देव सर्वांमध्ये आहे
प्राचीन काशी गावात आज सकाळी सूर्याचे तेज पसरल्याने प्रसन्न वातावरण होते. भगवान काशी विश्वनाथांना अशा स्थितीत आजचा दिवस, आपल्या जीवनातील उदात्त तत्त्वे प्रकाशात आणण्यासाठी योग्य वाटला. पिंजारलेले केस, तोकडे कपडे आणि हातात भिक्षापात्र अशा सामान्य भिक्षेकर्याचे रूप घेऊन भगवान शंकर अन्नाच्या शोधात काशीच्या रस्त्यांवरून फिरू लागले. श्रीमंत लोकांच्या दारी जाऊन त्यांनी दार वाजवले, पण काही प्रतिसाद मिळाला नहीं.
चांगल्या वस्तीतील मोठ्या रस्त्यांवरुन ते घरोघर भिक्षा मागत फिरत राहिले. तरीही अन्नाचा एक घासही त्यांना कोणाकडून मिळाला नाही. सूर्य खाली येत होता, मंदिरात घंटानाद होत होता आणि देवाला दान; उपहार देण्यासाठी भक्तांची लगबग चालू होती. परंतु त्या रस्त्यांवरून जाणाऱ्या कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी भगवान शिव थकून भागून एकांतातील अशा एका ठिकाणी चालत गेले, जेथे पवित्र गंगानदीत सांडपाणी जाऊन मिळाले होते.
या ठिकाणी एक महारोगी बसला होता व त्याच्या भोंवती चार कुत्री होती. त्याच्या भिक्षापात्रात असलेल्या अन्नाचे त्याने पाच वाटे केले. चार वाटे चार कुत्र्यांसाठी व एक स्वतःसाठी होता. आता त्या कुष्ठरोग्याकडे उरलेल्या थोड्याशा अन्नासाठी देवाने त्याच्यापुढे हात पसरले. आणि त्यांना अन्न मिळाले. ‘आधी हे खा’ अशी आज्ञा त्या कुष्ठरोग्याने केली. “मी कोण आहे, हे तुला माहीत आहे का?’ देवाने प्रश्न विचारला. ‘आधी तुझं अन्न खा’ हेच उत्तर पुन्हा त्या महारोग्याने दिले. भगवान शिवांनी पुन्हा मोठ्याने ओरडत हाच प्रश्न विचारला. यावर तो महारोगी हासून उत्तर देत म्हणाला, ‘तुम्ही भगवान काशी विश्वनाथ आहात’. भगवानांनी प्रश्न केला, “तू कसं ओळखलंस?” यावर तो महारोगी म्हणाला, ‘माझ्यासारख्या माणसाच्या हातून मिळालेल्या अन्नाचा स्वीकार तुमच्या शिवाय दूसरा कोण करेल?”
देव सर्वांमध्ये आहे आणि तो दोन सजीवांमध्ये कोणताही भेद करत नाही; हे गुह्य सत्य त्या महारोग्याने प्रकट केले होते. त्यामुळे भगवान शिव स्तिमित झाले आणि ते शोधत असलेली व्यक्ती त्यांना सापडली.
[Illustrations by Sreedarshine. H, Sri Sathya Sai Balvikas Student]