श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ६)
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- देशान्तरागत बुधास्तव दिव्यमूर्तिं
- संदर्शनाभिरतिसंयुतचित्त वृत्त्या ।
- वेदोक्त मंत्र पठनेन लसन्त्यजस्त्रं
- श्री सत्य साईं भगवन् तव सुप्रभातम् ।।
अर्थ
अन्य देशातील शिक्षित जण आपल्या दर्शनासाठी आले आहेत. त्यांना आपल्या दैवी शरीराचे (आकाराचे) दर्शन घेण्याची फार उत्कंठा आहे. त्यांना वेदांमधील मंत्रांचे उच्चारण करण्यात आनंद मिळतो. हे प्रभू, भगवान श्री सत्य साई, ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.
स्पष्टीकरण
देशान्त | जे अन्य देशांमधून |
---|---|
रागत | आलेल आहेत |
बुधा: | शहाणी माणसे |
तव | तुमचे |
दिव्यमूर्तिम् | दिव्य स्वरुप |
संदर्शना | तुमच्या दर्शनाची |
अभिरति | इच्छा |
संयुतचित्त | अतिशय उत्कंठतेने युक्त |
वृत्त्या | मनाची वृत्ती |
वेदोक्त | वैदिक |
मंत्र | मंत्र अथवा गूढ सिद्धांत |
पठनेन | म्हटल्याने |
लसन्त्य | ज्यात आनंद घेतात |
जस्त्रम् | सातत्याने |
श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ६)
स्पष्टीकरण :
सहाव्या कडव्यामध्ये स्वाध्याय अथवा शास्त्रपठणाचे महत्व प्रतिपादन केले आहे. ज्यावेळी सत्याचा शोध करण्याची मनापासून इच्छा उत्पन्न होते त्यावेळी शोधार्थी माणसाला उपनिषदे व गीता यासारख्या शास्त्रग्रंथांच्या पठणात आनंद मिळतो. हे शास्त्रग्रंथ मानवनिर्मित नाहीत. ऋषींनी त्यांच्या उच्च जाणिवेच्या स्थितीत ते ऐकले. अति उच्च यौगिक जाणिवेमध्ये असताना साधुपुरुषांनी जीवनाचे सत्य जाणले. त्यांनी आपल्या अंतर्मनात मंत्रांना अनुभवले (पाहिले) आणि हे मंत्र जाणिवेच्या उच्च स्तरापर्यंत घेऊन जाणारे सिद्धांत बनले.
अशाप्रकारे आध्यात्मिक यात्रिक उद्धारक मंत्रांनी सज्ज आणि ऋषींच्या अनुभवांनी समृद्ध होऊन पुढे वाटचाल करतो. पुढे सूक्ष्म बुद्धी जागृत होते आणि गीता व उपनिषदांमधील गुंतागुंतीचे उतारे स्पष्ट होऊ लागतात. अशाप्रकारे शोधार्थी पवित्र शास्त्रांबद्दल विचार करु लागतो आणि गुरुच्या शब्दांचे चिंतन करु लागतो. लगेचच त्याला ज्ञान होऊ लागते. यात्रिक अथवा जिज्ञासू विज्ञानमय कोशापर्यंत पोहोचतो अथवा त्याच्या जाणिवेच्या आत असणाऱ्या बौद्धिक स्तरापर्यंत पोहोचतो.
आपल्यामध्ये मी कोण आहे? मी कोठे जाणार आहे? देव म्हणजे काय? तो कोठे आहे? अशासारख्या प्रश्नांची चौकशी सुरु होते. आपले बाबा म्हणतात आपल्या साधनेचा तीन चतुर्थांश भाग अशा चौकशीचा असावा. गुरुची शिकवण पुढे आपल्याला आणखी जागृत करते आणि आपण चौकशीच्या अथवा चिंतनाच्या पातळीपर्यंत पोहोचतो.
गोष्ट
१. केवळ अध्ययन पुरेसे नाही
महाभारत रूपात्मक प्रसंगांनी अर्थात उपाख्यानांनी भरलेले आहे. एखादा त्यामधून अनेक नीतितत्त्वे शिकू शकतो वनवासात असताना पांडव अनेक पवित्र नद्यांना आणि आश्रमांना भेटी देत होते. प्रत्येकाशी एक विशिष्ट इतिहास जोडला गेला होता. अशा आश्रमांपैकी गंगा नदीकाठी रैभ्यांचा आश्रम होता.
