तुलसीदासांची गोष्ट
स्पष्टीकरण:
जेव्हा मनुष्य मरतो, त्याची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता जागच्या जागी राहते. त्याची पत्नी पोहोचवण्यासाठी दरवाजापर्यंत येते. त्याचे नातेवाईक बांधव स्मशानापर्यंत त्यांची सोबत करतात. केवळ त्याचा सद्गुरू, परमेश्वर त्यापलीकडेही त्याला साथ देतो, त्यांच्याबरोबर असतो आणि म्हणूनच मनुष्याचा एकमेव खरा मित्र, बांधव आणि निधान भगवंत आहे.
ज्यांच्या ठिकाणी सर्व तत्त्वे राहतात आणि जो सृष्टीतल्या सर्वांचा अंतर्यामी व अंत:स्फूर्तीरूप आहे. तो परमश्रेष्ठ पुरुष केवळ शरणागतीने, त्याची कृपा संपादन करून, जाणता व अनुभवता येतो.
त्याची सर्वातीतता व सर्वागतता नीट लक्षात घ्या आणि आपल्यातील उणीवा, अपूर्णता लक्षात घेऊन, अहंकार समर्पित करा म्हणजे त्याच्या वैभवातला वाटा आपल्याला प्राप्त होईल. “त्वमेव सर्वं मम देव देव” हे देवाधिदेवा, तूच माझे सर्व काही आहेस, अशीच साधकाची मनोवृत्ती असावयास हवी.
तुलसीदास गोष्ट
ही गोष्ट सुप्रसिद्ध संतकवी तुलसीदासांची आहे. ते लहान असतानाच त्यांचे आई-वडील मरण पावले. ते अनाथ झाले, पण त्यांच्या मामांनी त्यांचा सांभाळ केला. जेव्हा जेव्हा तो मामांना प्रश्न विचारी त्या त्या वेळी मामा मुलाला (त्यावेळी तो मुन्ना या नावाने हाका मारला जाई) मुन्नाला सांगत की, रामजीच (प्रभू रामचंद्रच) त्याचे मातापिता आहेत. मुना थोडा मोठा झाल्यावर त्याला समजले की, लहान मुलांचे आईवडील नेहमी त्यांच्या जवळ राहात असतात. त्यांच्यापासून वेगळे राहात नाहीत आणि त्याला सहाजिकच आश्चर्य वाटू लागले की आपले मातापिता असलेले रामजी आपल्याला एकटे टाकून देवळात इतक्या वैभवात व बडेजाव स्वीकारत कसे राहतात? नेहमी लोकांच्या घोळक्यात कसे राहतात?
बालक तुलसीदास अगदी निरागस होते. त्यामुळे त्यांनी मामाच्या शब्दावर अगदी पूर्ण विश्वास ठेवलेला होता.
एक दिवस रात्रीच्या वेळी खिडकीतून ते देवळात शिरले आणि श्रीरामाच्या मूर्तीजवळ आले. त्यांना खूप भूक व तहानही लागली होती. त्यामुळे ते रडू लागले आणि त्यांनी मूर्तीजवळच काहीतरी खायला मागितले. त्यांची निष्पापता बघून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रही कळवळले आणि त्यांनी थोडा प्रसाद त्यांना खाण्यासाठी दिला. यामुळे तर तुळशीदासांच्या मनात काहीच संदेह राहिला नाही की रामजीच आपले खरे मातापिता आहेत म्हणून! म्हणून मग त्याने रामजींना (प्रभू रामचंद्राला) विचारले की ते एकटेच का राहतात आणि आपल्या मुलाची काळजी का घेत नाहीत? परंतु मूर्तीने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा मग आपल्या आईवडिलांजवळच राहिले पाहिजे असा ठाम विचार करून तुलसीदासांनी ती मूर्तीच घरी घेऊन जाण्याचा विचार केला.
तो मूर्ती नेत असताना झालेल्या आवाजाने देवळात झोपलेले पुजारी जागे झाले. त्यांनी तुलसीदासांना थांबावयास सांगितले. परंतु तुलसीदासांनी त्यांना सांगितले की ते त्यांच्या आईवडिलांना घरी घेऊन जात आहेत आणि त्या पुजाऱ्यांना त्याच्या रामजीना देवळात डांबून ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही. पुजारी त्याचा पाठलाग करू लागले आणि तुलसीदासही जितके जोरात पळता येईल तितक्या जोरात पळाले. असे पळत असतानाच ते एका तुळशीच्या बनात पडले आणि बेशुद्ध झाले.
कृपाळू भगवंत मुलाच्या प्रेमाने आणि सचोटीने हेलावले आणि देवाच्या कृपेने रामानंद नावाचे एक संत तिथे आले. त्यांनी त्या बालकाला उचलले व त्याचे सांत्वन केले. त्यांनीच (रामानंदांनीच) तो मुलगा त्यांना तुळशीबनात सापडला म्हणून त्याचे नाव तुलसीदास असे ठेवले. संत रामानंदांनी त्या मुलाला सांगितले की, रामजींनीच त्यांना त्याचे मातापिता म्हणून पाठविले आहे. त्या सत्पुरुषाने केलेल्या प्रेमाच्या वर्षावाने तो मुलगा (तुलसीदास) अगदी संतुष्ट व आनंदी झाला.
तेव्हापासून ते तुलसीदास म्हणून ओळखले जाऊ लागले. संत रामानंदांनी केवळ त्यांची सांभाळण्यापुरतीच काळजी घेतली नाही तर त्यांना योग्य ते सर्व शिक्षण देऊन त्यांच्या मनात व हृदयात भक्तीची जोपासना केली. अशा रीतीने परमेश्वरच आपला माता, पिता, बंधू, सखा, मार्गदर्शक व संपत्ती असे सर्व काही असतो. जर आपण श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन केले तर परमेश्वरसुद्धा आपल्यावर कृपादृष्टी करीत असतो.
[Illustrations by Smt. Uma Manikandan]
[Source: श्री सत्यसाई बालविकास गुरू हॅन्डबुक, गट १, वर्ष पहिले; द्वारा: श्री सत्यसाई बुक्स् अॅन्ड पनिकेशन ट्रस्ट, धर्मक्षेत्र, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी ईस्ट, मुंबई. ]