घोषणा

Print Friendly, PDF & Email

घोषणा

बाल सत्यास नित्यक्रमामध्ये बांधून घेणे दिवसेंदिवस नकोसे झाले होते. स्वतःला घोषित करण्याची व कुटुंबाचा त्याग करण्याची वेळ आली होती. २० ऑक्टोबर १९४० रोजी सत्या नेहमीप्रमाणे शाळेत निघाला. त्या दिवशी उरवकोंड्याचे एक्साईज इंस्पेक्टर श्री अंजनयेलु ह्यांनी सत्याला शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोबत केली. त्यांनी सत्याच्या मस्तकाभोवती एक तेजोवलय पाहिले. सत्या नेहमीप्रमाणे सकाळची शालेय प्रार्थना म्हणण्यासाठी व्यासपीठावर चढला. प्रार्थना संपल्यावर अचानक सत्याने घोषित केले, “येथून पुढे मी तुमचा राहिलो नाही. ज्यांना माझी गरज आहे व जे मला पुकारतील, मी त्यांचा आहे. “सर्वांना सत्याने केलेल्या घोषणेचा अर्थ समजण्याच्या आतच सत्या पायऱ्या उतरून खाली आला व तसाच घरी गेला.

दरवाजातूनच सत्याने त्याची पुस्तके बाजूला फेकून दिली व मोठ्याने म्हणाला,” आता मी तुमचा सत्या नाही. मी साई आहे.” हे ऐकून त्याची वाहिनी स्वयंपाकघरातून बाहर आली व तिने सत्याकडे पाहिले. सत्याच्या मस्तकाभोवतीचे तेजोवलय पाहून तिच्या डोळ्यांपुढे अंधेरी आली. तिने डोळे मिटून घेतले व ती किंचाळली . सत्याने तिला सांगितले,” मी जातो आहे. मी आता तुमचा नाही. मायेने मला सोडले आहे. माया गेली. माझे भक्त मला बोलावत आहेत. मला कार्य करायचे आहे. आता मी येथे राहु शकत नाही.” तिने खूप आर्जव केली परंतु सत्या वळला व तेथून निघून गेला. ते ऐकून शेषमा लवकर घरी आले. सत्या म्हणाला,” मला बरे करण्याचे प्रयत्न तुम्ही सोडून द्या. मी साई आहे. मी तुमच्या नातेसंबंध मानत नाही.”त्यांचे आवाज ऐकून त्यांचे शेजारी श्री नारायण शास्त्री, काय झाले ते पाहण्यासाठी तेथे आले. सत्याच्या मस्तकाभोवतीचे तेजोवलय पाहुन त्यांनी सत्याच्या पायावर लोटांगण घातले. शेषमांना काय करावे तेच कळत नव्हते. त्यांच्या पालकांनी सत्याला त्यांच्या हाती सोपवल्यामुळे त्यांना असे वा टत होते, की त्यांच्या मातापित्यांस येथे काय घडत आहे ते कळवेपर्यंत सत्याने त्यांच्या घरातच राहावे.

परंतु सत्याने,पुन्हा घरात पाऊल टाकले नाही. तो श्री अंजनेयालुंच्या बंगल्यातील बगीच्यामध्ये गेला व एका झाडाखालील दगडावर बसला. दशदिशांनी लोकं फुले व फळे घेऊन तेथे आली. बाबांनी त्यांना पहिली शिकवण दिली ती –

मानस भजरे गुरु चरणम दुस्तर भव सागर तरणम

मनामध्ये गुरुचरणांचे ध्यान करा. ते तुम्हाला ह्या दुस्तर भवसागरातून पार करतील. लोकांनी ह्या ओळींचे सामूहिक गान केले. त्या शेकडो आवाजांनी वाटिका दुमदुमुन गेली. सत्या आता शाळेत येणार नाही व त्यांना भेटणार नाही हे कळल्यावर त्याच्या सहकाऱ्यांना अश्रू आवरले नाही.

असे तीन दिवस गेले. तीन दिवस भक्तीचा सोहळाच होता. एक फोटोग्राफर तेथे आला. व त्याने फोटो चांगला येण्यासाठी बाबांच्या समोर असलेला दगड बाजूला करण्यास बाबांना विनंती केली. बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तसाच फोटो काढण्यात आला आणि फोटोमध्ये त्या दगडाची शिर्डीच्या साईबाबांची मूर्ती बनली होती.

