युध्दास प्रारंभ
रामाने सर्व प्रमुख नेत्यांना बोलावले आणि लंकेच्या चारही द्वारांना वेढा घालण्यासाठी उत्तम योजना बनवण्यास सांगितले. वानरराज सुग्रीव, ऋक्षराज जांबवान आणि राक्षसराज बिभीषण ह्यांनी एकत्र येऊन त्यावर विचार विमर्श केला. त्यांनी सेनापती व मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली सैन्याचे चार भाग करायचे ठरवले. त्यांनी रामाच्या चरणी लोटांगण घातले व त्याचे कृपाशिर्वाद घेऊन आक्रमण करण्याच्या आज्ञा दिल्या.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत. प्रभु राम हे प्रत्येक गटनेत्यासाठी कसे उत्तम आदर्श होते, ते मुलांना स्पष्ट करून सांगावे. ते जरी अवतार होते, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान होते. तरी त्यांनी त्यांच्या सैन्यदलातील कोणालाही कमी लेखले नाही. त्यांच्यातील प्रत्येकाला ते व्यक्तिशः ओळखत होते. रणनीती आखण्यासाठी ते सर्वांशी चर्चा करून त्यांचे मत विचारत.
ते शांतपणे प्रत्येकाचा दृष्टिकोन ऐकून घेत असत. ते केवळ वानर वा ऋक्ष (अस्वले) आहेत ह्या दृष्टीने न पाहता त्यांच्यामधील जन्मजात कौशल्ये ओळखून रामाने प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्यांच्यावर महत्त्वाची कार्ये सोपवली.
अंतर्भूत मूल्ये- पृथ्वीवरील प्रत्येक जीवास विशेष क्षमता प्रदान केली आहे. म्हणून आपण सृष्टीतील सर्व निर्मितीचा आदर केला पाहिजे.
(मुलांशी ह्या मुद्द्यावर चर्चा करताना गुरुंनी तार्तम्यभाव राखला पाहिजे. जर मुले ते समजण्यासाठी खूप लहान असतील तर त्यांच्या वयाला अनुरूप समर्पक उदाहरणे गुरु देऊ शकतात.)
वानरांनी मोठे मोठे पाषाण आणि वृक्ष हातात घेऊन अगिकूच केली. हृदयामध्ये रामाला प्रस्थापित करून, मुखाने रामनाम घेत त्यांनी लंकेतील त्यांचा मार्ग बनवला. नलाच्या नेतृत्वाखाली पूर्वद्वारावर झंझावती हल्ला करण्यात आला. दक्षिण दरवाजा अंगदच्या नेतृत्वाखाली होता तर हनुमानाच्या नेतृत्वाखाली सैन्याने केलेल्या प्रलयंकारी हल्ल्यात पश्चिम द्वार पाडण्यात आले. उत्तरेच्या द्वारावर प्रत्यक्ष रावण पहारा देत होता. तेथे रामाने त्याला सामना दिला. वानर प्राण पणाला लावून लढले व विजयी झाले. राक्षस निशाचर असल्यामुळे रात्र झाल्यावर राक्षसांची शक्ती व क्रोध अनेक पटीने वाढला. रामाने त्याच्या भात्यातून अग्निअस्त्र काढले आणि अंधःकारामध्ये सोडले. ह्या अस्त्राच्या वेगाने आसमंत प्रकाशमान झाला. वानर आणि ऋक्षगण दुप्पट जोमाने व शक्तीने शत्रूचा नाश करण्याच्या कार्यात रुजू झाले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत. गुरुंनी मुलांना सांगावे की शक्तिशाली राक्षसांच्या तुलनेत वानर दुर्बल असूनही केवळ प्रार्थना/नामस्मरण व शरणागती द्वारे ते शत्रूचा विनाश करू शकले. जर आपल्यामध्ये आत्मविश्वास
असेल, परमेश्वरावर अढळ श्रध्दा असेल तर आपणही आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही आवाहनावर यशस्वीपणे मात करू शकतो. तथापि ते यश मिळवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.
अंतर्भूत मूल्ये- हृदयामध्ये राम, हातामध्ये काम.
(परमेश्वराचे नामस्मरण करत आपण भूतलावरील आपली सर्व विहित कर्तव्य केली पाहिजेत.)
पूर्ण प्रयत्न म्हणजे पूर्णतः विजय