कर्तव्य म्हणजे काय?
एक तरुण संन्यासी वनामध्ये गेला व तेथे त्यांनी दीर्घकाळ ध्यान, भक्ती आणि योग ह्याची साधना केली. १२ वर्ष कठोर परिश्रम आणि चिकाटीने केलेल्या साधनेनंतर, एक दिवस तो एका वृक्षाखाली बसलेला असताना त्याच्या डोक्यावर काही वाळलेली पाने पडली. त्याने वर पाहिले तेव्हा त्याला झाडाच्या शेंड्यावर एक कावळा आणि एक बगळा भांडतांना दिसले. त्यांच्यावर अत्यंत क्रोधित होऊन तो त्यांना म्हणाला, “माझ्या डोक्यावर वाळलेली पाने टाकण्याची तुमची हिम्मत कशी झाली?” तो त्यांच्याकडे क्रोधाने पाहत असताना त्याच्या मस्तकातून एक अग्निशिखा (योग्याची सिद्धी) उत्पन्न होऊन वरती गेली आणि ते दोन्ही पक्षी भस्मसात झाले. त्याला अत्यंत आनंद झाला. त्याला ती सिद्धि प्राप्त झाल्याचे पाहून तो हर्षभरीत झाला. त्याच्या एका दृष्टिक्षेपाने तो कावळ्याला आणि बगळ्याला भस्मसात करु शकला.
काही दिवसांनी आपल्या उदरभरणासाठी तो गावात गेला. एका घरा समोर उभे राहून त्याने भिक्षा मागितली. घरातून स्त्रीचा आवाज आला, “जरा थांब हं बाळा.”
त्या स्त्रीने त्याला प्रतीक्षा करण्यास सांगितल्याने त्याला त्या स्त्रीचा अत्यंत राग आला. त्याच्या मनात विचार आला, “मला प्रतीक्षा करायला लावते, तुला अजून माझी शक्ती माहित नाहीये”. तो असा विचार करत असताना आतून पुन्हा आवाज आला, “बाळा स्वतःबद्दल इतका अधिक विचार करू नकोस. इथे ना कावळा आहे ना बगळा.” ते ऐकून तो अवाक झाला. त्याला प्रतिक्षा करावी लागली. अखेरीस ती स्त्री बाहेर आल्यावर त्याने तिच्या पायावर लोळण घातली आणि विचारले, “माते, ते तुला कसे समजले?” ती म्हणाली, “बाळा, मला तुझी साधना आणि योग माहित नाही. मी एक सर्वसाधारण स्त्री आहे. परंतु माझे पती आजारी आहेत व मी त्यांची शुश्रुषा करत असल्यामुळे मी तुला प्रतीक्षा करायला लावली. ते माझे कर्तव्य होते. माझ्या जीवनामध्ये कर्तव्यपालन करण्यासाठी संघर्ष करत आले. मी अविवाहित असताना, मी कन्येचे कर्तव्य पालन केले. आता मी विवाहित स्त्रीच्या कर्तव्याचे कसोशीने पालन करते. हा सर्व योगाभ्यास मी करते. माझे कर्तव्य करून माझ्यामधील ज्ञानदीप प्रकाशित झाला. मी तुझे विचार वाचू शकले. तसेच तू अरण्यात काय केलेस ते ही मला समजले. परंतु ह्याहून अधिक श्रेष्ठ तुला जाणून घ्यायचे असेल तर बनारसच्या बाजारात जा. बाजारात गेल्यावर तुला तेथे एक खाटिक दिसेल. तो तुला काहीतरी सांगेल. ते शिकण्याने तुला अतिआनंद होईल.” संन्याशाने विचार केला, “त्या शहराला आणि खाटिकाला कशाला भेट द्यायची?” (आपल्या देशात खाटिक अत्यंत खालच्या दर्जाचे समजले जातात. त्यांना चांडाळ म्हणतात. ते खाटिक असल्याने त्यांना अस्पृश्य मानले जाते. ते सफाई कामगार म्हणूनही काम करतात).
परंतु त्याने जे पाहिले त्यानंतर त्याचे मन थोडेसे खुले झाले आणि तो त्या शहरातील बाजारात गेला.
