यदा यदा -पुढील वाचन
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
(अध्याय -४ श्लोक- ७)
हे भारता ! जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी, मी स्वतः अवतीर्ण होतो.
परमेश्वराने स्वतः ह्या सृष्टीची निर्मिती केली आहे आणि सृष्टीचा कारभार सुरळीत व सुव्यवस्थित चालावा ह्यासाठी त्याने विविध कायदे कानून बनवले आहेत. प्रत्येक जीवासाठी तेथे सद्वर्तणुकीचे नियम आहेत. ह्यातून धर्माची रचना होते. जगातील प्रत्येक व्यक्तीस त्याचा स्वतःचा विशेष धर्म असतो वा प्रत्येकाची वेगवेगळी कर्तव्ये असतात.
जेव्हा लोकं धर्ममार्गावरून ढळतात आणि सन्मार्गाचे अनुसरण करत नाहीत तेव्हा ते अधर्माचे आचरण करतात. एखाद्या शेतात पिकाहून तण अधिक माजते तशासारखे हे आहे. पिकाची झपाट्याने वाढ होण्यासाठी तण उपटून टाकणे जरूरीचे असते.
जेव्हा नीतीनियमांचे पालन केले जात नाही, जीवनाचे उद्दीष्ट विसरले जाते, जगामध्ये दुराचरणाचे प्राबल्य दिसून येते तेव्हा परिस्थितीमध्ये योग्य सुधारणा घडवून आणण्यासाठी परमेश्वर स्वतः पृथ्वीवर अवतरतो.
भगवान कृष्ण म्हणतो की जेव्हा जेव्हा जगाला उन्नत करण्याची गरज भासते तेव्हा तो नाम रुप धारण करुन अवतीर्ण होतो. हिरण्यकश्यपू ज्याला असा वर मिळाला होता की मनुष्य वा पशुकडून त्याला मृत्यु येणार नाही, त्याचा वध करण्यासाठी त्याने नरसिंह अवतार (अर्धा नर,अर्धा सिंह) धारण केला होता. दुष्ट दुराचारी रावणाचा वध करण्यासाठी तो प्रभु राम बनून आला. आणि अधम, दुष्ट राजा कंस व कौरव ह्यांचा नाश करण्यासाठी त्याने कृष्ण अवतार घेतला.
गतजन्मातील पापपुण्याच्या फलानुसार मनुष्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. त्यांचा कर्मजन्म असतो. तर परमेश्वराचा लीलाजन्म असतो. तो त्याच्या स्वतःच्या संकल्पाने येतो. सज्जनांच्या, साधुसंतांच्या प्रार्थना आणि दुष्ट दुर्जनांची पापकर्म ह्यांच्यामुळे परमेश्वर जन्म घेतो.