सेतु बंधन
सेतु बंधन
रामाने त्याच्या समोरील विशाल महासागराकडे दृष्टीक्षेप टाकून लक्ष्मणास त्याचा धनुष्य बाण आणण्यास सांगितले . ह्याचा परिणाम काय होईल ह्या विचाराने लक्ष्मण भयभीत झाला. एका मागोमाग एक लाटा रामाच्या चरणांवर लोळण घेऊन जणुकाही दयायाचना करत होत्या. त्याचवेळी आकाशवाणी झाली, “प्रभु! आपल्या सैन्यात नल आणि नील नावाचे दोन सेनापती आहेत. त्यांना एका ऋषींनी शाप दिला होता. तो शाप आता आशीर्वाद म्हणून उपयोगात आणता येईल.” त्यानंतर सागराने रामाला ती संपूर्ण हकीकत कथन केली.
नल आणि नील लहन असतानाची ही गोष्ट आहे. अनेक ऋषिमुनी पर्णकुटी बांधून नदी किनारी राहत होते. तेव्हा ह्या दोघांनी पर्णकुटीत प्रवेश करून त्यांचे पूजेतील पवित्र शाळीग्राम घेतले व पाण्यात फेकले . ऋषींनी त्या दोघांना शाप दिला ,” तुम्ही ज्या वस्तु पाण्यात फेकाल त्या सर्व वस्तु पाण्यात न बुडता तरंगत राहतील.” आणि जरी पाण्याचा वेगवान प्रवाह वा पुराचे पाणी आले तरी त्या जेथे आहेत त्या ठिकाणीच राहतील.”
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, त्यांच्या मनांवर अंतर्भूत मूल्ये बिंबवावीत
जर मुले खोडकर असतील तर त्यांना कडक शब्दात ताकीद दिली पाहिजे आणि एवढेच नव्हे तर कधी कधी वडीलधाऱ्यांकडून त्यांना शासनही केले पाहिजे. कारण त्यांना त्यांच्या चुकीचे गांभीर्य समजले पाहिजे. अशी वडीलधाऱ्यांची इच्छा असते.
तथापि जेव्हा त्यांना त्यांच्या वर्तणुकीबद्दल पश्चाताप होईल आणि ती चूक पुन्हा न करण्याचे ते वचन देतील तेव्हा शिक्षा त्यांच्यासाठी अनुकूल बनेल जे नल आणि नील ह्यांच्याबाबतीत घडले.
अंतर्भूत मूल्ये- वडीलधाऱ्यांप्रती आदर, चांगले बना, चांगले करा आणि चांगले पहा.
सागराने पुढे म्हटले, “ते जो दगड पाण्यात फेकतील तो त्याच जागी तरंगत राहील व त्या प्रत्येक दगडावर तुझे नांव कोरलेले असू दे. तुझे नाम अजिबात जड नसून अत्यंत हलके आहे. अशा रितीने मोठी मोठी पर्वत शिखरे जरी पाण्यात फेकली तरी ती तरंगतील व सेतू बांधला जाईल. जांबवानाने नल आणि नील ह्यांना त्यांच्या शापाचा उपयोग करण्यास सांगितले.” तसेच रामाला त्यांच्या हृदयात प्रस्थापित करून समुद्रामध्ये टेकड्या व पाषाण फेकण्यास सांगितले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, त्यांच्या मनांवर अंतर्भूत मूल्ये बिंबवावीत. गुरुंनी मुलांना सांगावे की जर आपण अत्यंत सामर्थ्यशाली असलेले परमेश्वराचे नाम घेऊन काम सुरु केले तर कोणतेही काम अवघड नसते.
अंतर्भूत मूल्ये- परमेश्वराचे नाम त्याच्या रुपाहून अधिक शक्तिशाली आहे.
सर्व वानरवीर दहा दिशांना धावले व समुद्रामध्ये फेकण्यासाठी आजूबाजूच्या सर्व टेकड्या त्यांनी नलनीलास आणून दिल्या . पाच दिवसांमध्ये १०० योजने सेतू बांधून पूर्ण झाला. वानरांनी भक्तिभावाने केलेल्या सेवेची रामाने प्रशंसा केली. रावण शिवभक्त असल्याचे बिभीषणाने रामाला सांगितले. बिभीषणाच्या सांगण्यावरून रामाने तेथे शिवलिंगाची स्थापना करून विधीवत पूजा केली. ते लिंग भविष्यात रामलिंगेश्वर नावाने ओळखले जाणार होते.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, त्यांच्या मनांवर अंतर्भूत मूल्ये बिंबवावीत. गुरुंनी मुलांना सांगावे की त्यांनी कोणतेही काम सुरु करण्याआगोदर परमेश्वराची प्रार्थना करावी. रामाने अवतार असूनही उदाहरणाद्वारे प्रार्थना आणि शरणागतीचे महत्त्व दर्शवले.
अंतर्भूत मूल्ये- प्रार्थानेविना कृती म्हणजे अंधपणाने चाचपडण्यासारखे आहे. प्रार्थनेसह कृती केल्यास ती अधिक प्रामाणिक व परिणामकारक बनते.
3 W म्हणजे WORK (काम), WISDOM (ज्ञान) WORSHIP (भक्ती )
त्यानंतर सर्व वानरांनी मुखाने रामाचे नाम घेत सेतू पार केला आणि त्यानंतर थोड्याच वेळात राम, लक्ष्मण आणि बिभीषण सेतू पार करून लंकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले.