सीतेचे अपहरण
शूर्पणखा तात्काळ तिच्या भावाचे, रावणाचे संरक्षण मागण्यासाठी लंकेला गेली. तिची करुणास्पद अवस्था पाहुन रावण अत्यंत क्रोधित झाला. राम,लक्ष्मण आणि सीता सुरक्षारक्षकांशिवाय पंचवटीमध्ये वास्तव्यास असल्याचे तिने त्याला सांगितले. तसेच सीता भूलोकावरील सर्वात सुंदर स्त्री असल्याचे तिने रावणास सांगितले. रावणाने सीतेचे अपहरण करण्याची योजना बनवली. रावण मारीचाकडे गेला. मारीचाला त्याच्या इच्छेनुसार कोणतेही रुप धारण करण्याची विद्या अवगत होती. रावणाने त्याच्याकडे सहाय्यता मागितली. त्याने मारीचाला कांचनमृगाचे रुप धारण करुन, रामाला भुरळ घालून अरण्यात दूर घेऊन जाण्यास सांगितले. मरीचाने रामापासून दूर राहण्यासाठी रावणाचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. तथापि जर मारीचाने योजनेसाठी मान्यता दर्शवली नाही तर रावणाने त्याला त्याचा वध करण्याची धमकी दिली. मारीचाने रामाच्या हातून मृत्युला प्राप्त होण्याचे स्वीकारले व सीतेच्या अपहरण योजनेत सहभागी होण्यास राजी झाला.
मारीचाने कांचनमृगाचे रुप धारण केले व तो पर्णकुटीच्या दिशेने गेला. त्याला पाहून सीतेने, तिच्यासाठी ते कांचनमृग घेऊन यावे अशी इच्छा व्यक्त केली. रामाने लक्ष्मणास पर्णकुटीचे रक्षण करण्यास सांगितले व तो कांचनमृगाचा पाठलाग करत अरण्यात गेला.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून ,त्यांच्या मनावर अंतर्भूत मूल्ये बिंबवावीत. सर्व नकारात्मक गुण आणि वैशिष्ठ्ये वरकरणी अत्यंत आकर्षक आणि भुरळ घालणारी असतात. एकदा त्यांच्या कचाट्यात सापडले की त्यांच्या पकडीतून बाहेर पडण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. सीता जिने रामासोबत राहण्यासाठी सर्व आनंदाचा, ऐश्वर्याचा आणि भौतिक सुखांचा त्याग केला तिच्या जीवनात एक दुःखद क्षण आला जेव्हा तिला कांचनमृगाची भुरळ पडली.
स्वामी म्हणतात जेव्हा आपल्याला जगातील सुखं उपभोगण्याची अभिलाषा असते आणि आपण परमेश्वराचे चिंतन केले नाही, आपल्याला दिव्यत्वाच्या अस्तित्वाचे विस्मरण झाले तर आपल्याला कधीही आनंदाची प्राप्ती होणार नाही.
अंतर्भूत मूल्ये- जे चमकते ते सर्व सोने नसते. दृष्टीस पडणारी गोष्ट फसवी असू शकते. जेव्हा आपल्या इच्छा प्रबल होतात तेव्हा आत्म-नियंत्रण केले पाहिजे. अन्यथा त्या आपल्याला आत्मघाताकडे घेऊन जातील.(भगवानांचा संक्षिप्त संदेश -जेव्हा काम प्रवेश करतो, तेव्हा राम दूर जातो. )
हरिणाचा दूरवर पाठलाग केल्यानंतर रामाने त्याला बाण मारला, मारीच जमिनीवर कोसळला. परंतु अखेरचा श्वास घेण्याआगोदर त्याने रामाच्या आवाजाची नक्कल करत “लक्ष्मणा धाव” असे मोठ्याने ओरडला. सीतेने त्याचा आवाज ऐकून लक्ष्मणास रामाची सहाय्यता करण्यासाठी जाण्याची विनंती केली. लक्ष्मणास रामाची अवज्ञा करण्याची इच्छा नव्हती. तो म्हणाला रामाला काहीही होणार नाही. सीतेने आग्रह धरला. लक्ष्मण सीतेला मातेसमान मानत असल्यामुळे तिची आज्ञाही तो मोडू शकला नाही. त्याने पर्णकुटीभोवती रेषा आखल्या व सीतेस ह्या रेखा ओलांडून जाऊ नये अशी विनंती केली. लक्ष्मण तेथून जाताक्षणीच रावणाने भगवी वस्त्र परिधान केलेल्या संन्याशाचे रुप धारण केले आणि भिक्षा मागण्यासाठी पर्णकुटीपाशी आला. लक्ष्मणाने आखलेल्या रेषा तो ओलांडू शकला नाही म्हणून त्याने सीतेला बाहेर येऊन भिक्षा घालण्यासाठी याचना केली व तो अत्यंत क्षुधाक्रांत असल्याचे सांगितले. सीतेने लक्ष्मणरेखा ओलांडताक्षणी रावण तिला जबरदस्तीने त्याच्या रथामध्ये घेऊन गेला.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, त्यांच्या मनावर अंतर्भूत मूल्ये बिंबवावीत. जेव्हा आपले पालक, शिक्षक वा वडिलधारे एखादी गोष्ट करु नका असे सांगतात वा आपल्याला घरात अथवा शाळेत थांबण्याची सूचना देतात तेव्हा आपण त्यांची आज्ञा पाळली पाहिजे कारण कोणतीही शिस्त अमलात आणण्यासाठी आपल्याला भाग पाडले जाते ते केवळ आपल्या हितासाठीच! जर आपण नियम तोडण्याचा प्रयत्न केला तर ते अनर्थकारक ठरते.
