अहमात्मा – पुढील वाचन
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः
अहमादिश्च मध्यंच भूतानामंन्त एव च
(अध्याय-१० श्लोक -२०)
हे अर्जुना! सर्व भूतांच्या हृदयात स्थित असलेला, मी आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदि, मध्य आणि अंतही मीच आहे.
भगवान कृष्ण म्हणतो, “मी सर्व जीवांच्या हृदयात असलेला आत्मा आहे. हे अर्जुना! मी सर्व जीवांचा निर्माता, पालनकर्ता आणि सर्व जीवांचे ध्येय आहे. उदा. -सर्व जीव, माझ्यामधून जन्म
घेतात, मीच त्यांचे पोषण करतो. अखेरीस ते माझ्यामध्ये लय पावतात.” येथे ह्रदय ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे शारीरिक अवयव नव्हे तर आपल्यामध्ये असलेले दिव्य तत्त्व होय. कृष्ण अर्जुनाला ‘गुडाकेश’ ह्या नावांने संबोधतो. गुडाकेश म्हणजे ज्याने निद्रेवर विजय मिळवला आहे तो. ही निद्रा अज्ञानाची आहे. अर्जुनाने अज्ञानावर मात केली आणि त्याला परमेश्वराच्या वास्तवाचे ज्ञान आहे .
बाबांचे स्पष्टीकरण “परमेश्वर प्रत्येक जीवामधील अंतरात्मा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वेही त्याचेच स्वरूप आहे. अत्यंत सूक्ष्मांपासून ते स्थूलापर्यंत तो प्रत्येक गोष्टीत विद्यमान आहे. कोणतीही अशी वस्तु नाही की जी तो नाही. कोणतेही असे नांव नाही जे त्याचे नाही. तो सर्वांची माता आहे आणि पिताही आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्यामधून उद्भवते. त्यांच्यामध्ये त्यांचे अस्तित्व असते आणि अखेरीस त्याच्यामध्येच लय पावते.”
आत्मस्वरुपात असलेले परमेश्वराचे अस्तित्व, डोळ्यांनी पाहण्याची, नाकाला वास घेण्याची, जीभेला स्वाद घेण्याची आणि त्वचेला स्पर्शज्ञानाची शक्ती देते. हाता पायांना हालचाल करण्याची शक्ती देणारा तोच आहे. वाचाशक्ती, विचारशक्ती, जाणण्याची आणि समजून घेण्याची शक्तीही तो देतो. श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन आणि मज्जा संस्था ह्या सारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थांना तोच कार्यशील बनवतो.
परमेश्वराचा नेमका पत्ता काय आहे.
बाबा म्हणतात, “परमेश्वर मनुष्यनिर्मित मंदिरांमध्ये राहत नाही. ते त्याचे केअर ऑफ (c/o) पत्ते आहेत. परमेश्वर त्याने स्वतः बांधलेल्या मन्दिरांमध्ये तो वास करतो. तो सर्व जीवांमध्ये आणि वस्तुंमध्ये विद्यमान आहे. मानव, पशु, पक्षी, वनस्पती आणि इतर सर्व जीवांमध्ये त्याचा वास आहे.”
परमेश्वर जीवांमध्ये वास करतो हे, शिर्डीमध्ये राहणाऱ्या श्रीमती तर्खडांच्या गोष्टीमधून स्पष्ट होते. एके दिवशी दुपारी, भोजन वाढले जात असताना, एक भुकेला कुत्रा तेथे आला आणि कण्हु लागला. श्रीमती तर्खड ताडकन उठल्या आणि त्याला पोळी खायला दिली. त्या कुत्र्यानेही ती आनंदाने खाल्ली. दुपारी नंतर त्या द्वारकामाईत जाऊन बाबांपासून थोड्या अंतरावर बसल्या होत्या. तेव्हा साईबाबा त्यांना म्हणाले, “आई तू मला रुचकर अन्न दिलेस, माझा जीव तृप्त झाला. नेहमी असे कर्म कर. तुला चांगले पद प्राप्त होईल. माझ्यावर अशीच करुणा कर. आधी भूकेल्यास अन्न दे आणि मग तू खा.”
बाबा कोणत्या “संदर्भात बोलत आहेत हे त्यांना कळेना. बाबा त्यांना म्हणाले, ज्या कुत्र्याला तू पोळी खायला घातलीस तो आणि मी एकच आहोत. इतर प्राणिमात्रा आणि मी एकच आहोत. त्यांच्या स्वरुपात वावरणाराही मीच आहे. जे सर्व प्राणिमात्रात मला पाहतात ते मला प्रिय आहेत. म्हणून द्वैतभाव सोडून दे आणि आज जशी केलीस तशीच माझी सेवा कर.”