प्राणीमात्रांवर दया का – २
सर आयझॅक न्यूटन हे थोर शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपले जवळपास सर्व आयुष्य गणित आणि शास्त्र या विषयात संशोधन करण्यात घालविले. त्यांच्यापाशी ‘डायमंड’ नावाचा कुत्रा होता. त्यांचे एकाद्या मित्रावर असावे तसे त्या कुत्र्यावर प्रेम होते. मुके जनावर असलेला डायमंडला खरोखर कुटुंबातील घटक असल्याप्रमाणे वागविले जात असे.
एका रात्री न्यूटन एकटाच शास्त्रातील एका महत्वाच्या प्रश्नावर काम करीत आपल्या टेबलापाशी शांतपणे बसला होता. तो प्रश्न समाधानकारक रितीने सुटल्यावर त्याला इतका आनंद झाला की जरा वेळ बाहेर फिरुन, ताजी हवा खाऊन यावे असे त्याने ठरविले.
त्याने आपले सर्व कागद गोळा केले आणि ज्या फाईलीत त्याच्या पूर्वीच्या संशोधनाचे सर्व कागद होते त्यात ते ठेवून तो खोलीतून बाहेर जाण्यासाठी उठला. या वेळेपर्यंत नयूटनच्या टेबलाखाली बसून राहिलेल्या डायमंडने न्यूटनला बाहेर जाताना पाहिले आणि त्याच्याबरोबर जायचे म्हणून त्याने दरवाजाकडे झेप घेतली त्यामुळे त्याच्या नकळत टेबलाला जबरदस्त धक्का बसला. परिणामतः टेबलावर जळणारी मेणबत्ती न्यूटनच्या एकत्र केलेल्या कागदावर पडली आणि ते जळू लागले. आगीच्या ज्वाळा पाहून न्यूटन धावत धावत तिकडे गेले पण तोपर्यंत त्याचे कित्येक कागद-कित्येक संशोधन जळून खाक झाले होते त्यांचे सारे कष्ट व मूल्यवान संशोधन वाया गेलेले पाहून त्यांना धक्काच बसला. ते जळके कागद हुंगत, शेपूट हलवीत उभ्या असलेल्या कुत्र्याकडे ते काही वेळ सुन्न होऊन पाहात राहिले. शेवटी त्या प्राण्याविषयी त्याना वाटणाऱ्या प्रेमाचा विजय झाला रागाचा किंचितही स्पर्श होऊ न देता त्यांनी आपल्या त्या मित्राला थोपटले व ते म्हणाले, “माझ्या प्रिय हिऱ्या! तू काय गोधळ केला आहे ते तुला कधीच कळणार नाही!”
न्यूटन थोर होता तो केवळ मोठा विद्वान शास्त्रज्ञ होता म्हणून नव्हे तर त्यांच्यापाशी इतर प्राण्यांविषयी प्रेम, सहनशीलता, क्षमा इत्यादि सद्गुण होते आणि या गुणांनी त्याला थोरपणा दिला होता.
प्रश्न:
- प्राण्यावर दया दाखवून माणसाला काय मिलते?
- डायमंडने केलेल्या गोंधळाबद्दल त्याला शिक्षा करण्याऐवजी न्यूटनने त्याला क्षमा का केली?
- तुम्ही न्यूटनच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते?