रामाची हनुमान आणि सुग्रीव भेट
राम आणि लक्ष्मण जंगलातून आगेकूच करत निघाले आणि अखेरीस सुग्रीवाच्या वास्तव्य असलेल्या ऋष्यमुख पर्वतराजीजवळ पोहोचले. सुग्रीवाने त्याचा भाऊ वाली ह्याच्या भीतीने तेथे आसरा घेतला होता. सुग्रीवाने दोघा भावांना पर्वतराजीपाशी येताना दुरुनच पाहिले. त्यांच्या मुखावरील दिव्य तेज पाहुन त्याला आश्चर्य वाटले. ते कोण आहेत हे त्याला जाणून घ्यायचे होते म्हणून त्याने हनुमंताला संन्याशाचा वेश धारण करून त्यांची चौकशी करण्यासाठी पाठवले. हनुमान त्या दोघा बंधुना भेटल्यावर त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले व त्याने असा तर्क केला की नर-नारायणाची दिव्य जोडी भूतलावर आली असावी.
[गुरुंनी मुलांना हनुमानाचे गुणवर्णन करणारा ‘मनोजवं’ हा श्लोक शिकवावा. त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगावा आणि हनुमानाच्या अगाध ज्ञान, अचाट शक्ती, विनम्रता, भक्ती, निस्वार्थ सेवा इ. गुणांवर विशेष जोर देऊन त्याच्या गोष्ट सांगाव्या.]
रामाने ते दशरथाचे पुत्र असल्याचे सांगितले. रावणाने त्याच्या पत्नीचे, सीतेचे पंचवटीमधून अपहरण केल्याने तिच्या शोधार्थ ते तेथे आल्याचे सांगितले. रामाने हनुमानाला त्याचा परिचय देण्यास सांगितले. हनुमानाचे डोळे भरून आले. तो म्हणाला, “माझ्या स्वामींच्या साक्षीने मी घोषणा करतो की माझ्या स्वामींची भक्ती करण्या व्यतिरिक्त मी दुसरे काही जाणत नाही. रामाने त्याला आलिंगन देत म्हटले,” तू मला लक्ष्माणाप्रमाणेच प्रिय आहेस.”रामाने पुढे म्हटले,” हनुमान, जे माझी सेवा करतात आणि सेवा हेच मुक्तीचे सर्वोच्च साधन मानतात त्यांच्यावर मी प्रेमाचा वर्षाव करतो.”
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, अंतर्भूत मूल्ये त्यांच्या मनावर बिंबवली पाहिजेत. मानवसेवा करणाऱ्या परमेश्वराच्या सच्चा सेवकासारखी छोटी छोटी सेवाकार्ये करून मुले परमेश्वराला कशी प्रसन्न करू शकतील हे गुरुंनी मुलांना सांगावे.
अंतर्भूत मूल्ये- मानवसेवा हीच माधवसेवा. मानवास आनंद देणे म्हणजेच परमेश्वरास आनंद देणे.
हनुमानाने रामाला सुग्रीवाविषयी सर्व माहिती दिली. सुग्रीव वानराच्या टोळीचा राजा होता. त्याचा मोठा भाऊ वाली ह्याने त्याच्याशी शत्रुत्व पत्करून त्याला राज्यातून हुसकावून दिले व त्याची पत्नीही त्याच्यापासून हिरावून घेतली. हनुमानाने सांगितले की सुग्रीव वानरांचा राजा असून तो सीतेच्या शोधार्थ शेकडो वानरांना दशदिशांना पाठवू शकतो. त्यानंतर हनुमान राम लक्ष्मणास सुग्रीवाकडे घेऊन गेला. सुग्रीवाने रामाचे स्वागत केले आणि अग्नीच्या साक्षीने दोघांनी मैत्रीची शपथ घेतली. सुग्रीव म्हणाला की त्याने पुष्पक रथ आकाशातून जातांना पाहिला ज्यामधून काही दागिने खाली टाकण्यात आले. रामाने लक्ष्मणास ते दागिने तो ओळखू शकतो का असे विचारल्यावर लक्ष्मण म्हणाला की त्याने फक्त सीतेचे चरण पाहिले असल्याने तो केवळ जोडवी ओळखू शकतो. अशा तऱ्हेने रावण सीतेला रथातून घेऊन गेला ह्यावर शिक्कामोर्तब झाले. सुग्रीवाने रामास सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले. रामाने त्याला वालीचा वध करून त्याचे राज्य परत देण्याचे वचन दिले.
दुसऱ्या दिवशी रामाच्या मार्गदर्शनानुसार सुग्रीव वालीशी युद्ध करण्यास सुसज्ज झाला. वालीने सुग्रीवाचा पराभव केला. सुग्रीव अत्यंत व्यथित होऊन रामाकडे आला. रामाने काही रानफुले गोळा करून त्याचा हार बनवून सुग्रीवाच्या गळ्यात घातला व वालीला पुन्हा एकदा युध्दाचे आव्हान देण्यास त्याला सांगितले. राम लक्ष्मण झाडामागे दडून बसले होते. सुग्रीवाने रामाकडे मदतीसाठी प्रयत्न केल्यावर, रामाने नेम धरून वालीच्या हृदयात बाण मारला.
रामाच्या दिव्य दर्शनाने वालीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले .रामाने वालीला स्पष्ट करून सांगितले की त्याने जे केले ते अत्यंत निंदनीय होते. त्याचे कृत्य चुकीचे असल्याचे वालीला समजले. त्याने त्याचा पुत्र अंगदला बोलावले व रामाला त्याची काळजी घेण्याची विनंती करून अखेरचा श्वास घेतला. रामाने अंगदला सुग्रीवाकडे सोपवून त्याचा प्रेमाने सांभाळ करण्यास सांगितला. त्यानंतर सुग्रीव किष्किंधा नगरीचा राजा बनला.
[Given below, for the purpose of Gurus’ reference are extracts from: The Sunday Talk given by Prof. Anil Kumar on “Sai Baba’s Revelations about the Ramayana” April 14, 2011]
[Rama killed Vali, as you know. At the time of Vali’s death, before he left his body, Rama went close to him. There was an argument between Vali and Rama. Swami explained it beautifully.
गुरुंच्या संदर्भासाठी खाली दिलेला उतारा- १४ एप्रिल २०११ रोजी प्रोफे. अनिलकुमार ह्यानी “Saibaba’s Revelations about the Ramayan” ह्या विषयावरील दिलेल्या रविवारच्या भाषाणातून घेतला आहे.]
तुम्हाला माहीत आहे की रामाने वालीचा वध केला. वालीच्या मृत्युसमयी, त्याने देह सोडण्यापूर्वी राम त्याच्या जवळ गेला. राम आणि वाली दोघांमध्ये विवाद झाला. स्वामींनी त्याविषयी सुंदर स्पष्टीकरण दिले. वाली म्हणाला, “राम, तू राजा आहेस आणि मी वानर आहे. मला तू अशा तऱ्हेने मारलेस हे न्याय्य आहे का?” रामाने त्याला उत्तर दिले, “हे वाली,तू वानर आहेस हे जाणतोस, चांगली गोष्ट आहे. मी राजा आहे. हे लक्षात घे की राजे शिकारीवर जाऊन पशुंची हत्या करतात. तू वानर असल्यामुळे मी तुझी हत्या करू शकतो. राजे नियमितपणे शिकार करतात, त्यामुळे त्यात चुकीचे काही नाही.” पहिल्या विवादात वाली हारला.
पहिल्या विवादात वाली हारला.
त्यानंतर वालीने पुन्हा विवाद सुरु केला, “रामा तू रावणावर हल्ला करण्यासाठी माझा बंधु सुग्रीवाची मदत घेतलीस. तुला त्याची मदत हवी असल्यामुळे तू माझी हत्या करण्याचे ठरवलेस. रामा तू बुद्धिमान नाहीस. माझा बंधु सुग्रीव दुर्बल आहे. मी त्याच्यावर अनेक वेळा वार केला आहे. माझे नांव घेताच तो दूर पळून जाईल अशा भ्याड सुग्रीवाची तुला मदत हवी आहे. रामा, किती मूर्खपणा आहे हा! तू माझी मदत घ्यायला हवी होतीस. मी अधिक शक्तिशाली आहे. वास्तविक तुझा शत्रू रावण ह्यालाही माझे भय वाटते. मी त्याची चटईसारखी गुंडाळी करून माझ्या खाकोटीला मारून अनेकवेळा त्याला पवित्र महासागरात स्नान घडवले आहे. माझ्या शक्तीची कल्पना असल्यामुळे रावणाला माझे भय वाटते. तू माझी मदत मागायला हवी होतीस.” त्यावर राम म्हणाला, “मला तुझा भाऊ सुग्रीवाची मदत हवी होती कारण आम्ही दोघ दुःखातील एकमेकांचे साथीदार आहोत. आम्ही समदुःखी आहोत. आम्ही दोघांनी आमचे राज्य गमावले आणि दोघेही पत्नीवियोगाचे दुःख भोगत आहोत. तू तुझ्या बंधूच्या पत्नीचे अपहरण केलेस आणि रावणाने माझ्या पत्नीचे. त्यामुळे मी त्याचे दुःख जाणतो.
म्हणून मी त्याला मदत करतोय आणि मला त्याची मदत हवी आहे. तू अधिक शक्तिशाली आहेस हे मला माहित नाही असे समजू नकोस. दुःख काय असते हे तुझा बंधु जाणतो. हे मैत्रीशी संबंधित आहे. “हा युक्तिवादही वाली हारला.”
त्यानंतर त्याने अजून एक युक्तिवाद केला. “रामचंद्रा, तू झाडामागे लपून बाण मारला हे तुझ्या दृष्टीने योग्य आहे का? तू माझ्या समोर येऊन का मारले नाहीस? तू लपून का बसलास?ह्याला शौर्य म्हणायचे का? ते सौजन्य आहे का?” राम उत्तरला,” हे पाहा वाली,तुझ्या तपाचे फळ म्हणून, तुझ्या गळ्यात असलेली मोत्याची माळ ब्रह्मदेवाने तुला दिली आहे हे मीजाणतो. जोपर्यंत तुझ्या गळ्यात ही माळ आहे तोपर्यंत कोणीही तुझ्यासमोर येऊन तुझ्याशी युध्द करू शकत नाही हे ही मला माहित आहे. ब्रह्मदेवाने तुला दिलेल्या वराचा मान राखण्यासाठी मला झाडाच्या मागून बाण मारणे भाग पडले. मला युद्धधर्माविषयी एवढेही ज्ञान नाही असा त्याचा अर्थ नाही.”
लवकरच सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्यासाठी सर्व दिशांना वानरसेनेस पाठवले. अखेरीस ते समुद्रकिनाऱ्यावर आले. तेवढ्यात एक वयोवृद्ध विशाल पक्षी, त्याच्या मृत भावाचे अंतिम संस्कार करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर उतरला. तो जटायूचा भाऊ संपती होता. सीता लंकेच्या अशोकवनात असल्याचे त्याने सांगितले. तो प्रचंड महासागर पार कसा करायचा असा त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला. हनुमानाने उड्डाण करून लंकेस पोहोचण्याचे ठरवले. त्याच्या मार्गामध्ये आलेल्या असंख्य अडचणींना त्याला तोंड द्यावे लागले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, अंतर्भूत मूल्ये त्यांच्या मनावर बिंबवावीत. हनुमान जरी अत्यंत शक्तिशाली होता तरी त्याच्या शारीरिक बलाचा त्याने कधीही गर्व केला नाही. त्याने प्रभुरामांच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करली .त्याच्या ह्या अभियानात प्रभु रामांनी सहाय्य करावे ह्यासाठी त्याने त्यांची प्रार्थना केली. महासागर पार करताना आलेल्या असंख्य अडचणींवर मात करण्यासाठी त्याने त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर केला.
अंतर्भूत मूल्ये- प्रार्थना आणि शरणागतीचे महत्त्व/तुमच्या शारीरिक बलाचा कधीही गैरवापर करू नका आणि इतरांना इजा पोहचवू नका. कार्य करताना अपार कष्ट जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच चातुर्यही महत्त्वाचे आहे म्हणून आपण कार्य करताना विचारपूर्वक,सुनियोजन करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.