानवाच्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंध:कार नष्ट करील व तेथे प्रेम व ज्ञान यांचा प्रकाश पसरवील असा महात्मा जन्माला आला आहे. त्याच्या मातापित्याने त्याचे नाव झरतुष्ट्र असे ठेवले. झरतुष्ट्चा अर्थ “सोनेरी तेजस्वी तारा.” पारशी धर्मग्रंथात, या महात्म्याच्या – झरतुष्ट्र्याच्या -जन्मामुळे, समळा निसर्ग कसा बहरून आलेला होता व हर्षनिर्भर झाला होता. आणि माणसे, पशु, पक्षी सगळ्यांची अंतःकरणे कशी आनंदित व सुखी झाली याचे संदर वर्णन केलेले आहे.
अतिरेक्यांच्या टोळ्याना मात्र अतिशय भीती वाटली की हे दिव्य बालक आपल्या न्हासाचे कारण ठरेल आणि म्हणून त्यांचा पुढारी दुरासर्न त्या बालकाचा नाश करण्याची कटकारस्थाने रचू लागला, पारशी लोकांचा परमेश्वर अहूर मज्द्याच्या कृपेने व संरक्षणाने ते बालक जिवंतच राहिले, एक अत्यंत बुध्दिमान् आणि समर्पित (भक्तिभावयुक्त) युवक म्हणून झरतुष्ट्र मोठा होत राहिला. झरतुष्ट्रला मारण्याचा अखेरचा एक प्रयत्न केला. परंतु त्यांची युक्ती झरतुष्ट्राच्या सहज लक्षात आली आणि त्याने ते औषध घेण्यास साफ नकार दिला.
वयाच्या सातव्या वर्षी, त्याला बेजिन-खुर्श नावाच्या विद्वान माणसाच्या हाती सोपविण्यात आले. त्याच्यापासून झरतुष्ट शक्य ते सर्व शिकला. या विद्वानाने त्याला मज्दायस्नी ज्ञानाची दीक्षा दिली आणि पंधराव्या वर्षी त्याची कुश्ती म्हणजे मुंज करण्यात आली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी झरतुष्ट्र वाटू लागले की प्रगाढ चिंतन व देवाच्या विश्वचालनाच्या योजनेबाबतचा विचार करावयासाठी मानवी जीवनाचे प्रयोजन आणि अर्थ याबाबत चिंतन करण्यासाठी एखाद्या एकांतस्थळी जाऊन राहावे, म्हणून पर्वतमाथ्यावरील एका गुराख्याच्या झोपडीशेजारी असलेल्या गुहेत जाऊन राहणे त्याने पसंत केले. तो गुराखी रोज थोडेसे दूध व पाव आणून देऊन झरतुष्ट्राला मदत करीत असे. अशा तऱ्हेने झरतुष्ट्राने दहा वर्षे व्यतीत केली आणि या काळातच त्याच्या मनामध्ये गाथा (झोरॅस्ट्रियनांचा पवित्र ग्रंथ) प्रकट झाल्या. जेव्हा त्याची खात्री झाली की त्याला परमेश्वराकडून अगदी स्पष्टपणे ज्ञानप्राप्ती झाली आहे, तेव्हा डोंगरावरील ती जागा सोडून तो खाली उतरला व विश्तास्प राजाच्या राज्यात उपस्थित झाला. त्याने तेथे तत्कालीन पंथात सुधारणा करण्याचे कार्य सुरू केले आणि जेव्हा विश्तास्प राजाने झरतुष्ट्राच्या शिकवणीचा (उपदेशाचा) स्वीकार केला तेव्हा तर ‘झरतुष्ट्री मजदायारनी’ पंथ हा इराणचा राष्ट्रीय धर्म बनला.
खोर्दाद सालच्या दिवशी झोराष्ट्रीयन लोक झरतुष्ट्राने मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या उपदेशाचे स्मरण करून व तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करून घेण्यासाठी त्याच्या स्मृतीला अभिवादन करतात. झरतुष्ट्राच्या उपदेशाची माहिती करून घेण्यासाठी म्हणून झरतुष्ट्राने शिकविलेले सात अमेश-स्पेन्त किंवा सत्य, धर्म, शांती व प्रेम या चार तत्वांनी युक्त अशा मार्गाचा परिचय करून घेऊ या.
“सात अमेश – स्पेन्त” किंवा “पवित्र अमर तत्त्वे”
‘अमेश स्पेन्त’ हे अहुर मज्दाचे विविध आविष्कार आहेत आणि यातील प्रत्येक आविष्कार हा देवत्वाच्या मार्गावरील एक एक पायरी आहे.
पहिला अमेश-स्पेन्त खुद्द अहुर मज्दा आहे. मनुष्याच्या अंतर्यामी राहणार तो प्रत्येकातील ‘अहू’ आहे. सर्व सत्यांचे सत्य – “न बदलणारे सत्य” नेहमी आपल्या विचार उच्चारात प्रकट झाले पाहिजे.
दुसरा अमेश (अमॅश) स्पेन्त वोहु मनो आहे. वोहु मनो म्हणजे निष्पाप, प्रेमळ मन. परमेश्वर म्हणजे प्रेम आहे. खरे प्रेम देव असते आणि क्षमाशील असते. प्रकाशाप्रमाणे प्रेमालाही मर्यादा अथवा भेद माहीत नसतात आणि कितीही अनुभवले तरी ते कधीही कमी होत नाहीत. जर प्रेम हे काहीतरी देणारे व क्षमा करणारे (giving and forgiving) नसेल तर त्याला अको मनो किंवा कनिष्ठ मन म्हणतात.
पुढचा अमेश म्हणजे अष-वहिष्ट म्हणजे सर्वोत्तम सदाचार किंवा भक्ती, महात्मा झरतुष्ट्राच्या शिकवणुकीचा जणू हा पायाच आहे. आपल्या हृदयातील, सत्यावर आधारित अशा सर्व उचित कर्मांचा यात समावेश आहे.
चौथा अमेश स्पेन्त (अमॅश स्पॅन्त) वोहु क्षत्र वउर या शब्दांनी वर्णिलेला आहे. याचा अर्थ मूल्यवान, प्रेमळ दिव्य बळ असा आहे. तिसरा अमॅश ‘अष’ चा मार्ग अनुसरल्याचा परिणाम म्हणून मिळणारे ते वरदान आहे. त्याच्या कृपेने आपल्यातील अहंकारदेखील हळूहळू कमी होतो. आपण जे काय करतो ते सर्वभूतान्तर्यामी म्हणजे आपण मानव, पक्षी, प्राणी या आपल्याभोवतालच्या सगळ्यात वास करणाऱ्या – त्या प्रभूला अत्यंत प्रेमाची भेट ठरते. खरा प्रेमळ मनाचा मनुष्य कदापिही पशूंना इजा करत नाही. वास्तवात गाथांमध्ये ओतू मनो (प्रेमळ मना) चे चित्रण प्राणिराज्याचा दिव्य रक्षणकर्ता असेच केलेले आहे.
राहिलेली तीन अमॅश स्पॅ न्ता, अष अथवा सदाचारामुळे मिळणारी कृपादाने आहेत असे वर्णन आहे. स्पॅन्त आर्मइति ही आहूर मज्याची कन्या आहे असे वर्णन आहे. ती ज्ञाननिदर्शक आहे, आणि ज्ञानाने शांती मिलते कारण ज्ञानामुळेच आपल्याला सृष्टीतील एकत्वाचा साक्षात्कार होतो. यामुळेच तात्कालिक सुखदुःखांचा व आयुष्यातील चढउताराचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. नंतर सहावा अमेश स्पॅन्त म्हणून खुर्दाद हउर्वतात् आहे. ज्याचा अर्थ परिपूर्णतेची मधुरता आहे आणि शेवटचा अमॅश म्हणजे अमेरतात, अमेरतात म्हणजे देवासह अमृतत्त्व (अमर तत्त्व) आणि अंतिम कृपादान, ही सातही निरनिराळ्या कल्पनांची साकार रूपे आहेत.
सत्य, धर्म, शांती, प्रेम ही चतु:तत्त्वे सर्व धर्मांना सारभूत आहेत आणि त्यांपैकी कोणत्याही एकाचे जेव्हा आपण आचरण करण्यास सुरवात करतो तेव्हा बाकीची तीनही तत्त्वे आपोआपच आपल्या आचरणात येतात.