एकदा एका संध्याकाळी भजन सुरु असताना, बाबा अचानक म्हणाले,”माया आली!” नुकत्याच पुट्टपर्तीतून येणाऱ्या ईश्वराम्माकडे त्यांनी ईशारा केला. जेव्हा पालकांनी घरी येण्यासाठी आर्जव केली तेव्हा ते म्हणाले,” कोण कोणाचे आहे?”ते एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होते,” ही सर्व माया आहे—–मिथ्या आहे.” अखेरीस त्यांनी आईला, खाण्यासाठी काही पदार्थ देण्यास सांगितले. त्यांनी त्याच्या समोर वेगवेगळ्या ताटल्यांमध्ये काही पदार्थ ठेवले. बाबांनी ते सर्व पदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवले व ईश्वराम्मांच्या हातून त्यातील ३ घास खाल्ले. ते म्हणाले,” आता भ्रम नाहीसा झाला आहे. काळजी करण्याची गरज नाही.

ईश्वराम्मांनी त्याच्याकड़े एक वचन देण्याची मागणी केली,”तू पुट्टपर्तीमध्येच राहशील आम्हाला सोडून दूर जाणार नाहीस असे मला वचन दे.” त्यांनी विनंती केली, “पुट्टपर्तीमध्ये येणाऱ्या तुझ्या भक्तांची आम्ही स्वागत करू व त्यांची व्यवस्था पाहु. सत्याने त्वरित उत्तर दिले, “पुट्टपर्ती” हे मी माझं कार्यक्षेत्र म्हणून निवडले आहे. हे वचन मी केवळ तुला दिले नाही तर ह्या’ गावाला आणि विश्वालाही दिले आहे. मी गुरुवारी तेथे येईन”.

आनंदाने ‘ईश्वरम्मांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, परंतु त्यांच्या मुखावरील प्रसन्नतेने ती सुवार्ता सर्वांपर्यंत पोहचवली. आता त्या आयुष्यभर मुलाचा महिम्याच्या साक्षी होऊ शकतील व त्या स्वतः, त्यांच्या मूली आणि सुबम्मा मिळून किमान ‘त्यांच्या’ जेवणखाणाची काळजी घेऊ शकतील. ह्याची त्यांनी खात्री पटली.

सत्या पुट्टपर्तीला जाणार व कदाचित पुन्हा परत येणार नाही ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. समाजाच्या विविध थरांमधील लोकांना त्या वाटिकेमध्ये धाव घेतली. बाबांनी त्यांच्या समोर बसलेल्या त्यांच्या शिक्षकांना विभूती दिली. आज बाबा त्यांच्या विभूतीस त्यांचे ‘परिचय पत्र’ असे म्हणतात! ती त्यांच्या प्रेमळ कृपेची एक निशाणी आहे. व विश्वातील प्रत्येक गोष्टीचे एक दिवस भस्मामध्ये रूपांतरण होणार आहे ह्याचे स्मरण करून देणारी आहे.

सत्या ज्या दिवशी उरवकोंड्याहून निघणार होता त्या दिवशी, गावकऱ्यांनी बैलांना झूल घालून, सजावट केलेल्या बैलगाडीतून सत्याची मिरवणूक काढली. शेषमा राजु व धाकटा भाऊ जानकीराम हे मिरवणूकीच्या अग्रभागी होते. ईश्वराम्मा व त्यांच्या मुली, सुना शेकडो महिलांच्या घोळक्यामध्ये होत्या. ढोल, पडघम, सनई, झांजा वाजवणारे पथक ह्या भक्ती फेरीच्या अग्रभागी होते.

गावाच्या सीमेवर आल्यावर लोकांना’ परत फिरण्याची विनंती करण्यात आली. परंतु फार थोड्या लोकांची त्यांच्या प्रिय सत्याशिवाय परतण्याची तयारी होती. अनेकांनी त्याच्या मागोमाग जाऊन किमान एक आठवडा पुट्टपर्तीमध्ये राहण्याचे ठरवले होते. ईश्वराम्मा साईबाबांना पुट्टपर्तीमध्ये परत घेऊन येत होत्या.आता ते उरवकोंड्यातील हायस्कूल मधील विद्यार्थी नव्हते. ते आता सद्गुरु साईबाबा होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *