रामजन्म
कोणे एके काळी अयोध्या नगरीमध्ये, दशरथ नावाचा एक शूरवीर राजा राज्य करत होता. त्याचा जन्म सूर्यवंशात झाला होता. कोसल राज्याच्या राजकन्येशी त्याचा विवाह झाला. बराच काळ लोटल्यानंतरही संततीच्या आगमनाची चाहूल नसल्यामुळे दशरथ चिंताग्रस्त झाला. कौसल्येच्या सल्ल्यानुसार त्याने सुमित्रेशी विवाह केला व त्यानंतर कैकयीशी विवाह केला. परंतु तिन्ही राण्यांपैकी कोणालाही संतानप्राप्ती झाली नाही.
चिंताग्रस्त होऊन राजा दशरथाने त्यांचे कुलगुरु वसिष्ठ ऋषींची प्रार्थना केली. वसिष्ठ ऋषिंनी राजास, पुत्रप्राप्तीसाठी परमेश्वराचा आशिर्वाद मिळावा ह्यासाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यास सांगितला. ऋष्यशृंगांनी हा यज्ञ केला आणि यज्ञाच्या पवित्र अग्नीतून एक तेजस्वी दिव्य पुरुष प्रकटला. त्याच्या हातामध्ये एक दिव्य पात्र होते. तेवढ्यात एक आकाशवाणी झाली, “महाराज ह्या पात्राचा स्वीकार करा. आणि त्यातील खीर तिन्ही राण्यांना समप्रमाणात वाटून द्या”. ते दिव्य पात्र राजाच्या हाती देऊन तो दिव्य पुरुष अंतर्धान पावला.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगावे आणि अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असता तेव्हा परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा जीवनामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असते तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त केले पाहिजेत.
अंतर्भूत मूल्ये – परमेश्वरावर श्रद्धा /प्रार्थना आणि शरणागतीचे महत्त्व.
ती खीर तिन्ही राण्यांना वाटून देण्यात आली. परंतु अचानक एक गरुड तेथे आला व त्याने सुमित्रेच्या हातातून खीरीचे पात्र हिसकावून नेले. कौसल्या व कैकयी,दोघी राण्यांनी आपल्या खीरीतील थोडी खीर सुमित्रेला दिली. लवकरच तिन्ही राण्या प्रसूत होऊन कौसल्येचा पोटी राम जन्मला ,कैकयीच्या पोटी भरत जन्मला व सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न ह्या दोन जुळया मुलांचा जन्म झाला.
अंतर्भूत मूल्ये – एकमेकांविषयी आस्था व एकमेकात वाटून घेतल्याने आनंद द्विगुणीत होतो.
दशरथाने अत्यंत दिमाखात आपल्या चारही पुत्रांचा जन्म सोहळा साजरा केला. गरिबांना गोदान दिले. ती सर्व सामान्य बालके नसून, दिव्य बालके होती. त्यामुळे ती सर्व बाबतीत विशेष होती. सुमित्रेला तिचा पुत्र लक्ष्मण रात्रंदिवस रडत असल्याचे लक्षात आले . वैद्यांनी तपासणी केली ,औषधोपचार केले परंतु व्यर्थ! अखेरीस वसिष्ठांच्या सल्ल्यानुसार लक्ष्मणास रामाच्या पाळण्यामध्ये ठेवण्यात आले आणि तत्क्षणी तो रडायचा थांबला. त्याचप्रमाणे शत्रुघ्नही भरताबरोबर असेल तेव्हाच आनंदी असायचा. राजपुत्र थोडे मोठे झाल्यावर दशरथाने त्यांना ज्ञानार्जनासाठी गुरुगृही वसिष्ठांकडे पाठवले. त्यांनी राजवस्रांचा त्याग करुन साधी वस्त्रे धारण केली.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगावे आणि अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत –
शाळेमध्ये सर्व मुलांचा दर्जा समान असतो. तेथे मुलांनी भपकेदार कपडे घालू नयेत. तसेच किमती घड्याळे वा महागडे पेन वा पेन्सिल बॉक्स वापरु नयेत. आपण शाळेमध्ये महत्त्वपूर्ण धडे शिकण्यासाठी जातो.
अंतर्भूत मूल्य- साधी राहणी व उच्च विचारसरणीस दिखाऊपणाच्या तुलनेत अधिक आदर प्राप्त होतो.
त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर वसिष्ठांनी दशरथास मुलांना स्वगृही घेऊन जाण्याची अनुमती दिली. मुलांनी धनुर्विद्येचे प्रशिक्षण घ्यावे अशी दशरथाची इच्छा होती. जेव्हा त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांना जंगलातील पक्ष्याला बाण मारण्यास सांगितले तेव्हा रामाने नकार देत म्हटले की ते चांगल्याचे रक्षण करण्यासाठी धनुर्विद्या शिकत आहेत. न की निष्पाप पशुपक्ष्यांची हत्या करण्यासाठी.
रामाने ,” सदैव मदत करा , कधीही कोणाला दुखवू नका” ह्या दिव्य वचनाचे कसे पालन केले ह्याविषयी गुरुंनी मुलांना सांगावे.
अंतर्भूत मूल्ये – अहिंसा आणि धर्म (सदाचरण)