बाळ गंगाधर टिळक

Print Friendly, PDF & Email
बाळ गंगाधर टिळक

वंश

बाळ गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई आणि वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक होते. त्यांचे वडील संस्कृत पंडित आणि एक लोकप्रिय शिक्षकही होते. त्यांच्या विद्वत्तेचा आदर म्हणून सर्वजण त्यांना गंगाधर पंत म्हणत असत. टिळक केवळ सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या बुद्धिमत्तेचा तरुण वयातील टिळकांवरही ठसा उमटला. ज्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळाले अशा भारतीयांच्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांपैकी टिळक एक विद्यार्थी होते.

त्यांच्या सुरुवातीच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग

बालपणापासूनच बाळ एक अत्यंत बुद्धिमान मुलगा होता.

(त्यांच्या बालपणीचे प्रसंग मुलांशी जोडून त्यांना त्याचे नाट्यीकरण करण्यास सांगा.)

गणिताचे शिक्षक : ” जर ५ मेंढ्या २८ दिवसात कुरणामधील सर्व गवत खातात तर किती मेंढ्या ते गवत २०दिवसात खातील? “

टिळक : ” ७ मेंढ्या, गुरुजी ” गुरुजींचा प्रश्न संपायच्या आतच बाळनी तात्काळ उत्तर दिले.

” गणित न सोडवता उत्तर देणारा कोण आहे? ” गुरुजींनी मोठ्या आवाजात विचारले.

दोन-तीन मुले मोठ्या आवाजात ओरडली,”बाळ, गुरुजी.”

गुरुजी बाळ जवळ गेले आणि त्यांनी त्याची वही तपासली. त्यांनी किमान तो प्रश्न लिहून तरी घ्यायला हवा होता, तो प्रश्नच लिहिला नाही तर तो सोडवला कसा?

” ते उदाहरण तू कुठे सोडवलेस?”

मिश्किलपणे हसत बाळनी त्याच्या डोक्याकडे बोट दाखवले.

” तू तुझ्या वहीमध्ये उदाहरण सोडवायला हवेस.” गुरुजी त्याला म्हणाले.

बाळ ने विचारले, ” का? मी ते तोंडी करेन.”

गुरुजींनी तीनदा सोडवून दाखविलेली काही उदाहरणेसुद्धा बाळच्या वर्गमित्रांना समजायला कठीण जात होती परंतु बाळ साठी गणित आणि संस्कृत म्हणजे हातचा मळ होता.

स्वतंत्र दृष्टिकोन

बालपणापासून ते स्वतःचा स्वतंत्र दृष्टिकोन बनवत असत. ते नेहमी एक स्वतंत्र पवित्रा घेत. त्यांच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत ते खूपच वेगळे होते. रत्नागिरीतील प्राथमिक शाळेत जात असतानाचे ते दिवस होते.

एक दिवस शाळेमध्ये मधल्या सुट्टीत काही मुलांनी वर्गामध्ये शेंगा खाल्ल्या आणि त्याची टरफले जमिनीवर शिक्षकांच्या टेबलापाशी फेकली. एकाही मुलाने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. शाळेची घंटा वाजली आणि सर्व मुले पुन्हा जागेवर येऊन बसली. वर्गामध्ये प्रवेश करताना शिक्षकांनी त्यांच्या टेबलापाशी पडलेली टरफले पाहून मुलांना चिडून विचारले, ” हा खोडसाळपणा कोणी केला? ” विद्यार्थ्यांकडून उत्तर आले नाही.

” मी पुन्हा विचारतोय ” त्यांनी आवाज चढवून विचारले. ” कोणी हा खोडसाळपणा केला? ज्याने हे केलंय तो जर उभा राहिला नाही तर ज्यांना माहित आहे त्यांनी मला त्याचे नाव सांगावे.”