रैभ्य साधुला दोन मूलगे होते. परवसु आणि अरवसु,दोघेही शास्त्रांमध्ये अतिशय निपुण होते. एकदा त्याने आपल्या मुलांना आपल्या बदली राजा बृहद्द्युमनाकडे यज्ञासाठी पाठवले. ते राजाकडे जाण्यासाठी निघाले.
एके दिवशी ज्या वेळी परवसु आपल्या वडिलांच्या आश्रमात रात्रीच्या वेळी आला तेव्हा त्याने झाडाजवळ जनावरासारखी आकृती दबा धरून बसल्यासारखी पहिली आणि त्याने ती नष्ट केली. परन्तु त्याला धडकीच भरली. त्याला लक्षात आले की ती आकृती म्हणजे त्याचे वडीलच होते. त्याने घाईघाईने पित्याचे अंत्यसंस्कार उरकले आणि तो पुन्हा राजाच्या महालात परत गेला.
तेथे त्याने आपल्या धाकट्या भावाला (अरवसुला) सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्याने आपल्या भावाला सांगितले, “यज्ञाच्या कार्यात ही घटना अडचण बनू नये. अजूनही मृत पित्यासाठी काही विधी करावयाचे बाकी आहेत. तू एकटा ह्या यज्ञाची व्यवस्था करू शकणार नाहीस. म्हणून तू आपल्या आश्रमात परत जा. माझ्या वतीने सर्व विधी पूर्ण कर आणि मला मदत करण्यासाठी इकडे परत ये. मी यज्ञाचा मुख्य पुरोहित असल्याने मी अंत्यसंस्कार करू शकत नाही आणि शिवाय यज्ञही करू शकत नाही.”
अरवसुने प्रामाणिकपणे आपल्या भावाच्या सूचनांचे पालन केले आणि तो वडिलांकडे परत गेला. त्याचे ह्रदय शुद्ध होते. आणि सोपविलेले काम करण्याशीच त्याचा संबंध होता. आपल्या हृदयापासून आणि सम्पूर्ण बुद्धीने त्याला सर्व करावयाचे होते. त्याच्या चारित्र्याच्या शुद्धतेचे तेज त्याच्या चेहऱ्या वर चमकत होते.
परवसूने आपल्या छोट्या भावाचा तेजस्वी चेहरा पाहिला आणि अचानक ईर्ष्याभावनेने त्याचा ताबा घेतला. ताबडतोब त्याच्या दुष्ट मनाने काम सुरु केले. त्याने जमलेल्या लोकांना ओरडून सांगितले, “पहा ह्या माणसाने एका ब्राह्मणाचा वध केला आहे आणि म्हणून तो ह्या पवित्र यज्ञाच्या सीमेत प्रवेश करू शकणार नाही.”
अशाप्रकारचे दोषारोप ऐकून अरवसूला धक्काच बसला. आपल्या भावाच्या वागण्याचा अर्थच त्याला समजला नाही. आजूबाजूला असणारे सर्व लोक त्याच्याकडे जणू काही तो अपराधी असल्याप्रमाणे पाहू लागले आणि जणू त्याने मोठी क्रूर गोष्ट केली आहे असे त्यांना वाटले. आपण निष्पाप असल्याचे सिद्ध करण्यासाठी काय म्हणावे हे त्याला समजेनासे झाले. तो आपला सात्त्विक संताप आवरू शकला नाही. त्याने लोकांना संबोधिले, “सज्जनहो, माझे ऐकून घ्या, मी तुम्हाला सत्य सांगत आहे. तो माझा मोठा भाऊ आहे. त्याने खरोखरी आमच्या वडिलांचा वध केला आहे. त्याला यज्ञ पुढे चालविता यावा म्हणून त्याने त्याच्यावतीने अंत्यसंस्कार करायला मला सांगितले” तेथे जमलेले सर्वजण त्याच्याकडे पाहून हसले. हयामुळे परिस्थिति अधिकच बिगडली. जमावाने त्याची टर उडविली लोक म्हणू लागले, “दुसऱ्याचे पापक्षालन करण्यासाठी प्रतिनिधीचे कार्य कोण करील ?” अशा प्रकारे गुणी अरवसूला चुकीने अपराधी समजण्यात आले होते. शिवाय खोटारडा म्हणून त्याची निर्भत्सनाही केली होती.पवित्र हृदयाच्या आणि सत्याचे पालन करणाऱ्या माणसाबद्दल असे बोलणे म्हणजे अतिरेकच होता. तो ते फार काळ सहन करू शकला नाही आणि नंतर उग्र तपाच्या साधने साठी तो जंगलात निघून गेला.
