अर्जुनाची एकाग्रता

Print Friendly, PDF & Email

अर्जुनाची एकाग्रता

एके काळी धृतराष्ट्र नावाचा राजा होऊन गेला. त्याला पंडुराजा नावाचा एक भाऊ होता. धृतराष्ट्राच्या पुत्रांना कौरव आणि पंडुराजाच्या पुत्रांना पांडव म्हणत असत. हे सर्व राजपुत्र गुरु द्रोणाचार्यांचें शिष्य होते. द्रोणाचार्य इतर शिष्यांसह त्यांना धनुर्विद्या शिकवत होते. पाच पांडवांपैकी अर्जुन तिसरा भाऊ होता आणि कौरव शंभर होते. ह्या सर्व राजपुत्रांमध्ये अर्जुन अत्यंत बुद्धिमान आणि अभ्यासात, विशेषत: धनुर्विद्येत प्रवीण होता. धनुर्विद्येतील त्याला असलेला रस आणि कौशल्य ह्यामुळे तो द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य बनला. अर्जुन अत्यंत मेहनती होता. अभ्यासाविषयी त्याला कळकळ होती. त्याच्या विशेष प्रावीण्यामुळे कौरवांना त्याचा मत्सर वाटे. परंतु त्याचे हेच प्रावीण्य द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य बनण्यास कारणीभूत ठरले. दुर्योधनास आणि इतरांना वाटणाऱ्या द्वेषभावामुळे, गुरु पक्षपाती आहेत आणि ते अर्जुनाच्या बाबतीत पक्षपातीपणा करतात, अशी त्यांनी तक्रार केली.

ती तक्रार द्रोणाचार्यांपर्यंत पोहोचली. त्यांना ह्या तरुण राजपुत्रांच्या मनातील गैरसमज दूर करायचा होता की हा त्यांचा पक्षपातीपणा नसून अर्जुनाने स्वतः अर्जित केलेली गुरूंची सद्भावना होती.

एक दिवस गुरूंनी शिष्यांना बोलावून म्हटले, “हे पहा मुलांनो आज मी तुमच्या धनुर्विद्येतील कौशल्याची परीक्षा घेणार आहे. त्या झाडावर बसलेल्या पोपटाला तुम्ही नेम धरून लक्ष्य केले पाहिजे.”

सर्व शिष्यांनी आनंदाने व एक मुखाने उत्तर दिले “हो गुरुजी.”

त्यानंतर द्रोणांनी दुर्योधनापासून सुरुवात केली व एकामागोमाग एक शिष्यास बोलवले. द्रोणांनी विचारले, “दुर्योधना, तुला झाडावरचा पोपट दिसतोय का? ते तुझे लक्ष्य आहे”

दुर्योधन म्हणाला, “हो गुरुजी, दिसतोय.”

गुरुजींनी विचारले, “अजून काय दिसतेय?”

दुर्योधन म्हणाला, “गुरुजी, मला अनंत निळे आकाश, मोठे झाड, त्याची भरगच्च पाने, तुम्ही, माझे बंधु, धर्मराज आणि इतरही सर्व दिसत आहे.” त्यानंतर द्रोणांनी त्याला म्हटले, “तु जाऊ शकतोस.” त्यानंतर त्यांनी इतर शिष्यांना बोलावले व त्यांनीही कमी-अधिक प्रमाणात दुर्योधनासारखीच उत्तरे दिली.

त्यानंतर द्रोणांनी अर्जुनाला विचारले, “अर्जुना, त्या मोठ्या झाडाच्या फांदीवर बसलेला पोपट दिसतोय का?”

अर्जुन उतरला, “हो, गुरुजी”

द्रोणांनी विचारले, “तुला अजून काय दिसतेय?”

“अन्य काहीही नाही” अर्जुन म्हणाला.

द्रोणांनी पुन्हा त्याला विचारले, “तुला आकाश, फ़ांद्या, पाने इत्यादि काही दिसत नाही का?”

“नाही, गुरुजी, मला पोपटाशिवाय अन्य काहीही दिसत नाही.” अर्जुन विनम्रतेने म्हणाला. द्रोणाचार्य अत्यंत आनंदित होऊन म्हणाले, “तू जाऊ शकतोस पुत्रा.” आता ह्या कसोटीवरून आपण समजू शकतो, की द्रोणांना त्यांच्या शिष्यांच्या मनावर काय ठसवायचे होते. जरी द्रोणांनी ह्यास धनुर्विद्येची परीक्षा म्हंटले असले तरी ती खरी एकाग्रतेची परीक्षा होती. आपण करत असलेल्या कामामध्ये एकाग्रता अत्यंत महत्त्वपूर्ण असते, हा धडा द्रोणांना शिकवायचा होता. काम करताना कोणत्याही शिष्याचे, कोणत्याही प्रकारे लक्ष विचलित होऊ नये. एकाग्रतेच्या अभावाने जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये अपयश पदरी येते.

प्रश्न:

  1. गुरु द्रोणाचार्य यांना अर्जुन अत्यंत प्रिय का होता?
  2. आयोजित केलेली परीक्षा धनुर्विद्ये ची होती का एकाग्रतेची? तुमच्या शब्दात हे सिद्ध करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *