गोल्डस्मिथचे स्वर्ण हृदय
ऑलिव्हर गोल्डस्मिथ एक महान इंग्लिश निबंधकार, कादंबरीकार आणि नाट्य लेखक होता. तो अत्यंत दयाळू होता. त्याला मुले खूप प्रिय होती आणि रंजल्या गाजल्यांना मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असे.
तरुणपणी डॉक्टर होण्यासाठी त्याने वैद्यकीय शाखेचा अभ्यास केला. नंतर त्याने डॉक्टरीचा व्यवसाय केला नाही. एक गरीब स्त्रीचा पती आजारी होता. तिने गोल्डस्मिथच्या दयाळुपणाविषयी ऐकले होते. ती त्याच्याकडे जाऊन म्हणाली, “साहेब, माझे पती खूप आजारी आहेत. माझ्याकडे डॉक्टरांना द्यायला पैसे नसल्यामुळे, डॉक्टरांकडे मी जाऊ शकत नाही. तुम्ही एकदा येऊन त्यांना पाहाल का साहेब?”
त्या वृध्द स्त्रीबरोबर गोल्डस्मिथ तिच्या घरी गेला. रुग्ण अत्यंत अशक्त आणि दुर्बळ झाला होता. त्याने घरात आजूबाजूला नजर टाकली. तेथे कोठेही चूल दिसली नाही. त्यांची अन्नानदशा झाल्याचे दिसत होते. त्या वृध्दाच्या अंगावर देह झाकण्यापुरतेही वस्त्र नव्हते. त्यांनी त्या वृद्धेशी काही संवाद केला व तेथून निघत असताना ते म्हणाले, “आई, मी काही गोळ्या पाठवतो. त्या तुम्ही त्यांना नक्की द्या.”
घरी गेल्यावर त्यांनी एका छोट्या खोक्यात १० नाणी (गिनी, ग्रेट ब्रिटनच्या चालनातील नाणी) घातली व त्या खोक्यावर लिहिले “ह्याचा उपयोग दूध, ब्रेड व कोळसे विकत घेण्यासाठी करावा. संयम आणि उमेद बाळगा.”
एका दूताबरोबर ते खोके पाठवण्यात आले. आजारी वृध्दाने ते खोके उघडून पाहिल्यावर त्याला असे वाटले की त्यांनी केलेली उपाय योजना, डॉक्टरच्या औषधांपेक्षा उत्तम आहे. काही आठवड्यानंतर, तो वृध्द डॉक्टरांच्या भेटीला जाऊ शकला व त्यांनी योग्य वेळी दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे खूप,खूप आभार मानले.
प्रश्न
- गोल्डस्मिथ कोण होता?
- तो रुग्ण कशाने पीडित होता?
- डॉक्टरानी कोणते औषध दिले?
- ह्या कथेचे तात्पर्य काय?
[स्त्रोत: Stories ofr children – II
प्रकाशक: SSSBPT, Prashanti Nilayam.]