त्याच्या बाबतीत देव अत्यंत दयाळू होते आणि त्याला त्याची इच्छा विचारण्यात आली उग्र तपश्चर्या व काही काळ केलेल्या प्रगाढ ध्यानामुळे तो क्रोध व सुडाच्या भवानेपासून मुक्त झाला होता. म्हणून त्याने केवळ आपल्या वडिलांच्या जीवनदानाबद्दल प्रार्थना केली आणि आपल्या भावाचे चांगल्या माणसात रूपांतर होण्याची प्रार्थना केली हे केवळ त्याच्या भावासाठीच आवश्यक होते असे नाही तर जसा त्याचा घात झाला तसा त्याच्याकडून घात होऊ शकणाऱ्या सर्वांसाठीच होते. जरी परवसु आणि अरवसु दोघेही प्रकांड पंडित होते तरी परवसु दुष्ट विचारांमुळे ग्रस्त झाला होता आणि त्याचा धाकटा भाऊ गुणी, दयाळू व समंजस होता. ह्यावरुन असे दिसते की केवळ शिक्षणाने मोठेपणा प्राप्त होत नाही तर या उलट चांगले विचार,उच्चार आणि आचारांच्या एकात्मतेतून मोठेपणा निर्माण होतो.
प्रश्न-
१) परवसूचा दुष्टपणा कोणता?
२)अरवसुने आपण गुणी माणूस असल्याचे कसे सिद्ध केले?
३)या गोष्टीपासून आपणास काय बोध होतो?
२.पुस्तकीय नव्हे तर अनुभवातून ज्ञान हेच खरे ज्ञान
एकदा एक श्रेष्ठ पर्शियन साधु ताब्रिज त्यांच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानी प्राध्यापक मित्राकडे मौलाना रमकडे गेले.
नेहमीप्रमाणे प्राध्यापक तळ्याकाठी काही हस्तलिखितांवर चिंतन करीत बसले होते.
संत ताब्रिज यांनी विचारले, “तू काय करीत आहेस?” मौलाना रम म्हणाले, “अरे, तुला यातील काहीच समजणार नाही. कारण यामध्ये दिव्य गूढ ज्ञान सामावलेले आहे. तुझ्याजवळ जर तीक्ष्ण बुद्धी नसेल तर तुला हे शास्त्रग्रंथ कधीही समजू शकणार नाहीत.”
ताब्रिज काहीही न बोलता केवळ हसले. ते ताबडतोब पुढे सरसावले आणि मौलानाच्या हातातून ती हस्तलिखिते घेऊन त्यानी ती तळ्यात फेकली आणि म्हणाले, “मित्रा दिव्य ज्ञान हे कधी पुस्तकात साठविलेले नसते.”
मौलाना रमना धक्काच बसला. आपल्या प्रिय हस्तलिखितांच्या नाशामुळे त्यांचा अपमान झाला. परंतु ते रागावले नाहीत. ते दुःखाने हसत म्हणाले, “हे असंस्कृत फकीरा, तू हे काय केलेस? या दुर्मिळ हस्तलिखितांच्या नाशाने जगाचे केवढे मोठे नुकसान झाले आहे हे तुला कधी ही समजणार नाही.”
ताब्रीज पुन्हा हसले. पाण्यात आपले हात घालून त्यानी हस्तलिखिते सुरक्षितपणे बाहेर काढली आणि म्हणाले, “मौलाना, मित्रा, माझ्यावर दया कर. अशा मुलांच्या खेळण्यांच्या नाशाने तू हृदयाला धक्का पोहचू देऊ नकोस.”
जे काही घडले होते ते पाहून मौलाना रम थक्कच झाले, ते गोंधळून गेले. त्यांनी ताब्रीजमध्ये परमेश्वरी शक्तीचे दर्शन घेतले होते. हस्तलिखितांना पाण्याचा स्पर्शही झाला नव्हता. त्यांना समजले की आपण अनुभवातून ज्ञान मिळवावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपली पुस्तके फेकून देऊन त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग पूर्णपणे बदलून टाकला. ताब्रीजनी प्रेरणा दिली आणि त्यांचे प्रबोधन झाले आणि ते पर्शियाचा सर्वश्रेष्ठ प्रसिद्ध संत झाले.