तेथे त्याला दूरवरूनच एक लठ्ठ खाटिक मोठ्या सुऱ्याने एका प्राण्याचे तुकडे करताना दिसला आणि ते करता करता तो वेगवेगळ्या लोकांबरोबर भांडत होता, सौदेबाजी करत होता. तो तरुण मनुष्य म्हणाला, “हे परमेश्वरा मला मदत कर. मी ज्याच्याकडून काही शिकण्यासाठी आलो आहे तो हाच मनुष्य आहे का? जर तो कोणी असेल तर तो दैत्याचा अवतार आहे.” दरम्यान त्या मनुष्याने वर पाहिले आणि म्हणाला, ” स्वामी, त्या स्त्रीने तुम्हाला येथे पाठवले का? माझे काम होईपर्यंत येथे बसा.” संन्याशाला वाटले, मी येथे कशासाठी आलो? परंतु तो तेथे बसला. खाटिकाचे काम सुरुच होते. त्या खाटिकाची खरेदी विक्री संपल्यावर तो पैसे घेऊन आला व संन्याशाला म्हणाला, “स्वामी, या इकडे, माझ्या घरी या.”
ते त्याच्या घरी गेले. खाटिकाने त्याला बसण्यासाठी आसन दिले व म्हणाला, “जरा येथे प्रतिक्षा करा.” असे म्हणून तो घरात गेला व मातापित्यांसमोर नतमस्तक झाला. नंतर त्याने त्यांना स्नान घातले व जेवण दिले. आणि त्यांना आनंद होईल असे सर्व काही केले. नंतर तो संन्याशासमोर येऊन बसला आणि म्हणाला, “स्वामी, तुम्ही मला भेटण्यासाठी येथे आला आहात, मी तुमच्यासाठी काय करु शकतो?” त्यावर त्या महान संन्याशाने त्याला जीवन आणि परमेश्वर ह्या विषयी काही प्रश्न विचारले आणि त्या खाटिकाने त्याला भारतातील प्रख्यात पुस्तक व्याध – गीता ह्यावर प्रवचन दिले. तुम्ही कृष्णाने उपदेश केलेल्या भगवद्गीता ह्या ग्रंथाविषयी ऐकले आहे. तो ग्रन्थ वाचून झाल्यावर तुम्ही व्याध – गीता वाचा. तो ग्रंथ वेदांत तत्त्वज्ञानाचा शिरोबिंदु आहे. ते ऐकून संन्यासी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “तुम्ही एवढे ज्ञानी असूनही तुम्ही खाटिकाच्या देहात कसे? आणि ह्या देहाद्वारे तुम्ही असे घाणेरडे आणि वाईट काम का करता?” त्यावर तो चांडाळ म्हणाला, “अरे बाळा, कोणतेही कर्तव्य कर्म वाईट वा अपवित्र नसते. माझा जन्म परिस्थिती, व तेथील वातावरण हे सर्व विचारात घेतले पाहिजे. मी लहानपणीच माझा व्यवसाय शिकलो.
त्यापासून मी अनासक्त आहे. आणि मी माझे कर्तव्य उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मातापित्यांना ज्याने आनंद वाटेल असे सर्व काही करण्याचा मी प्रयत्न करतो. ना मला तुमच्या योगाविषयी काही माहिती आहे ना मी संन्यासी बनलो ना मी कधी जगाचा त्याग केला ना मी अरण्यात गेलो आहे. त्या स्थितीत राहून केलेल्या कर्तव्यकर्मामुळे मला हे सर्व प्राप्त झाले.
आपल्या जन्माने प्राप्त झालेले कर्तव्यकर्म आपण केले पाहिजे आणि आपण ते करतो. आहे त्या स्थितीत आपल्याला प्राप्त झालेले कर्तव्यकर्म करतो.
प्रत्येक मनुष्याला, जीवनामध्ये जी स्थिती प्राप्त असते, त्याप्रमाणे प्रथम त्याने त्या स्थितीतील कर्तव्यकर्म केली पाहिजेत. मानवी स्वभावामध्ये एक मोठा दोष असतो, तो म्हणजे तो स्वतःकडे कधीही पाहत नाही. त्याला वाटते की तो राजा म्हणून सिंहासनावर विराजमान होण्यास अत्यंत योग्य आहे. आणि जरी तो योग्य असला तरी त्याने प्रथम स्वतःच्या स्थितीतील कर्तव्यकर्म केली आहेत हे दर्शवले पाहिजे आणि जर त्याने ते केले असेल तर उच्च कर्तव्यकर्म त्याच्याकडे येतील.
[स्रोत- Stories for children-II]
[प्रकाशन- Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]