मानव सेवा हीच माधव सेवा
मार्टिन नावाचा एक चांभार होता. एकदा तो बायबल छातीवर ठेवून झोपी गेला. झोपताना त्याच्या मनात ख्रिस्ताचे शब्द घोळत होते, “पहा! मी दारात उभा आहे आणि दरवाजा ठोठावत आहे. जो कोणी माझा आवाज ऐकून दार उघडेल, त्याच्याकडे मी येईन आणि मी त्याच्याबरोबर आणि तो माझ्याबरोबर आम्ही एकत्र जेवण घेऊ.
तो विजयी होईल, यशस्वी होईल. त्याला मी माझ्याबरोबर माझ्या सिंहासनावर बसण्याचा हक्क प्रदान करेन. जसा मी विजयी होऊन माझ्या पित्याबरोबर त्याच्या सिंहासनावर बसलो.”
प्रभू त्या रात्री त्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला भेटण्याचे वचन दिले. त्यांने सकाळी लवकरच त्याचे स्नानादी विधि आटोपले आणि दोघांचा चहा व भोजन बनवले व तो प्रभूची प्रतीक्षा करत होता. प्रभूच्या स्वागताची आतुरता त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. दरम्याने बर्फ पडत होते. त्याच्या दृष्टीस पडलेला पहिला मनुष्य रस्त्याची देखभाल करणारा म्युन्सिपल कर्मचारी होता. लोक जागे होऊन त्यांच्या घराचे दरवाजे उघडण्याच्या आत त्याला त्याचे काम संपवायचे होते. मार्टिनच्या मनात आले, काय हा विरोधाभास! गोठवणाऱ्या थंडीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी जे घरांच्या दारेखिडक्या बंद करून फायर प्लेसच्या उबेमध्ये स्वतःला उबदार ठेवतात, अशा लोकांच्या दारेखिडक्या उबदार बनवण्यास सहाय्य करण्यासाठी, बाहेर हिमवर्षावामध्ये वृद्ध मनुष्य काम करत आहे. आतले लोकं वुलन ब्लँकेट्समध्ये गुरफटून झोपले आहेत, तर हा वृद्ध मनुष्य बाहेर कडाक्याच्या थंडीत कुडकुडत आहे.
मार्टिनने त्याला थोडी विश्रांती घेण्यासाठी आत बोलावले. त्याच्या स्वतःसाठी बनवलेला चहा त्याने त्या वृद्धास दिला. स्टोव्हच्या बाजूला बसण्यास सांगून उब घेण्यास सांगितले. त्या मनुष्याने त्याचे आभार मानले व तो तेथून निघाला नंतर त्याच्या दारात जी दुसरी व्यक्ती आली ती एक वृद्ध स्त्री होती. ती अत्यंत भुकेलेली आणि थंडीने इतकी गारठली होती, की तिला एक पाऊलही पुढे टाकणे शक्य नव्हते. त्याने तिला आत बोलावून स्वतःचे ब्लॅंकेट दिले. आणि स्वतःसाठी बनवलेला अन्नाचा वाटा तिला खाऊ घातला. तिने त्याला आशीर्वाद दिले व ती तेथून बाहेर पडली.
त्यानंतर एक गरीब स्त्री आपल्या लहान बाळाला घेऊन त्या रस्त्यावरून जात असलेली त्याने पाहिली. तिचे बाळ भुकेने कळवळून रडत होते. त्याने तिला आत बोलावून परमेश्वराच्या वाट्याचे अन्न दिले व त्या तान्ह्या बाळाला परमेश्वराच्या वाट्याचे दूध दिले. त्याने तिला आपल्या स्वर्गीय पत्नीचे कपडेही दिले. तिनेही कृतज्ञतेने रजा घेतली.
सूर्यास्त होऊ लागला होता. आज प्रभू येईल असे त्याला वाटत नव्हते. तो निराशेने व दुःखाने हताश होऊन खाली बसला. त्याच्या मनात आले समजा प्रभू आता आले तर मी त्यांना काय देऊ? त्यांच्याकडे अन्न व दूध काहीही शिल्लक नव्हते. त्या वेदनादायी कल्पनेने त्याचे मन अधिकच झाकोळून गेले. परंतु जशी रात्र झाली काळोखाने समस्त विश्वाला वेढून टाकले. त्याला झोपडीत पावलांचा आवाज ऐकू आला. एका अलौकिक प्रकाशने त्याची झोपडी उजळून निघाली. त्याने तर झोपडीत दिवा ही लावला नव्हता. त्यामुळे त्या प्रकाशाने तो विस्मयचकित झाला.
त्या दिव्य प्रकाशात, त्याला तो वृद्ध कुडकुडणारा कामगार दिसला. त्याने त्याचे आभार मानले व तो निघून गेला. त्यानंतर ती वृद्ध स्त्री दिसली. ती ही त्याला आशीर्वाद देऊन निघून गेली. शेवटी ती भुकेली आई आणि तिचे तान्हे बाळ दिसले. तेही निघून गेले आणि ते कोण होते?…. त्यांच्यापैकी तर कोणी नव्हते! ते प्रत्यक्ष प्रभू होते! ते सर्वजण म्हणजे तोच आहे ह्याची साक्ष दिली. “त्याने माझेच आदरातिथ्य केले, तो मीच होतो.” त्यांनी त्या चांभाराला आशीर्वाद दिले व छातीशी कवटाळले आणि अंतर्धान पावले.
प्रश्न:
- मार्टिन कशा प्रकारचा मनुष्य होता?
- परमेश्वराने झोपेमध्ये मार्टिनला काय सांगितले?
- त्याने त्या रस्त्यावरील कर्मचाऱ्यास कशा प्रकारे मदत केली?
- त्यानंतर मार्टिनला कोण भेटले?
- ह्या कथेमधून तुम्ही कोणता धडा घ्याल?
[स्त्रोत: Stories for children-II
प्रकाशक: SSSBPT, Prashanti Nilayam.]