लुई पाश्चर
एक छोटा मुलगा लोहाराच्या भट्टी समोर उभा होता आणि आतमधील भयानक दृश्य पाहून तो भयचकित झाला. त्याच्या चेहर्यावर भय आणि करूणाभाव उमटले होते. त्या लोहाराकडे एका मनुष्याला आणण्यात आले होते. त्याला पिसाळलेले कुत्रे चावले होते. त्या लोहाराने, लाल होईपर्यंत एक लोखंडी सळई भट्टीत तापवली. त्याच्या सहाय्यकाने त्या मनुष्याला खाली झोपवून घट्ट धरून ठेवले, व त्याने ती सळई, कुत्र्याने चावा घेतल्यामुळे झालेल्या जखमेवर आत घातली. तो मनुष्य वेदनेने किंचाळू लागला. अखेरीस तो इतका थकला की त्याला कण्हणेही शक्य नव्हते.
ते वर्ष होते १८३१ आणि तो मुलगा होता लुई पाश्चर. त्याचे वडील जीन जोसेफ स्थानिक चर्मकार होते. पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने रेबीज नावाचं जो प्राणघातक रोग होतो, त्यावर त्या काळामध्ये, लुईने लोहाराकडे पाहिलेले जे दृश्य होते तो एकमेव उपचार माहित होता. अर्धशतकानंतर, हा मुलगा मोठा शास्त्रज्ञ होऊन, ह्या भयानक आजारावर उपाय शोधून काढणार होता.
रेबीज ह्या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार कुत्री, कोल्हे, लांडगे व वटवाघुळां पासून होतो. परंतु बहुतांशी कुत्र्यांकडून होतो. आजारी कुत्रे पिसाळते आणि जे त्यांच्या टप्प्यात येतात त्यांना चावते. त्या रोगाचा प्रसार कुत्र्यांकडून इतर पशुंमध्ये आणि मानवामध्ये होतो. जर त्यावर उपचार केले नाहीत तर त्या सर्वांना मृत्यू येतो व तो ही भयानक मृत्यू!
पाश्चरनी त्या रोगाचे कारण आणि उपचार शोधून काढेपर्यंत लोखंडी सळई तापवून जखमेमध्ये घालण्याचा उपचार चालू होता. त्या जखमेला जाळून काढल्याने बरा होत नव्हताच परंतु त्या रुग्णाच्या दुःखामध्ये, वेदनांमध्ये अधिक वाढ होत असे.
लुई पाश्चरचा जन्म १८२२ मध्ये फ्रान्समधील ‘डोल ह्या खेड्यामध्ये झाला. लहानपणी लुईबद्दल सांगण्यासारखे विशेष काही नव्हते. जे कोणी त्याला ओळखत होते त्यांच्यापैकी कोणीही असे भाकीत करू शकला नसता की एक दिवस लुई सुप्रसिद्ध व्यक्ति होईल व जगभरात त्याचे नांव कृतज्ञतेने घेतले जाईल.
परंतु थोडा मोठा झाल्यावर त्याला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र ह्या विषयांमध्ये रस वाटू लागला. त्याला त्या विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त झाले. नंतर तो रसायन शास्त्राचा प्राध्यापक झाला. द्राक्षाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भागातील लिल ह्या शहरात तो नोकरी करत होता. येथेच त्याने त्याच्या कामास सुरुवात केली. जे अखेरीस त्याला मानवजातीस अत्यंत लाभदायक झालेल्या शोधाप्रत घेऊन गेले.
ज्यांना जंतू वा सूक्ष्मजंतूही म्हटले जाते अशा जिवंत जिवाणूंपासून वाईन, दूध व लोणी आंबते वा नासते हे त्याने सिद्ध केले. हे जंतू उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत ते केवळ मायक्रोस्कोप खाली दिसू शकतात. हे जंतू केवळ गरम पाण्यानेच नष्ट होऊ शकतात हे ही त्याने दर्शविले. म्हणून दूध नासू नये म्हणून आजही ते गरम करण्याची पद्धत वापरली जाते. हे शोधून काढल्याने तो ह्या निष्कर्षाप्रत आला की मनुष्य, पशु आणि वनस्पती ह्यांचे बहुतांश रोग ह्या अपायकारक जंतूंमुळे होतात.
त्यावेळी फ्रान्समधील रेशीम उद्योग संकटात सापडला होता. एका अज्ञात रोगामुळे हजारो रेशीम किडे नाश पावले होते. रेशीम उद्योगातील अनेक कुटुंबांचे चरितार्थ धोक्यात आले होते. पाश्चरनी त्या समस्येचा अभ्यास केला व ह्या रोगाचा प्रादुर्भावही अपायकारक जंतूंमुळे झाल्याचा त्याने शोध लावला. व त्या जंतूंचा संसर्ग कसा टाळायचा हे त्याने उत्पादकांना शिकवले.
त्याच्या पुढील शोधाने, अखेरीस त्याला रेबीजच्या विरुद्धची लढाई जिंकून दिली. त्याने प्रयो गांची मालिका सुरू केली. त्याने मोठ्या संख्येने कॉलराचे जंतूं वाढवले आणि सुदृढ कोंबड्याच्या शरीरात सोडले. कोंबड्या आजारी पडल्या व मरण पावल्या. रोग होण्यास अपायकारक जंतू कारणीभूत ठरतात ह्या त्याच्या सिद्धांताचा हा अजून एक पुरावा होता.
ह्या परिणामांनी प्रोत्साहित होऊन त्याने त्याचे लक्ष रेबीजकडे वळवले. त्याचे पहिले ध्येय होते की ह्या रोगास कारणीभूत असलेले जंतू कोठे होते हे शोधून काढणे. ते जंतू पिसाळलेल्या कुत्र्यांच्या लाळेत असावेत असा त्याचा तर्क होता. कारण त्यांच्या चाव्याने मनुष्य रेबीजग्रस्त होत असे.
ह्याची खात्री करण्यासाठी त्याला आजारी कुत्र्यांची लाळ गोळा करावी लागली हे काम अत्यंत धोकादायक होते. दोन शक्तीशाली माणसे दोरीच्या फासामध्ये आजारी कुत्र्याला अडकवून त्याला बाकावर ताणून खाली दाबून धरत.
त्यानंतर पाश्चर त्या कुत्र्याच्या ओठांमधून एक काचेची नळी आत घालत असे व त्याची थोडीशी लाळ काढून घेत असे. त्यांची निर्भयता व समर्पण त्यामुळे ते असा धोका पत्करू शकले. कुत्र्याचा एक चावा त्यांच्या कोणासाठीही प्राणघातक ठरू शकला असता. त्याने ती लाळ सुदृढ कुत्र्याच्या शरीरात सोडली. परंतु येथे त्याला एका अडचणीस सामोरे जावे लागले. कधीकधी त्या कुत्र्याच्या शरीरामध्ये रोगाची वाढ होण्यास अनेक महिने लागत व तोपर्यंत तो नॉर्मलच दिसत असे. जेव्हा असे घडत असे तेव्हा त्यांच्या शरीरात घातलेल्या लाळेने त्यांना संसर्ग होतो का हे पाहण्यासाठी त्याला बरेच महिने प्रतीक्षा करावी लागे.
जनावरांच्या मेंदूवर जंतू हल्ला करतात म्हणून त्याने ती लाळ जनावरांच्या थेट मेंदूमध्ये घालून त्या अडचणीवर मात केली. ही पद्धत अवलंबिल्याने तो सुदृढ कुत्र्यांना दोन आठवड्यात रोगाचा संसर्ग घडवून आणण्यात यशस्वी झाला. त्याच्या पुढची पायरी होती कमजोर वा दुर्बल रेबीजच्या जंतूंना सुदृढ कुत्र्यांच्या शरीरात सोडून त्या कुत्र्यांचा रोगापासून बचाव करता येतो का हे पाहणे. कॉलऱ्याच्या बाबतीत जर ही पद्धत लागू पडली तर ती येथेही लागू पडली पाहिजे.
त्यानंतर त्याने सशांवर हा प्रयोग केला. त्याने रोगजंतू असलेली लाळ सशांच्या मेंदूंत घातली. तो ससा मेल्यानंतर त्याने त्या सशाच्या मेंदूचा छोटा तुकडा काढून, १४ दिवस एका निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये ठेवला. १४ दिवसांच्या काळात बाटलीमधील जंतू दुर्बल झाले. त्यानंतर त्याने त्या मेंदूच्या तुकड्याची भुकटी करून पाण्यात मिसळली व काही सुदृढ कुत्र्यांच्या शरीरात टोचली.
दुसऱ्या दिवशी त्याने फक्त १३ दिवस बाटलीत ठेवलेल्या मेंदूचे मिश्रण सुदृढ कुत्र्यांच्या शरीरात टोचले असे करत गेला. टप्प्याटप्प्याने भुकटीमध्ये जंतूंची संख्या वाढत गेली.
अखेरीस, त्याने एक दिवस ठेवलेल्या मिश्रणाचे इंजेक्शन दिले. १४ दिवस चाललेल्या या प्रयोगाच्या शेवटी, त्यांनी रेबीजच्या कुत्र्यांना, त्यांच्या प्रयोगातील कुत्र्यांना चावू दिले. त्याच्या कुत्र्यांनी सहजतेने रोगाचा प्रतिकार केलेला पाहून तो खूप उत्साहित झाला.
आता या पद्धतीची मानवी देहावर चाचणी घ्यायची होती. ह्यासाठी त्याने जोसेफ मेस्टर नावाच्या मुलाची निवड केली. त्याला बऱ्याचदा पिसाळलेले कुत्रे चावले होते.
त्याच्या शरीरावर असंख्य जखमा असल्यामुळे त्यांना लोखंडाच्या सळईने डाग देणे शक्य नव्हते. त्याने कुत्र्यांना ज्या पद्धतीने इंजेक्शन्स दिली त्याच पद्धतीचा वापर त्याने त्या मुलासाठी केला. त्यापैकी त्याने दहा इंजेक्शन्स दिली. प्रत्येक वेळी डोसाचा विषारीपणा वाढतच होता. त्या मुलाला रोगाचा संसर्ग झाला नाही आणि तो आनंदाने आपल्या गावी परतला.
त्याचा पुढचा रुग्ण होता ज्युबिली नावाचा एक मुलगा. आपल्या मित्राला एका पिसाळलेल्या कुत्र्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या शौर्याने प्रयत्न करत असताना त्याला ते पिसाळलेले कुत्रे चावले. पाश्चरनी ह्या उपचाराची पुनरावृत्ती करून ज्युबिलीला थोड्याच दिवसात बरे केले.
पाश्चरच्या ह्या अपूर्व शोधाची बातमी जगभरात पसरली. केवळ फ्रान्सच्या विविध भागातील लोकच नव्हे तर अमेरिकेसारख्या दूर देशातूनही लोकं त्याच्याकडे येऊ लागली. त्याच्यावर मानसन्मानांचा वर्षाव झाला आणि तो फ्रान्सचा एक महान सुपुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला.
प्रश्न:
- कोणत्या प्रसंगाने त्यांचे अंतःकरण दयार्द्र झाले?
- कुत्रे चावल्यावर बरे करण्यासाठी पूर्वी कोणते उपचार करतात असत?
- त्यांनी कोणता शोध लावला?
- लुई पाश्चरने मानवतेसाठी केलेल्या सेवाकार्याचे वर्णन करा.
[स्रोत: Stories for children – II
प्रकाशक: SSSBPT, Prashanti Nilayam]