यत्करोषि – पुढील वाचन
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्॥
(अध्याय- ९, श्लोक -२७)
हे कौन्तेय! तू जे कर्म करतोस,जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर.
बाबा म्हणतात, “जे काही तुम्ही करता ते परमेश्वरास संतुष्ट करण्यासाठी करा. तुमची सर्व कर्म सर्वांसाठी कल्याणकारक असायला हवीत. असे केलेत तर तुम्ही मला अत्यंत प्रिय व्हाल व मी तुमचा सखा बनेन.
जर एखाद्याला तुम्ही अन्नातला एक घास दिलात तर तो योग्य रितीने द्या.”
तुम्ही जे काही कराल ते काळजीपूर्वक करा. उदा. -परमात्म्याची निरंतर जाणीव. नेहमी धर्माला (सदाचरणाला) अनुसरून कर्म करा.
श्रीमती गीता राम ह्या संदर्भातील एक सेवेविषयीचा अनुभव सांगतात. मुलाखतीच्या दरम्यान स्वामींनी एका स्त्रीभक्तास विचारले, “तुमच्या गावातील सेवा कशी चालू आहे?” तिने ती उत्तम प्रकारे चालू असल्याचे सांगितले. त्या काळामध्ये स्वामी असे सांगत की दररोज जेवण बनवताना एक मूठभर तांदूळ बाजूला काढून ठेवावेत व प्रत्येकाच्या घरातून ते गोळा करून एखाद्या गरजूस द्यावेत म्हणजे तुम्हाला दररोज सेवा केल्यासारखे वाटेल. ती स्त्री तिच्या गावात होणाऱ्या सेवाकार्याविषयी सांगू लागली. ती सेवा विभागाची प्रमुख असल्याने ती अत्यंत अभिमानाने सर्व सांगत होती.
स्वामी म्हणाले, “आनंद आहे.”
नंतर स्वामींनी विचारले, “दोन रुपये किलोचे तांदूळ की पाच रुपये किलोचे तांदूळ?
प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचा तांदूळ देतो असे तिने सांगितले. त्यावर स्वामींनी विचारले, “मी इतर लोकांचे विचारत नाहीय, तू कोणता तांदूळ देतेस ते विचारतोय?”
ती चाचरत म्हणाली, “चांगला तांदूळ देते स्वामी.”
स्वामींनी प्रत्युत्तर दिल, “काय! गरिबांसाठी, नारायण सेवेसाठी २ रुपये किलोचा तांदूळ! आणि तुझ्या कुटुंबासाठी ५ रुपये किलोवाला तांदूळ. २ रुपये किलोचा तो तांदूळ निवडलेला, साफ केलेला नसतो, त्यात खडे असतात. असा तांदूळ तू गरिबांच्या सेवेसाठी देतेस.”
ती स्त्री म्हणाली, “नाही स्वामी”
ते ऐकून स्वामी खुर्चीवरून उठले आणि म्हणाले, “दोन वर्षापूर्वी मी भिक्षेकरी बनून तुझ्या घरी आलो होतो. तेव्हा तू मला नारायण सेवेसाठी साठवलेला तांदूळ दिलास. तो एका लाल कापडात ठेवला होता, तो तू मला दिलास.
तुझा विश्वास नाही बसत माझ्यावर? थांब जरा!” स्वामी आतल्या खोलीत गेले व एक लाल पिशवी घेऊन बाहेर आले व म्हणाले, “हे तू मला दिलेस नाही का?”
ती स्त्री हुंदके देऊन रडू लागली स्वामींना जो मुख्य संदेश द्यायचा होता तो म्हणजे सेवा प्रेमाने करा. ज्याला तुम्ही सेवा देत आहात त्या प्रत्येकामध्ये साईंना पाहा व तो भाव ठेवून सेवा करा.