क्रोधा पासून सावधान
क्रोधा पासून सावधान
जेव्हा डॉ. श्री. राजेंद्र प्रसाद भारताचे राष्ट्रध्यक्ष होते त्यावेळची ही गोष्ट आहे. त्यांचा रत्ना नावाचा एक नोकर होता. रत्ना अतिशय प्रामाणिक आणि विश्वासू नोकर होता, त्याला आपल्या मालकाच्या गरजा नीट माहीत होत्या. त्यामुळे मालकाला ज्या वेळी जे लागेल त्यावेळी तो ते तयार ठेवीत असे.
एके दिवशी रत्ना त्याच्या मालकाचे टेबल झटकून, साफसूफ करुन आणि नीटनेटके करून ठेवत होता टेबल पुसण्यासाठी त्याने टेबलावरील एक फाईल उचलली तोच त्यातून एक फौंटन पेन खाली पडले. त्याने ते जमिनीवरून ताबडतोब उचलले, परंतु पेनच्या निबचे टोक तुटले होते. पेनची मोडतोड झालेली पाहून रत्ना घाबरला. नेमके त्याचवेळी राजेंद्र प्रसाद त्या खोलीत आले. त्यानी काय घडले ते पहिले है अतिशय नाराज झाले. कारण ते भारी पेन त्यांच्या एका प्रिय आदरणीय मित्राने त्यांना भेट म्हणून दिले होते म्हणून ते संतापाने रत्नाच्या अंगावर जोराने ओरडले आणि येथून पुढे त्याने कामावर येण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी रत्नाला बजावले.
रत्नाचे मालकावर भारीच प्रेम असल्याने रत्नाला त्यांना सोडून जाण्याची इच्छा नव्हती म्हणून तो मालकाच्या पाया पडला. रडू लागला चुकीबद्दल क्षमा मागू लागला. पण राजेंद्रप्रसाद ठाम होते आणि त्यांनी पूर्वीच्या त्याच संतापाच्या आवाजात त्याला खोलीतून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले.
त्या रात्री राजेन्द्रप्रसाद जेव्हा झोपायला गेले तेव्हा ती दुःखद घटना त्यांना आठवली. त्यांचे शांत व विश्रब्ध मन त्याबद्दल पुन्हा विचार करू लागले. “खरच रत्नाची काय चूक होती?” ते आता स्वत:लाच विचारत होते. “नीब खराब झाली, कारण मीच पेन उघड ठेवल. त्याला ते दिसल नाही कारण मीच ते फाईल मध्ये झाकलेले ठेवले. खरच रत्ना निर्दोष आहे. शिवाय तो आज्ञाधारक, प्रामाणिक, मोकळ्या मनाचा आणि प्रेमळ आहे, नाही का? अरेरे! आज सकाळी त्याच्याशी उगाच अतिशय कठोरपणाने आणि अन्यायाने वागलो” हे दुःखाचे आणि पश्चात्तापाचे विचार येऊन ते इतके अस्वस्थ झाले की त्यांना त्या रामभर झोपच आली नाही.
ते अस्वस्थपणे पहाट होण्याची वाट पाहत बसले. उठल्याबरोबर त्यांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर रत्नाला बोलावणे पाठवले. रत्ना आल्याबरोबर एखाद्या मित्राचे स्वागत करावे तसे राजेंद्र प्रसादांनी त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याला म्हणाले, “रत्ना, तू मला माफ केले पाहिजे. काल मी तुझ्याशी फार कठोरपणे वागलो. तुझ काम तू पूर्वीप्रमाणेच चालू ठेव. तुला गमावणे मला परवडणार नाही”
धन्याच्या उदार अन्तःकरणातून येणारे हे उद्गार ऐकून रत्ना हेलावून गेला. त्यांचे पाय धरुन रत्ना लहान मुलांप्रमाणे हुंदके देऊ लागला. मात्र ह्या वेळी त्याचे अश्रू त्या थोर पुरुषाविषयीच्या प्रेमाचे व कृतज्ञतेचे द्योतक होते.
त्यानंतर पुष्कळदा राजेंद्र प्रसाद ही हकीकत इतरांना सांगत असत आणि कोणावरही रागावण्यापूर्वी किंवा कोणालाही शिक्षा करण्यापूर्वी दहादा विचार करावा असा इशारा देत असत ते म्हणत असत की, “क्रोध हा भयानक कुत्र्यासारखा आहे. त्याला तुम्ही आत नीट बांधून ठेवले पहिले. समोरचा माणूस चोर किंवा लुच्चा आहे अशी तुमची खात्री पटलेली असेल तेव्हाच त्याला मोकळे सोडा, नाहीतर ते कोणावरही भुंकत सुटेल आणि एकाद्या निरपराध व्यक्तीला चावेल सुद्धा. आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, “चुकणे हे मानवी आहे तर माफ करणे हे दैवी आहे.”
प्रश्न:
- क्रोध हा कुत्रा आहे. प्रेम परमेश्वर आहे – स्पष्टीकरण करा.
- कुणीतरी म्हटले आहे. “रागावणे म्हणजे कुणीतरी दुसऱ्याच्या अपराधाबद्दल स्वत:ला शिक्षा करून घेणे आहे” याच्याशी तुम्ही सहमत आहात काय? तुमच्या उत्तराला कारणे द्या
- सबळ कारण नस्ताना जेव्हा तुम्ही कोणावर तरी रागावला होतात आणि
- जेव्हा कोणीतरी गंभीर अपराध केल्यामुळे तुम्ही त्याच्यावर रागावला होता या दोन्ही बाबतचे तुमचे अनुभव स्पष्ट करा. या अनुभवाविषयी तुम्ही आता विचार करता तेव्हा तुम्हाला काय वाटते?