माया पात्र
उद्दिष्ट:
मुलांचे कुतूहल वाढवणारा आणि त्यांना कामाचे प्राधान्य आणि वेळेचे व्यवस्थापन या संबंधित माहिती आणि ज्ञान देणारा हा एक रचनात्मक खेळ आहे.
संबंधित मूल्ये:
- जिज्ञासा
 - विवेक बुद्धी
 - निर्णय क्षमता
 - सहकार्य
 
साहित्य:
- दोन सारख्या आकाराची भांडी
 - गोट्या
 - खडी
 - वाळू /कोरडी माती
 - वेगवेगळ्या कपामध्ये सारख्या प्रमाणात पाणी
 
खेळ कसा खेळावा
- गुरुंनी वर्गातील मुलांचे दोन गट बनवावेत.
 - प्रत्येक गटाला दोन भांड्यांपैकी एक भांडे (माया पात्र) आणि त्याबरोबर गोटया, खडी,वाळू किंवा कोरडी माती सुद्धा देण्यात यावी.
 - ह्या खेळामध्ये, त्यांना दिलेल्या भांड्यामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे कमीत कमी वेळात बसवण्याचे आव्हान आहे.
 - ज्या गटाकडून हे कार्य प्रथम पूर्ण केले जाईल त्यांना जास्तीत जास्त गुण मिळतील.
 
गुरूंसाठी सूचना:
- प्रत्येक गटांनी ते भांडे पूर्ण भरल्यानंतर, त्यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांच्याशी चर्चा करावी.
 - त्या चारही वस्तू भांड्यामध्ये घालताना त्यांनी त्या वस्तूंचा क्रम कसा निश्चित केला?
 - तो क्रम निश्चित करताना त्यामागे काही विशेष कारण होते का?
 - वा त्यांनी प्रत्येक गोष्ट विचार न करता केली?
 - तसे असेल तर त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले?
 - मुलांच्या असे लक्षात येते की जे गट यामध्ये यशस्वी झाले त्यांनी अर्थातच पुढील योग्य क्रमाने प्रथम गोट्या टाकल्या त्यानंतर खडी टाकली त्यानंतर वाळू टाकली आणि शेवटी पाणी टाकले.
 - त्यानंतर गुरूंनी, या खेळाचा आधार घेऊन मुलांना त्यांच्या दैनंदिन कार्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि त्याचे नियोजन करणे कसे गरजेचे आहे हे शिकवावे.
 - या उपक्रमातून असे दर्शविले जाते की प्रथम महत्त्वाची कामे करावीत त्यानंतर आवश्यक परंतु कमी महत्त्वाची कामे करावीत आणि अखेरीस जी फारशी महत्त्वाची नाही अशी कामे करावीत.
 - ताण तणाव टाळण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी हे लागू आहे.
 - आपले भगवान बाबा जे आपल्याला नेहमी सांगतात ‘वेळेचा अपव्यय म्हणजे जीवनाचा अपव्यय’ यासाठी प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन हा एक धडा आहे.
 

                                