हनुमानाचे लंकेत आगमन
हनुमानाने छोट्या वानराचे रुप धारण करुन लंकेच्या प्रवेशद्वारातून तो आतमध्ये आला. लंकीणी नावाच्या राक्षसीने त्याला अडवले. त्याने तिला एक जोरदार ठोसा दिल्यावर ती कोसळली. ती पुन्हा उठूच शकली नाही. ती हनुमानाला म्हणाली की फार पूर्वी असे भाकीत केले गेले की ज्या दिवशी लंकेच्या द्वारपालाचा पराजय होईल तेव्हा रावणाच्या नाशास सुरुवात होईल. हनुमानाने सीतेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला एक तुळशीचे उपवन दिसले तेथे एक हरिचे मंदीर होते. त्याने वेश बदलून ब्राह्मणाचे रूप घेतले आणि तो तेथे गेला. त्याला तेथे एक व्यक्ती भेटली. जी हरिचे नामस्मरण करत होती. त्या व्यक्तिने तो रावणाचा बंधु बिभीषण असल्याचे सांगितले.
तो धार्मिक वृत्तीचा होता. हनुमानाने जेव्हा विश्वासात घेऊन त्याला सांगितले की तो रामाचा सेवक आहे आणि सीतेचा शोध घेण्यासाठी तो तेथे आला आहे त्याने हनुमानाच्या चरणांवर लोटांगण घातले. बिभीषण म्हणाला,”रामाच्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालो आहे परंतु मी राक्षस कुलातील असल्यामुळे राम मला दर्शन देऊन आशीर्वादित करतील का? “हनुमान ग्वाही देत म्हणाला,” प्रभु राम कुळ, जात वा धर्म विचारात घेत नाही. ते तुमच्या भावनांची शुध्दता पाहतात. ज्यांच्या दर्शनासाठी तुम्ही व्याकुळ झाला आहात ते प्रभु राम तुम्हाला दर्शन देतील. दुःख करू नका. “त्यानंतर बिभीषणाने हनुमानाला, सीतेला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्या अशोकवनात कसे जायचे ह्याविषयी सूचना दिल्या.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून,अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत
परमेश्वरांच्या दृष्टीने सर्वजण समान असतात.
आपणही जात, धर्म, रुप, दर्जा, धनसंपत्ती अशा कोणत्याही गोष्टींवर आधारीत भेदभाव करु नये.
अंतर्भूत मूल्ये- परमेश्वराचा पितृभाव आणि मनुष्याचा बंधुभाव. आपण सर्वजण परमेश्वराची लेकरे आहोत.
हनुमान कोणाच्याही नकळत, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत झाडांच्या पानांच्या मागे लपत अशोकवनाकडे गेला. लवकरच एका झाडाखाली, पहारा देणाऱ्या राक्षसीणींनी वेढलेल्या स्थितीत सीतेला त्याने पाहिली. तेवढ्यात रावण तेथे आला व त्याने सीतेला त्याची राणी बनण्यासाठी धमकी दिली. परंतु सीतेने एकदाही डोळे वर करून रावणाकडे पाहिले नाही. ती केवळ रामाचे नाम जपत होती.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून,अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत
कधीकधी आपल्या भोवती वाईट लोकांचा वावर असतो. अशा वेळेस आपण त्यांच्याकडे दृष्टिक्षेपही टाकू नये वा पुढे काही विवाद निर्माण होऊ नये ह्यासाठी त्यांच्याबरोबर अनावश्यक संभाषणही करु नये. अशा वेळेस आपण परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे ज्यायोगे परमेश्वर आपले संरक्षण करेल.
अंतर्भूत मूल्ये- वाणीवर नियंत्रण हे एक उत्तम आभूषण आणि उत्तम अस्त्र आहे./ नामस्मरणाचे सामर्थ्य
हनुमानाने सीतेच्या समोर रामाची अंगठी टाकली. तिने ती रामाची अंगठी असल्याचे ओळखले व ती अत्यंत आनंदीत झाली. तिने आजूबाजूला पाहिले तेव्हा एक छोटेसे वानर रामनामाचे उच्चारण करताना तिला दिसले. ते वानर तिच्याजवळ आले व त्यानी तो खरोखरच रामाचा दास असल्याचा पुरावा देण्यासाठी काही खाजगी गोष्टी सांगितल्या ज्या फक्त राम आणि सीता दोघांनाच माहित होत्या. तो त्याच्या मूळ स्वरुपात प्रकट झाला व केवळ रामाच्या कृपेने तो लंकेत पोहोचल्याचे त्याने सांगितले. त्याच्या खांद्यावर बसवून सीतेला रामाकडे घेऊन जाण्याची त्याची इच्छा होती परंतु सीतेने त्यासाठी साफ नकार दिला. ती म्हणाली त्यासाठी रामाने स्वतः येऊन, रावणाचा पराजय करावा आणि मला सन्मानाने घेऊन जावे.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून,अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत सीता हनुमानाबरोबर जाऊ शकली असती तथापि तिने तसे करण्यास नकार दिला कारण तिचा प्रभु श्रीरामांवर पूर्ण विश्वास होता. राम येऊन तिची सुटका करतील, ह्याविषयी तिला पूर्ण खात्री होती. आपणही आपल्या जीवनातील कठीण समयी कोणत्याही आडमार्गाचा आश्रय घेऊ नये आणि परमेश्वराच्या कृपेने परिस्थिती अनुकूल होण्याची प्रतीक्षा करावी.
अंतर्भूत मूल्ये -जरी एखादा गैर मार्ग अखेरीस योग्य ठिकाणी जात असला तरी त्या मार्गाचा कधीही अवलंब करु नये. अंतीम परिणामा एवढेच आपल्या पध्दतीतील सदाचरण महत्त्वाचे आहे.
तेथून परत जाण्यापूर्वी त्याने पुन्हा लहान वानराचे रूप धारणा केले. त्याने मधुर फलांचा आस्वाद घेतला व जी फळे चांगली नव्हती ती फेकून दिली. त्याने फुले कुस्करली व मुळासकट वृक्ष उपटले. ही गोष्ट रावणाच्या कानावर गेल्यानंतर रावणाने ह्या वानराला पकडण्यासाठी राक्षसांची फौज पाठवली. परंतु ते त्याला पकडू शकले नाहीत. अखेरीस हनुमानाला रावणाच्या दरबारात नेण्यात आले. रामाचा दूत म्हणून त्याने त्याचा परिचय दिला. हनुमानाने रावणास सांगितले की त्याला जर शांती हवी असेल तर त्याने सीतेची मुक्तता करुन रामाचा आदर करावा. अन्यथा राम त्याचा व त्याच्या राज्याचा नाश करेल. रावण अत्यंत क्रोधित झाला व त्याने ह्या वानरास मृत्युदंड देण्याचा आदेश दिला. त्यावेळेस बिभीषणाने हस्तक्षेप केला. तो म्हणाला की हनुमान दूत असल्यामुळे त्याला मृत्युदंड देणे योग्य नाही. त्यामुळे त्याच्या शेपटीला आग लावण्याचे ठरवले. तेलामध्ये भिजवलेले कापड त्याच्या शेपटीला गुंडाळण्यात आले. हे सर्व करत असताना हनुमानाची शेपूट लांबच लांब वाढत होती.
त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तेल आणि कापड वापरले गेले. अखेरीस शेपटी पेटवण्यात आली व लंकेच्या रस्त्यांवरून त्याला फिरवण्यात आले. लवकरच त्याने लघुरुप धारण केले. त्यामुळे त्याला बांधलेले दोर गळून पडले आणि तो तेथून निसटला. व त्याने त्याच्या जळत्या शेपटासह एका प्रासादावरून दुसऱ्या प्रासादावर उड्या मारत समस्त लंकानगरीस आग लावली. नंतर त्याने शेपूट पाण्यामध्ये बुडवून आग विझवली.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून,अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत वर्तमानात केलेल्या आपल्या प्रत्येक क्रियेचे भविष्यामध्ये प्रतिक्रिया, प्रतिबिंब व प्रतिध्वनी उमटणे अपरिहार्य आहे. म्हणून आपण कोणतेही गैरकृत्य करु नये ज्याचा अखेरीस वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागेल. रावण आणि लंकेच्या नागरिकांच्या बाबतीत हेच घडले. त्यांनी हनुमानाच्या शेपटीला आग लावून त्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेरीस त्या आगीमुळे लंकानगरीत प्रचंड विध्वंस झाला. मुलांना असेही सांगू शकता की त्यांनी कोणालाही दुखवू नये. पशुपक्ष्यांनाही पिंजऱ्यात ठेवून किंवा त्यांच्या शेपटीस एखादी वस्तू बांधून, असा कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना देऊ नये.
अंतर्भूत मूल्ये- अहिंसा परमो धर्मः जे पेराल तेच उगवते. तुम्ही जे करता त्याविषयी सावधानता बाळगा. तुमचे शब्द, कृती, विचार आणि चारित्र्य ह्यांचे अवलोकन करा.
त्यानंतर हनुमान सीतेकडे गेला व त्याने सीतेकडे एक निशाणी मागितली ज्यायोगे तो सीतेला भेटला आहे हे सिद्ध होईल. सीतेने तिचा चूडामणी काढून त्याच्या हातात दिला व रामाकडे घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर त्याने महासागरावरून मोठी उडी घेतली व रामाकडे गेला. हनुमानाने तेथील तपशीलवार हकिकत रामाला सांगितली आणि सीतेने दिलेला चूडामणी रामाला दिला. रामाने लक्ष्मणास शीघ्र मोहिमेची तयारी करण्यास सांगितले. रामाने समस्त वानरसेनेस आशीर्वाद दिले. प्रत्येक पावलागणिक त्यांना सर्वत्र शुभशकून दिसू लागले. रावणाच्या पत्नीने मंदोदरीने रावणाच्या पायांवर लोळण घेत सीतेला परत पाठवण्याची विनंती केली परंतु रावणाने साफ नकार दिला.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून,अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत जरी रावण महान होता, तरी मंदोदरी सत्शील व कोमल हृदयी होती. स्वामी नेहमी म्हणतात- आपण चांगले बनण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. गुरुंनी बालसाईंच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून चांगुलपणाचे मूल्य ह्यावर विशेष जोर दिला पाहिजे.
अंतर्भूत मूल्ये- महानता सद्गुणांनी बनते पराक्रमाने नव्हे. चांगले बना, चांगले करा, चांगले पाहा.