अंतर्भूत मूल्ये- 3″D” चे महत्त्व -कर्तव्य (Duty), भक्ती (Devotion) आणि शिस्त (Discipline). जोपर्यंत आपण शिस्त आपल्या अंगी बाळगत नाही तोपर्यंत बाकीचे दोन फारसे उपयोगाचे नाहीत असे बाबा म्हणतात.
गरुडांचा राजा, जटायूने ,रावण सीतेचे अपहरण करुन तिला घेऊन जात असल्याचे पाहिले. त्याने रावणाशी घनघोर युध्द केले. अखेरीस रावणाने त्याचे पंख छाटले व तो सीतेला घेऊन गेला. जटायू अत्यंत दुःखी झाला व रामाची भेट होईपर्यंत त्याने मृत्युस रोखून धरले. त्याला तो प्रसंग रामाला कथन करायचा असल्यामुळे रामाची प्रार्थना करुन त्याने त्याची प्रतीक्षा केली. कांचनमृगाची हत्या करुन राम पर्णकुटीत परतला परंतु सीता तेथे नसल्याचे त्याला आढळले. राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. त्यांची जटायूशी भेट झाली. जटायूने सारी हकीकत रामास सांगितली. जटायूने रामाच्या हातून पाणी घेतले व अखेरचा श्वास घेतला.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत. जटायू अत्यंत प्रामाणिक आणि सदाचरणी होता. सीतेचा बचाव करण्यासाठी अन्यायी रावणाशी युध्द करण्यास तो तयार होता. मुलांनी संकल्प करण्यासाठी, प्रेम आणि प्रामाणिकपणा कसा विकसित करावा हे गुरुंनी मुलांना समजावून सांगावे. वयोवृध्द असूनही जटायूने एकट्याने , शक्तिशाली रावणाशी मुकाबला केला. मुलांनी धैर्यशील आणि निडर बनण्यास शिकले पाहिजे.
अ ) जीवनामध्ये कोणतेही आव्हान स्वीकारून, त्यांच्या क्षमतेनुसार यशस्वीपणे तडीस नेले पाहिजे. ब) दुर्बलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. (जर कोणी तुमच्या आजूबाजूस असणाऱ्या लोकांचा छळ करत असेल तर केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका )
सत्प्रवृत्तांसाठी लढणे म्हणजे त्यांच्या बाजूने उभे राहणे. जर मुलांनी एखादी अन्याय कारक घटना पाहिली तर त्यांनी कोणत्याही संघर्षात न पडता त्याविषयी
आपल्या पालकांना वा वडीलधाऱ्यांना माहिती दिली पाहिजे. गुरुंनी ह्या मुद्यावर विशेष जोर देऊन मुलांना हे स्पष्ट केले पाहिजे.
अंतर्भूत मूल्ये- तुमच्या कृती, धर्माला अनुसरुन (सदाचरणास अनुसरुन) असायला हव्यात/ तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहा/ जीवन एक आव्हान आहे. त्याला सामोरे जा. हिरो बना – झिरो नाही/ प्रामाणिकता व सत्कृत्ये परमेश्वराला अतिप्रसन्न करतात.