गुरू आणि शिष्य
ही उपनिषदातील प्रार्थना आहे. प्रत्येक पाठापूर्वी गुरु शिष्यांना सांगत असत की शिक्षण हा एकत्रितपणे घ्यावयाचा अनुभव आहे आणि किंचित क्रोधाचा स्पर्श व गैरसमज गुरु शिष्यांमध्ये झाला तर विद्येचे दान, दाता व ग्रहणकर्ता हे सर्व दूषित होते.
आम्ही (गुरु आणि शिष्य) प्रार्थना करतो की अध्यात्मिक ज्ञानात आम्हा दोघांचे पोषण होवो. आमच्याकडून अध्ययनातून लाभलेल्या तेजाचा प्रसार होवो. आम्ही अशीही प्रार्थना करतो की कोणत्याही मतभेदांशिवाय, एकमेकांशी ताळमेळ साधून आम्ही आमचे जीवन व्यतीत करो आणि एकमेकांमध्ये मेळ साधून, आम्ही आमची कौशल्ये व कसब ह्यांचा वापर वृद्धिंगत करो.
गुरु आणि शिष्य ह्यांच्यामध्ये परस्परांविषयी आदर असायला हवा.
इंद्रिय आणि भावना ह्यावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गुरु व शिष्य परस्परांमध्ये सहकार्य असावे आणि त्या दोघांसाठी तो एक सुखद अनुभव असायला हवा. क्षण म्हणजे एक सेकंद. तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी चांगला बोध (धडा) घ्यावा अशी माझी इच्छा आहे. उदा. जेव्हा गुरु वर्गात प्रवेश करतात तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना अभिवादन केले पाहिजे. ह्यामधून विनम्रता, विद्वत्तेचा व वयाचा आदर व त्यांनी दिलेल्या सेवेप्रती कृतज्ञता हे धडे मिळतात. शिक्षकांनीही प्रामाणीकपणे कार्य व निःस्वार्थ सेवा करून त्यांच्या स्वाधीन केलेल्या मुलांचे अभिवादन स्वीकारण्यास पात्र होण्याचा संकल्प केला पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या मनात गुरूंविषयी भीतीपोटी आदर नसावा तर प्रेमापोटी असावा. विद्यार्थ्यांना ज्या पद्धती भीतीदायक वाटतील व त्यांची दहशत वाटेल, अशा पद्धती गुरूंनी टाळाव्यात. जसजसे कळीचे हळुवारपणे फुलामध्ये विकसन होत जाते तसतसा त्याचा गंध अधिकाधिक तीव्र होत जातो. निःशब्दपणे एकेक पाकळी उलगडून त्याचे पूर्ण फुलात रुपांतर झाल्यानंतर ते डोळ्यात अधिक भरते. शिक्षणाची प्रक्रियाही कळीचे फुलात विकसन होण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे. केवळ पोपटपंची करून शिकवणाऱ्या व परीक्षेसाठी तयारी करून घेणाऱ्या गुरूपेक्षा, बुद्धिमत्ता, विनम्रता, शिस्त आणि विवेक ह्या गुणांनी संपन्न असलेला गुरु मुलांच्या विकसनासाठी सहाय्यकारी ठरेल. उपदेशाहून प्रत्यक्ष उदाहरण (कृती) हे शिकवण्याचे उत्तम साधन आहे.
– सत्य साई स्पीक्स भाग १