मुले एकमेकांकडे पाहत होती. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना हे कोणी केले ते माहित नव्हते. कोणीही उभे राहिले नाही आणि कोणी बोललेही नाही. रागवलेल्या शिक्षकांनी टेबलवरची छडी हातात घेतली आणि म्हणाले,” तुमच्यापैकी कोणीही मला त्या अपराधी मुलाला शोधून काढण्यासाठी सहकार्य करत नाही त्यामुळे मी आता प्रत्येकाला हातावर छडी देणार आहे. शिक्षक पहिल्या रांगेतील मुलांच्या जवळ आल्यावर टिळक उभे राहून धीटपणाने म्हणाले, ” गुरुजी आमच्यापैकी बहुतेकांना हे कोणी केले हे माहीत नाही. अशीही अनेक मुलं आहेत की ज्यांनी जमिनीवर पडलेली शेंगांची टरफले पाहिली सुद्धा नाहीत. मधल्या सुट्टीमध्ये आम्ही सर्वजण वर्गाच्या बाहेर गेलो होतो. कदाचित दुसऱ्या वर्गातील मुलांनी येऊन सुद्धा हा खोडसाळपणा केला असेल तर मग निरपराध मुलांना छडीचा मार का? “

टिळक एक सद्वर्तनी विद्यार्थी असल्याचे शिक्षकांना माहीत होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या रागालाआवर घालण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला. ते म्हणाले, ” टिळक, अति शहाणपणा दाखवू नकोस. तुमच्यापैकी काही जणांना, अपराधी कोण हे माहीत असल्याची मला खात्री आहे जर त्यांनी ते नाव सांगितले नाही तर मला संपूर्ण वर्गाला शिक्षा करावी लागेल.” शिक्षकांचा आदर राखून टिळक त्वरित म्हणाले, ” मला वाटते की हे ना योग्य आहे ना न्याय. आम्ही निरपराध असल्याचे मी तुम्हाला सांगितले आणि ते सत्य आहे. निरपराध मुलांना शिक्षा केल्याचे मी पाहू शकणार नाही आणि म्हणून कृपया आपण मला वर्गाबाहेर जाण्याची अनुमती द्यावी.

सत्य आणि न्यायाप्रती असणाऱ्या टिळकांच्या धैर्याची आणि प्रेमाची सर्व मुलांनी प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर शिक्षकही टिळकांची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. ते म्हणाले,”टिळक हा काही सामान्य मुलगा नाही. जर प्रत्येक विद्यार्थी त्याच्यासारखा सत्यवादी आणि शिस्तप्रिय असेल तर आपल्या देशाचे भवितव्य उज्वल असेल.”

बालपणातील प्रेरणादायी कथा

त्यांना गोष्टी अत्यंत प्रिय होत्या. अभ्यास झाल्यानंतर, वेळ न दवडता आजोबांकडून गोष्टी ऐकण्यासाठी बाळ त्यांच्याकडे धाव घेतअसे. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या गोष्टी ऐकून बाळ अतिशय रोमांचित होत असे. शिवाजी महाराज आणि त्यांचे मातृभूमीप्रति असणारे प्रेम या गोष्टीने ते अत्यंत प्रभावी झाले.

देशासाठी, आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेले हे लोक केवढे महान होते! मोठे होताना, आपणही देशाची सेवा करावी आणि भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करावे, ही त्यांची दुर्दम्य इच्छा बनली.

शिक्षण

बाळ दहा वर्षाचा असताना गंगाधरपंतांची पुण्यात बदली झाली. पुण्यातील अँग्लो स्थानिक भाषेतील शाळेमध्ये प्रवेश घेतल्यामुळे टिळकांना नामवंत शिक्षकांकडून चांगले शिक्षण मिळाले. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. टिळकांना १८७७ मध्ये बी.ए.ची पदवी मिळाली. त्यांना गणितामध्ये प्रथम श्रेणीचे गुण मिळाले आणि ते अपेक्षितच होते. पुढे त्यांनी शिक्षण चालू ठेवले आणि एलएल.बी.ची पदवीही मिळवली.

आरोग्य हीच संपदा

त्यांच्या आईसारखी त्यांची प्रकृतीही नाजूक होती. शरीर दुर्बल असताना देशासाठी ते त्यांचे जीवन कसे समर्पित करू शकले असते? म्हणून त्यांनी त्यांचे शरीर सुदृढ बनवण्याचे ठरवले. ते दररोज शारीरिक व्यायाम करत असत आणि त्याचबरोबर नियमितपणे सकस आहार घेत असत. एक वर्षाच्या कालावधीत टिळकांनी सर्व खेळ आणि क्रीडा यामध्ये पहिला क्रमांक पटकावला. ते एक उत्तम जलतरणपटू आणि कुस्तीगीरही बनले. त्यांनी त्यांचे शरीर इतक्या उत्कृष्ट पद्धतीने कमावले की सर्वांना त्यांच्या सुदृढ देहाकडे बघून आश्चर्य वाटे.

राष्ट्रासाठी योगदान

टिळक द्विपदवीधर असल्यामुळे, इतरांप्रमाणे त्यांनाही ब्रिटिशांकडे चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळू शकली असती. परंतु त्यांनी त्यांचे जीवन देशसेवेसाठी समर्पित करण्याचे अगोदरच ठरवले होते.

आगरकर, नामजोशी आणि चिपळूणकर ह्या मित्रांबरोबर टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल ही शैक्षणिक संस्था स्थापन केली. या शाळेचे विशेष म्हणजे या शाळेमध्ये स्थानिक भाषांमधून शिक्षण दिले जात होते त्यांचबरोबर आध्यात्मिक आणि राजकीय शिक्षणाचाही समावेश करण्यात आला होता. न्यू इंग्लिश स्कूल ही संस्था विकसित होऊन त्याचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये रूपांतर झाले. पहिल्या वर्षाच्या दरम्याने टिळकांनी वा चिपळूणकरांनी एक रुपया सुद्धा वेतन घेतले नाही.

टिळक एक पत्रकार

टिळकांनी शिक्षण क्षेत्राचा विस्तार करण्याचा विचार केला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण दिले जात होते. भारतीयांना कराव्या लागणाऱ्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या स्वरूपाची स्पष्ट कल्पना प्रत्येक भारतीयाला ज्ञात करून देणे आवश्यक होते. यासाठी वर्तमानपत्र हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे असा टिळकांनी विचार केला.

शाळा सुरू केल्यानंतर पुढच्याच वर्षी टिळकांनी दोन साप्ताहिके चालू केली. त्यातील ‘केसरी’ हे मराठी साप्ताहिक आणि ‘मराठा’ हे इंग्रजी साप्ताहिक होते.

सामाजिक सुधारणांसाठी, त्यांनी सरकारच्या विरोधात लढा पुकारला. बालविवाहावर बहिष्कार घालण्यासाठी आणि विधवा विवाहाचे स्वागत करण्यासाठी त्यांनी लोकांना आवाहन केले.

स्थानिक उत्सव ते राष्ट्रीय उत्सव

टिळकांनी गणपती उत्सव आणि शिवजयंती ह्या स्थानिक उत्सवांचे राष्ट्रीय उत्सवांमध्ये परिवर्तन केले.

टिळकांनी असे जाणले की ते सर्वजण एक आहेत अशी खोलवर जाणीव लोकांना झाली पाहिजे, त्यांनी वरचेवर एकमेकांना भेटले पाहिजे. त्यांच्यामध्ये काही सामायिक आदर्श असायला हवेत आणि त्यासाठी काही असे प्रसंग वा अशा संधी उपलब्ध व्हायला हव्यात की जेथे ते त्यांच्यामधील सर्व मतभेद विसरून आनंदाने एकमेकांमध्ये मिसळतील. टिळकांच्या या योजनेमुळे काही वर्षातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या उत्सवांचा प्रसार झाला.

‘स्वदेशी’ एक पवित्र शब्द

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग असलेली स्वदेशी चळवळ अधिक तीव्र झाली. विदेशी मालावर बहिष्कार हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता. टिळकांच्या घरासमोर एक मोठा स्वदेशी बाजार उघडण्यात आला होता. त्या बाजारातील ५० छोट्या दुकानांमधून स्वदेशी मालाची विक्री केली जात होती.

टिळकांनी स्वदेशी, स्वराज्य बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चार पवित्र शब्दांची शिकवण दिली. टिळक जर मुक्त राहिले तर आपले सरकार धोक्यात येईल हे ब्रिटिशांनी ओळखले. ‘देशाचे दुर्दैव’ या टिळकांच्या लेखाचे खोटे निमित्त करून त्यांच्यावर सरकार विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. २४जून१९०८ रोजी मुंबईमध्ये टिळकांना अटक करण्यात आली आणि त्यांना भारताबाहेरील मंडालेच्या कारागृहात सहा वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली.

टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई या सुद्धा त्यांच्या पतीसारख्याच अत्यंत साध्या होत्या. त्यांनी कधीही किमती कपडे वापरले नाहीत. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन कुटुंबासाठी आणि येणाऱ्या लोकांचे आदरातिथ्य करण्यासाठी समर्पित केले. टिळक मंडाले येथील कारागृहात असताना सत्यभामाबाईंचे भारतामध्ये निधन झाले.

टिळकांची गर्जना : “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.”
लोकमान्य

टिळकांचे देशप्रेम, निर्भयता, लढाऊ वृत्ती, कुशाग्र बुद्धिमत्ता, नीतिमान चारित्र्य आणि त्यागी वृत्ती या सर्व गुणांमुळे ते लोकांना अत्यंत प्रिय होते. लोकं त्यांना प्रेमाने लोकमान्य म्हणत. (लोकांनी त्यांचा नेता म्हणून केलेला स्वीकार)

टिळक आणि अध्यात्म

मंडालेच्या तुरुंगात असताना, दररोज सकाळी देवाची प्रार्थना, गायत्री मंत्रोच्चारण, स्तुतीस्तोत्रांचे गायन आणि धार्मिक विधी करणे हा टिळकांचा नित्यक्रम होता. कर्मयोग हा भगवद्गीतेच्या शिकवणीचा केंद्रबिंदू आहे असा टिळकांना विश्वास होता. ‘गीतारहस्य’ हा भगवद्गीतेवर भाष्य करणारा प्रसिद्ध ग्रंथ टिळकांनी लिहिला. टिळकांनी वेदांचा सखोल अभ्यास करून ‘द आर्क्टिक होम ऑफ द वेदाज'( उत्तर ध्रुव प्रदेशातील वेदांचे मूळ वसतीस्थान) हे पुस्तक लिहिले.

ते अत्यंत साधेपणाने जीवन जगले. त्यांनी त्यांचे तन-मन-धन देशसेवेसाठी समर्पित केले. टिळकांची कोणतीही मालमत्ता नव्हती. धोतर, सदरा, खांद्यावर शाल आणि डोक्यावर लाल पगडी असा साधा पेहराव ते करत.

टिळकांना विश्वास होता की “धर्म आणि व्यावहारिक जीवन या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत. संन्यास घेणे म्हणजे सांसारिक जीवनाचा त्याग करणे नव्हे. तुम्ही केवळ तुमच्या कुटुंबासाठी काम करण्याऐवजी संपूर्ण देशाला तुमचे कुटुंब मानणे हा त्याचा मतितार्थ आहे. त्याच्या पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणे आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे परमेश्वराची सेवा करणे.”

टिळक म्हणाले, “भारताला मी माझी मातृभूमी आणि माझी देवता मानतो.भारतातील सर्व लोकांना मी माझे आप्तस्वकीय मानतो आणि त्यांच्या राजकीय आणि सामाजिक मुक्तीसाठी अत्यंत निष्ठेने आणि दृढतेने कार्य करणे हा माझा सर्वोच्च धर्म आणि कर्तव्य आहे.”

बाळ गंगाधर टिळकांचे शिर्डी येथे आगमन

१९ मे १९१७ रोजी बाळ गंगाधर टिळक खापर्डे यांच्याबरोबर शिर्डीला आले. खापर्डे त्यापूर्वीही शिर्डीला आले होते आणि त्यांनी व्यक्तिशः बाबांची महत्ता अनुभवली होती. टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक जहालमतवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना बाबांचे दर्शन घडवण्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीच्या बाबतीत बाबांचा सल्ला घेण्यासाठी खापर्डे त्यांना शिर्डीला घेऊन आले. बाबांनी त्यांच्याशी गुप्त सल्लामसलत केल्याचे पुरावे होते. त्यावेळी ब्रिटिश राजवटी अंतर्गत प्रचलित असलेल्या नियमानुसार या गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या. भारताला हिंसक मार्गाने नव्हे तर अहिंसक मार्गाने निश्चित स्वातंत्र्य मिळेल असे बाबांनी भाकित केले होते हे दर्शवणारे बरेच पुरावे होते. बाबांनी टिळकांना ह्या भाकितावर आधारित सल्ला दिला आणि त्या दिवसापासून जहालमतवादी गटाची कार्यवाही थंडावल्याचे संकेत दिसू लागले.

(स्रोत – www.saibaba.org)

सूचित उपक्रम/गुरूंसाठी चर्चा
  1. प्रत्येक वर्षी जानेवारी ते डिसेंबर या दरम्यान प्रशांति निलयम मध्ये साजरे होणारे विविध उत्सव
  2. स्वदेशीची संकल्पना- ती संकल्पना एज्युकेअरच्या तत्वांशी/ पंचतत्वांशी जोडा. (संकेत: स्थानिक तयार केलेल्या वस्तू)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *