जोन ऑफ आर्क
फ्रान्सच्या लॉरेन परगण्यातील एका दूरच्या खेड्यात जॅक द आर्क नावाचा एक खेडूत राहत होता. त्याला एक मुलगी होती. तिचे नाव जोन ऑफ आर्क होते. ह्या कथेच्या दरम्यान ती २० वर्षाची होती. लहानपणापासूनच ती एकलकोंडी होती. दिवसभर ती मेंढ्या आणि गाईगुरांची देखभाल करत असे. एकही मनुष्य तिच्या दृष्टीस पडत नसे, वा कोणा मनुष्याचा आवाजही तिच्या कानावर पडत नसे. ती त्या अंधाऱ्या छोट्याशा खेड्यातील चर्चमध्ये कित्येक तास प्रार्थना करत असे. तेथे तिला कोणीतरी भेटेल, कोणीतरी तिच्याशी बोलेल असे तिला वाटे. अनेक ग्रामस्थांचा असा समज होता की जोनला अतीन्द्रिय दृष्टी आहे आणि ती त्यांच्याशी कानगोष्टी करते. देवदूत आणि आत्मे तिच्याशी बोलतात.
एक दिवस तिने तिच्या वडिलांना सांगितले की तिला विचित्र आवाज ऐकू येतात आणि ते तिला फ्रान्सचा युवराज डौफिन ह्याच्याकडे जाऊन त्याला मदत करण्यास सांगतात. चर्चच्या घंटा वाजू लागल्या की नेहमीच तिला त्यांचे आवाज ऐकून येत असत.
तिला जी अतीन्द्रिय दृश्ये दिसत व आवाज ऐकू येत त्यावर तिचा विश्वास होता. तिचे वडील म्हणाले, “मी सांगू जोन, हे सर्व तुझ्या मनाचे आभास आहेत. आता तुझी काळजी घेणारा दयाळू पती असायला हवा.” त्यावर जोनने त्याला उत्तर दिले, “मी नाही विवाह करणार. मी जाऊन डौफिनला मदत करेन.”
एक दिवस जोन तिच्या काकांबरोबर बाउंड्रीकोर्ट नावाच्या एका सरदारास (उच्चपदस्थ अधिकाऱ्यास) शोधण्यासाठी प्रवासास निघाली. कारण तो अधिकारी तिला डौफिनकडे घेऊन जाऊ शकला असता. त्या सरदाराच्या घरी पोहोचण्यासाठी त्यांना दूरवर प्रवास करावा लागला. त्यांच्या प्रवेशद्वारावरील दरवानाने आत जाऊन त्यांस सांगितले, की एक गरीब शेतकरी मुलगी त्यांना भेटू इच्छिते. त्याने त्या दरवानास त्यांना घालवून देण्यास सांगितले. परंतु क्षणभरातच त्याचे मन बदलले. त्याने जोनला आत बोलावून प्रश्न विचारले. त्यानंतर डौफिन राहत असलेल्या चिनॉन शहरांमध्ये जोनला पाठवण्याची त्याला इच्छा होती. म्हणून त्याने तिला एक घोडा व तलवार विकत घेऊन दिली व तिच्या सोबत, चिनॉनला घेऊन जातील अशी दोन माणसे दिली. जोनने पुरुषी वस्त्र परिधान केली. व तलवारही बरोबर घेतली. ती तिच्या घोड्यावर स्वार झाली व त्या दोन माणसांबरोबर रस्त्यावरून जाऊ लागली.
जोन चिनॉनला पोहोचल्यावर ती डौफिनला भेटली. व तिने त्याला सांगितले की परमेश्वराने तिला त्यांच्या शत्रूचा पाडाव करून ऱ्हिम्सचा राजा म्हणून त्याच्या मस्तकावर राज्यमुकुट घाल, असा आदेश दिला आहे.
डौफिनने काही उच्चविद्याविभूषित लोकांचा व धर्मगुरूंचा सल्ला घेतला. त्यांनी तिला प्रश्न विचारले व तिच्याकडे विशेष आध्यात्मिक शक्ती असावी असे त्यांना वाटले.
जोन पुन्हा तिच्या घोड्यावर स्वार होऊन ऑर्लिन्सला पोहोचली. पांढऱ्या शुद्ध अश्वावर ती स्वार झाली. तिने चमकदार, तेजस्वी चिलखत घातले होते. कमरेच्या पट्ट्याला तलवार लटकवली होती. तिच्यापुढे एक पांढरा ध्वज होता. तिच्यामागे शहरातील रक्षणकर्त्यांसाठी अन्न पुरवठा घेऊन निघालेली सैन्याची एक मोठी पलटण होती. ऑर्लिन्स शहरास इंग्लिश सैन्याने घेराव घातला होता.
तिला पाहून भिंतींवर बसलेली लोकं मोठ्याने ओरडू लागली, “कुमारी आली! ती आपले रक्षण करेल!” त्या कुमारीला पाहून इंग्लिश लोकांच्या मनात भय निर्माण झाले. फ्रेंचांनी इंग्रजांची व्यूहरचना तोडून बॅर्लिन्समध्ये प्रवेश केला.
त्यावेळेस पासून जोन ‘द मेड ऑफ ऑर्लिन्स’ (ऑर्लिन्सची कुमारी) झाली. ती काही दिवस ऑर्लिन्समध्ये राहिली. त्यानंतर एक दिवस तिने बिसीजर सॅण्ड विरोधात फ्रेंच सैन्याचे नेतृत्व करून त्यांचा पराभव केला. आणि त्यांना तेथून पळवून लावले. त्यानंतर तिने इंग्रजांच्या सैन्याविरुद्ध फ्रेंच सैन्याचे नेतृत्व करून त्यांना अनेक युद्धामध्ये पराजित केले.
अखेरीस मेड ऑफ ऑर्लिन्स आणि डौफिन ऱ्हिम्सला आले. तेथील एका मोठ्या चर्चमध्ये डौफिनने राजमुकुट स्वीकारला व तो ७ वा चार्लस बनला. त्यानंतर मेडने विनम्रतेने त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याला म्हणाली, “मी माझे कर्तव्य पार पाडले. त्यासाठी मी फक्त एकच प्रतिफळ (बक्षीस) मागते, मला माझ्या घरी परत जाऊ द्या.” परंतु राजाने तिला मोठ्या प्रमाणावर धन देण्याचे योजले होते.
गाई गुरे राखण्याचे साधेसुधे जीवन जगण्यासाठी जोन तिच्या खेड्यामध्ये परतली नाही. तिने राजाला सहाय्य करणे सुरू ठेवले. ती संपूर्णतः नि:स्वार्थ, विनयशील व धर्माला अनुसरून जीवन जगली. अखेरीस ती ब्रिटीशांच्या हातात सापडली. त्यांनी तिला जाळले परंतु अग्नी तिच्या आत्म्याचा व तिच्या कार्याचा नाश करू शकला नाही. तिचे देशप्रेम व तिचे नेतृत्व फ्रेंच लोकांना दीर्घकाळ मार्गदर्शन करत राहिले. थोडे थोडे करून, फ्रेंचांनी इंग्रजांना फ्रान्सच्या बाहेर घालवून अखेरीस ते स्वतंत्र झाले.
प्रश्न:
- जोनला जे आवाज ऐकू येत त्याबद्दल तिला काय वाटे?
- तिला डौफिनच्या दरबारात कोणी पाठवले?
- डौफिनने काय केले?
- तिला ‘द मेड ऑफ ऑर्लिन्स’ का म्हणत?
- तिने डौफिनला कशाप्रकारे मदत केली?
- जोनच्या बाबतीत अखेरीस काय घडले ?
[स्रोत – Stories for children II
प्रकाशक – SSSBPT, Prashanti Nilayam]